15 August 2020

News Flash

पॉलिस्टर तंतूंची उत्पादन प्रक्रिया-१

पॉलिस्टर तंतू बनविण्याच्या अनेक पद्धती आहेत. कुठल्या प्रकारचा तंतू तयार करावयाचा आहे, यावर विशिष्ट पद्धतीची निवड अवलंबून असते.

| April 22, 2015 01:01 am

पॉलिस्टर तंतू बनविण्याच्या अनेक पद्धती आहेत. कुठल्या प्रकारचा तंतू तयार करावयाचा आहे, यावर विशिष्ट पद्धतीची निवड अवलंबून असते. पॉलिस्टर तंतू हा सामान्यपणे अखंड तंतू किंवा आखूड तंतूंच्या स्वरूपात उत्पादित केला जातो. परंतु काही वेळा तो मोठय़ा जुडग्याच्या स्वरूपात किंवा उशा, गाद्या यांसारख्या वस्तूमध्ये भरण्यासाठी ‘भरण-तंतू’ म्हणूनही उत्पादित केला जातो. या चारही प्रकारच्या तंतूंसाठी उत्पादन प्रक्रियेमध्ये काही फरक असतो. हे बदल साधारणपणे वितळ कताई प्रक्रियेनंतर असतात, त्या पूर्वीची प्रक्रिया सर्व प्रकारांसाठी सारखीच असते.   पॉलिस्टर तंतूंच्या निर्मितीमधील सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे ईस्टर संयुगाची निर्मिती आणि त्याचे बहुवारिकीकरण. पॉलिस्टर तंतू बनविण्यासाठी डायमिथाईल (किंवा इथाईल) ग्लायकॉल टेरेप्थॅलेट या संयुगापासून बनणाऱ्या बहुवारिकाची गरज असते. हे बहुवारिक दोन पद्धतीने तयार करता येते. अ) डीएमटी (डाय मिथाईल टेरेप्थॅलेट) पद्धत आणि ब) पीटीए (प्युरिफाईड टेरेप्थॅलिक अ‍ॅसिड) पद्धत.
डीएमटी व टेरिप्थॅलिक अ‍ॅसिड हे दोन्ही कच्च्या खनिज तेलाच्या पृथक्करणानंतर जो नॅप्था मिळतो त्यापासूनच बनतात. नॅप्थापासून प्रथम पॅराझायलीन नावाचे केमिकल मिळते. या पॅराझायलीनचे  पॅराटोल्युईक अ‍ॅसिडसोबत ऑक्सिडीकरण केले असता टेरेप्थॅलिक अ‍ॅसिड आणि मोनो मिथाईल टेरेप्थॅलेट (एमएमटी) ही संयुगे तयार होतात. या तऱ्हेने बनविलेले टेरेप्थॅलिक अ‍ॅसिड हे तंतू बनविण्यासाठी लागणाऱ्या शुद्धतेचे असत नाही, त्यामुळे यावेळी मिळणाऱ्या मोनो मिथाईल टेरेप्थॅलेट आणि टेरेप्थॅलिक अ‍ॅसिड या दोहोंची मिथेनॉलबरोबर रासायनिक अभिक्रिया केली जाते. या अभिक्रियेस  ईस्टरीकरण असे म्हणतात. या अभिक्रियेमुळे डाय मिथाईल टेरेप्थॅलेट हे संयुग तयार होते.
पॉलिस्टर तंतूच्या शोधापासून जवळजवळ १९७० सालापर्यंत पॉलिस्टर तंतू बनविण्यासाठी डीएमटी (डाय मिथाईल टेरेप्थॅलेट) ही पद्धत प्रचलित होती, कारण त्यावेळी तंतू बनविण्यासाठी लागणाऱ्या शुद्धतेचे व दर्जाचे टेरेप्थॅलिक अ‍ॅसिड बनविणे शक्य झाले नव्हते. या पद्धतीमध्ये प्रथम डीएमटीची इथिलीन ग्लायकॉलबरोबर रासायनिक प्रक्रिया करून डायमिथाईल (किंवा इथाईल) ग्लायकॉल टेरेप्थॅलेट हे ईस्टर तयार केले जाते. नंतर या ईस्टरचे बहुवरिकीकरण करून पॉली इथिलीन टेरेप्थॅलेट (ढएळ) हे बहुवारिक बनविले जाते.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – पतियाळा पेगचा उगम
साडेसहा फूट उंचीच्या विशाल देहयष्टीच्या पतियाळा महाराजा भूिपदरसिंगांचे खेळांचे वेड बहुचíचत होते. त्यांचा स्वत:चा पोलो या खेळाचा ‘पतियाळा टायगर’ हा संघ जगातील पोलो संघांमध्ये सरस समजला जाई. मद्यपान करताना मद्य मोजण्याचे ‘पेग’ हे प्रमाण आहे. व्हिस्कीसाठी पेग म्हणजे सामान्यपणे ६० मि.ली. समजला जातो. महाराजांच्या पोलो संघाच्या एका सामन्यातून ‘पतियाळा पेग’ हे एक नवीनच प्रमाण उगम पावले.
पतियाळा पेग म्हणजे ९० मि.ली. हाताच्या अंगठय़ाजवळील बोट व करंगळी यांच्यातील अंतराएवढय़ा उंचीचा साधारणत: हा पेग असतो. पतियाळा टायगर संघात अनेक खेळाडू हे मूलत: योद्धे होते. पूर्वी पोलोशी साम्य असलेला ‘स्कल पेगिंग’ हा खेळ लोकप्रिय होता. यामध्ये शत्रूची कवटी जमिनीत अर्धवट गाडली जाई. हातातल्या भाल्याने, घोडय़ावर बसून खेळाडूने ती कवटी उडवीत उडवीत किंवा उचलून संघाच्या क्षेत्रात शिताफीने नेण्याचा हा खेळ होता. खेळ सुरू होण्याआधी घोडे व खेळाडूंच्या भांग सेवनाचा कार्यक्रम होत असे. पुढे कवटीची जागा, मोठे लाल कापड किंवा टोपीने, तर भांगेची जागा मद्याने घेतली. या खेळात पतियाळाचा संघ अजिंक्य होता. एकदा इंग्लंडचा पोलोचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला. इंग्लंडच्या संघातील बहुसंख्य खेळाडू आयरिश होते. या चिवट आयरिश खेळाडूंपुढे आपल्या संघाचा निभाव लागणे अत्यंत अवघड आहे ही गोष्ट महाराजा ओळखून होते.
यावर महाराजांनी शक्कल लढवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला! सामन्याच्या आदल्या रात्री महाराजांनी दोन्ही संघांना शाही मेजवानी दिली. इंग्लंडच्या खेळाडूंचे ग्लास भरताना प्रत्येक वेळी नेहमीपेक्षा दीडपट दुप्पट मद्य भरले गेले तर पतियाळाच्या खेळाडूंना अत्यंत कमी मद्य घेण्याची तंबी भरली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अति मद्यपानामुळे हँगओव्हर येऊन इंग्लिश खेळाडूंना डोके जड होणे, दुखणे असा त्रास सुरू झाला. सामना हरल्यावर, इंग्लिश खेळाडूंनी ग्लासमधील दुप्पट प्रमाणातील मद्याला पतियाळा पेग हे नाव प्रचलित केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2015 1:01 am

Web Title: process of polyester fiber production
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल – पॉलिस्टर तंतू
2 पॉलिस्टर तंतू : गुणधर्म आणि अडचणी
3 कुतूहल – पॉलिस्टर तंतू निर्मिती
Just Now!
X