03 March 2021

News Flash

कुतूहल : वाटाण्यांवरील प्रयोगांतून आनुवंशिकतेचा सिद्धांत

ग्रेगर मेंडेलने सातत्याने आठ वष्रे वाटाण्याच्या वेलींवर प्रयोग केले. वाटाण्याच्या वेगवेगळ्या वेलींच्या लांबीमध्ये, वाटाण्याच्या आकारामध्ये, रंगामध्ये तसेच त्यांच्या फुलांच्या रंगामध्ये विविधता आढळते. त्याचप्रमाणे वाटाण्याच्या वेलींची

| February 26, 2013 12:47 pm

ग्रेगर मेंडेलने सातत्याने आठ वष्रे वाटाण्याच्या वेलींवर प्रयोग केले. वाटाण्याच्या वेगवेगळ्या वेलींच्या लांबीमध्ये, वाटाण्याच्या आकारामध्ये, रंगामध्ये तसेच त्यांच्या फुलांच्या रंगामध्ये विविधता आढळते. त्याचप्रमाणे वाटाण्याच्या वेलींची वाढ झटपट होत असल्याने त्यांच्या कित्येक पिढय़ा कमी कालावधीत अभ्यासणं शक्य होतं. म्हणून मेंडेलने प्रयोगांसाठी या वेलींची निवड केली.                     
मेंडेलने जास्त लांब वाढणारी आणि कमी लांब वाढणारी वाटाण्याची वेल यांच्यात संकर घडवून आणला. त्यासाठी त्याने अधिक लांबी असलेल्या वाटाण्याच्या वेलीच्या फुलातील परागकण काढून कमी लांबीच्या वेलीच्या फुलात टाकले. या संकरातून निर्माण झालेले वाटाणे पेरल्यावर मेंडेलला पुढच्या पिढीतल्या सर्वच वेली जास्त लांबीच्या असल्याचे आढळले. पुन्हा या सर्व वेलींमध्ये स्वपरागण घडवून आणल्यावर निर्माण झालेल्या वेलींमध्ये, जास्त लांबीच्या आणि कमी लांबीच्या वेलींचे प्रमाण तीनास एक (७५ टक्के व २५ टक्के) असल्याचे आढळले. यावरून, त्याने निष्कर्ष काढला की, झाडातील उंचपणाचे घटक हे खुजेपणाच्या घटकांच्या तुलनेत प्रभावी ठरतात. त्यामुळे उंच आणि खुज्या झाडांचा संकर घडल्यावर, पुढच्या पिढीतली सगळीच झाडे उंच होतात. त्याच्या पुढच्या पिढीत पुन्हा उंचपणाचे आणि खुजेपणाचे घटक एकमेकांपासून वेगळे होऊन ७५ टक्के उंच झाडे तयार होतात.
मेंडेलने मग दोन वेगळ्या लक्षणांच्या जोडय़ा वापरून संकराचे प्रयोग केले. यामध्ये गोलाकार पिवळ्या वाटाण्याच्या वेलींचा संकर हिरव्या सुरकुत्या असलेल्या वाटाण्याच्या वेलींबरोबर घडवून आणला. या संकरातून निर्माण झालेल्या सर्वच वेलींचे वाटाणे गोलाकार पिवळे होते. या पिढीतील वेलींमध्ये स्वपरागण घडवून आणल्यावर पुढच्या पिढीत चार प्रकारच्या म्हणजे गोलाकार पिवळे, सुरकुतलेले पिवळे, गोलाकार हिरवे आणि सुरकुतलेले हिरवे वाटाणे असणाऱ्या वेली तयार झाल्या.            
यावरून, सजीवांमध्ये भिन्न गुणधर्म स्वतंत्रपणे व्यक्त होतात आणि ते सजीवांमध्ये वैविध्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात, हा निष्कर्ष मेंडेलने काढला. आई-वडिलांचे गुणधर्म पुढील पिढीत कसे येतात आणि त्याच वेळी या पिढीमध्ये वैविध्य कसं निर्माण होतं, हे मेंडेलच्या शेतातल्या प्रयोगांमधून समजलं. त्यामुळे मेंडेलचं संशोधन आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया ठरलं.

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २६ फेब्रुवारी
१९२८ > ‘पुराभिलेख विद्या’ ( १९७५) ग्रंथाच्या कर्त्यां आणि ख्यातकीर्त नाणकशास्त्र संशोधक डॉ. शोभना लक्ष्मण गोखले यांचा जन्म. महाराष्ट्रीय नाण्यांबाबतही त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. अनेक संशोधन निबंध लिहिणाऱ्या डॉ. गोखले यांनी लोकांना या शास्त्रांची गोडी लावण्यासाठी स्फुटलेखनही केले.
१९६६ > कवी, कादंबरीकार, नाटककार, विचारवंत- निबंधकार ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रयोपवेशानानंतर निधन. जोसेफ मॅझिनीचे चरित्र, ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘शिखांचा इतिहास’ , ‘सहा सोनेरी पाने’ ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदुपदपादशाही’(इंग्रजी) या पुस्तकांतून स्वा. सावरकरांनी लढाऊ स्वधर्मप्रेमी राष्ट्रवादाच्या कल्पनेचा पाठपुरावा केला, तर ‘जात्युच्छेदक निबंधां’तून हिंदू धर्मातील रूढींवर प्रहार केले. ‘सन्यस्त खड्ग’, ‘उशाप’ आणि ‘उत्तरक्रिया ’ ही त्यांची संगीत नाटके रंगभूमीवर आली. ‘काळे पाणी’ व ‘माझी जन्मठेप’ ही त्यांची आत्मपर पुस्तके. तीन खंडकाव्यांसह विपुल काव्यलेखनही स्वा. सावरकरांनी केले.
२००३> भा. रा. भागवतांच्या ‘फास्टर फेणे’चे चित्र काढणारे व्यंगचित्रकार राम वाईरकर कालवश
संजय वझरेकर

वॉर अँड पीस                                                   जखमा : भाग ३
कोणतीही जखम भरून येण्याकरिता प्रथम जखमेकरिता शोधन उपचार त्रिफळा काढय़ाने करावा. जखमेच्या आसपास दडसपणा, पूं असल्यास टाकणखार चूर्ण एक भाग व कणिक चार भाग असे पोटीस करून शेकावे. जखम स्वच्छ धुतल्यानंतर त्या व्रणाच्या जागी मध भरावा. त्यामुळे जखमेतील पूंवाचे प्रमाण कमी होते. पूं जसजसा कमी होत जाईल तसतसे जखम भरून येण्याकरिता म्हणून चांगले तूप, शतधौत घृत, एलादि तेल, दुर्वादि तेल, पारिभद्र तेल, शतावरी सिद्ध तेल, पिंड तेल यांची निवड तारतम्याने करून वापरावे. सामान्यपणे सर्वच वैद्यकीय चिकित्सक जखमेच्या भागाचे कापूस व पट्टीच्या साह्य़ाने ड्रेसिंग करतात. जखमेवर माशा, चिलटे किंवा अन्य किडा, मुंगी बसू नये म्हणून हे योग्यच आहे. पण दिवसभर जखम बांधून ठेवली तर ती उबते. भरून यायला वेळ लागतो. त्यामुळे ज्यांच्या जखमा जुनाट आहेत, गँगरीन झालेले आहे; त्यांना मी शक्य असल्यास मच्छरदाणीत रहावे; जखम उघडी ठेवावी असा सल्ला देत असतो. मच्छरदाणीच्या बाहेर काही निमित्ताने आल्यास जखमेला ड्रेसिंग करायला हवे. जखमेतील रक्तस्राव थांबत नसल्यास जखमेमध्ये अर्जुनसाल चूर्ण भरावे.

जखमा चटकन भरून येण्याकरिता आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ, प्रवाळ व कामदुधा प्र. ३ गोळ्या दोन वेळा घ्याव्या. जखम जुनाट असल्यास गोळ्यांबरोबर महातिक्त घृत दोन चमचे घ्यावे, क्षय, फ्लुरसी, थुंकीतून रक्त पडणे असे असल्यास लाक्षादि घृत दोन चमचे दोन वेळा घ्यावे. मधुमेह विकारामुळे पायांना विशेषत: अंगठा, बोटे अशा ठिकाणी जखमा झाल्या असल्यास रक्त शर्करा हिशोबात मधुमेहाची औषधे घ्यावयास हवी. वर सांगितलेल्या चार औषधांसोबत जादा औषधे म्हणून चंद्रप्रभा, मधुमेह वटी, लाक्षादि गुग्गुळ या गोळ्या घ्याव्या. रक्तशर्करेचे प्रमाण खूप असल्यास मधुमेह काढा घ्यावा.  शक्यतो आळणी जेवण जेवावे. आंबवलेले शिळे अन्न, मेवा मिठाई, पाव बिस्कीट, शंकास्पद बाहेरचे अन्न टाळावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..       बायका
मागच्या लेखातली वाघीण बघितलेली ती बाई केंब्रिज विद्यापीठातल्या मुख्य वसतिगृहात झाडू चिंधी मारणारी वयस्कर मोलकरीण होती. नवरा लवकर गेला मग पै-पैसा वाचवत मी आले असे म्हणत होती. बायका जास्त जगतात. बाळंतरोग, घरातील उपेक्षा, शिध्यातला उरलेला वाटा हिचा, असे असूनही त्याच जास्त जगतात. ८ जनुक मिळालेला पुरुष त्यामुळे त्याच्यातले ळी२३२३ी१ल्ली नावाचे द्रव्य, त्यामुळे फुगलेले स्नायू, त्याचबरोबर येणारा अहंकार, त्यातून जन्म घेतलेली आक्रमकता आणि मग त्यातून घडणारी धडपड चळवळ (बरीचशी निर्थक) यातून पुरुष लवकर झिजतो आणि मरतो. स्त्री लवचिक आणि काटक असते. पुरात झाडे मोडतात परंतु लव्हाळी वाचतात तशातला हा प्रकार आहे. गीतेतल्या तेराव्या अध्यायात प्रकृति आणि पुरुष असाच क्रम आहे. प्रकृति ही निसर्गाचे रूप असते. पुरुष येतो जातो. बायकांना मुलं होतात म्हणून निसर्ग टिकून राहतो. त्यांना मुलं वाढवायची असतात. मुलांना पाजताना, संगोपन करताना एकदा कधी तरी या स्नायूवाल्या पुरुषाला, ‘जा जाऊन काहीतरी शिकार घेऊन ये’ असे हिने सांगितले. तेव्हापासून हा पुरुष शेफारला आहे. हा ८ जनुक असलेला ‘हल्लीचा!’ पुरुष नावाचा जीव कानामागून आला आणि तिखट झाला अशीच स्थिती आहे.
आधुनिक काळातही स्त्रीचे नैसर्गिक रूप स्पष्ट दिसते. अनेक तासांच्या नोकऱ्या करत असल्या तरी जीव घरातल्या पिल्लांकडे लक्ष ठेवून असतो. त्यातल्या त्यात घर कसे सजवता येईल हे तीच बघते. नोकरीवरून घरी जाताना निदान कोथिंबिरीची जुडी तरी ही विकत घेतेच. शनिवार, रविवार स्कूटरवर नवऱ्याच्या मागे बसत असली तरी काय घ्यायचे, काय नाही याचे सारथ्य हीच करते. बाजारात कुठे काय स्वस्त मिळते आहे, हे सगळे तिने वर्तमानपत्रातून अचूक टिपलेले असते. जेवढे परवडेल तेवढे घेण्यासाठी ही जेव्हा मागणी करते तेव्हा ही निसर्गाशी एकरूप होते.  
आमच्याही घरात हेच. गाडी काढून आम्ही लांब पल्ल्याच्या सफरीवर जातो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांमधले फरक, त्यांना आलेली फुले, त्यांचे रंग याचे निरीक्षण ही जसे करते तसे मला जमत नाही. आमच्या घरा शेजारच्या बागेत पोपट येतात ते हिलाच दिसतात. घरावर लावलेल्या जाळीवर कावळा येऊन बसतो तेव्हा खोटय़ा खोटय़ा रागाने ‘मेल्या आलास परत? आज काय पोळी पाहिजे का भात?’ असे हीच म्हणू शकते.

मला नेहमी असा भास होतो की ७७ जनुके असलेल्या या बायका पुरुषांच्या सगळ्या क्रियांमधल्या धडपडीला बघून गालातल्या गालात हसतात आणि म्हणतात जाऊ दे त्याला. बिचाऱ्याला ८ जनुकमिळालं आहे. ते आपल्यातूनच आलं आहे, त्याला समजून घेणं आपलं काम आहे.
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 12:47 pm

Web Title: projects on pisum sativum the heredity is done
टॅग : Kutuhal,Navneet
Next Stories
1 कुतूहल : ‘जेनेटिक्स’चा जनक : ग्रेगर जोहान मेंडेल
2 कुतूहल – जमीन सुपीक आहे, असे कधी म्हणता येते?
3 जे देखे रवी..स्त्रीच खरी
Just Now!
X