तांदूळ उत्पादनात जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो, तर दूध उत्पादनात दुसरा. पण उत्पादकतेची चाचणी लावल्यास भारताचा क्रमांक खूप खाली जातो. उत्पादकता म्हणजे हेक्टरी मिळणारे सरासरी उत्पादन किंवा प्रतिगाय/ म्हैस मिळणारे दूध (लिटरमध्ये). या दिशेने प्रगती करणे शेतकऱ्याच्या, देशातील जनतेच्या तसेच देशाच्याही हिताचे आहे. त्यामुळे त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. या दृष्टीने हरितक्रांतीच्या माध्यमातून प्रयत्न झाले. त्यामुळे भारत धान्याच्या दृष्टीने तुटीचा देश होता तो आता स्वयंपूर्णता गाठून त्यापलीकडे गेला.
अर्थात, सर्वच धान्याच्या बाबतीत हे साध्य झाले नाही, तरी बऱ्याच बाबतीत झाले. त्यामुळे काही जास्तीचे धान्य आपण भविष्यासाठी साठवून ठेवू शकतो. काही उत्पादन निर्यातही करू शकतो. हे करताना रासायनिक खतांचा वापर बेसुमार वाढला. एकपिकी पद्धतीकडे बऱ्याच प्रमाणात वाटचाल झाली. रोख उत्पन्न देणारी पिके घेण्याकडे कल वाढला. इथेच समतोल ढळला. धान्य पिकाखालील जमिनी कमी झाल्या. ऊस, कापूस अशा रोखीने उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे त्या वळवल्या गेल्या. त्यामुळे आज काही अडचणींना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. लोकसंख्यावाढीबरोबर धान्य, डाळी, तेलबिया यांची मागणी वाढली. त्या प्रमाणात त्यांचे उत्पादन वाढले नाही, किंबहुना कमी झाले. परिणामी, सर्व गरजेच्या बाबींमध्ये मागणी जास्त व पुरवठा कमी म्हणून भाववाढ झाली. पण बाजारातील या दरवाढीचा फायदा शेतकऱ्याला मिळतच नाही, ही वस्तुस्थिती आहे.
याचबरोबर व्यवस्थित नियोजन करून उपलब्ध जमिनीचा, पिकाची फेरपालट करून, पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन लागवड करून दोन-तीन पिकांसाठी वापर करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी पद्धतशीर प्रयत्नांची, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची, शेतकऱ्यांच्या अडचणींवर मात करणारे संशोधन करण्याची व ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची नितांत आवश्यकता आहे. कोणत्याही एकाच पिकावर भर न देता आवश्यक ती सर्व पिके अनुकूल अशा ठिकाणांची निवड करून लावली गेली पाहिजेत. तरच दोन्ही प्रश्नांची सोडवणूक होऊ शकेल.
–  दिलीप हेल्रेकर    
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..      रहस्य कथा :  भाग- ३ न्यायप्रक्रिया
माझ्यावर खटला भरला जाणार, हे लक्षात आल्यावर मी पहिल्यांदा  ‘इन्शुरन्स कंपनी’त गेलो. तिथला एकंदर पसारा आणि गोंधळ बघून मी बिचकलोच. माझी केस कोणीतरी बघा, असे म्हणत एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर चकरा मारू लागलो. शेवटी एक दयाळू माणूस भेटला. म्हणाला, ‘कागद दाखवा’ ते दाखविल्यावर ‘कसली अगदीच मच्छर केस आहे’ असे म्हणून त्याने कागद फाइलीत घातला आणि म्हणाला, ‘Tension’ घेऊ नका. तुम्हाला एक वकील देतो’.  (हा Tension शब्द लवकरच मराठी शब्दकोशात घातलेला बरा). वकील मिळाला. ते महाशय एक-दोन वेळा कोर्टात उभे राहिले. तारखा पडल्या आणि मग मला म्हणाले, ‘ही केस गुंतागुंतीची आहे मला मदत लागेल. डॉक्टर आणि वकील, असा दोन्ही पेशा असलेला माणूस हवा.’ तोही मी शोधला आणि त्याला विनवणी करून यांच्या मदतीला उभा केला. नंतरही तारखा पडल्या. माझा जीव टांगणीवरच.
 एवढय़ात Maharashtra Medical Council  ची समांतर चौकशी सुरू झाली आणि त्याची तारीख पडली. तेव्हा मात्र मी ठरविले. आता आपला मामला आपणच लढवायचा.
या कौन्सिलच्या तारखेला बाईसाहेब एकटय़ा आल्या होत्या. थोडय़ा नटल्या होत्या आणि एकंदर खूश दिसत होत्या. मला आधीच्या तारखांमध्ये जो भास होत असे तो आताही झाला. डोळ्यांनी ती मला खुणावत होती की, ‘हे प्रकरण मिटव, काहीतरी सौदा कर.’ एवढय़ात पुकारा झाला आणि आम्ही दोघे आत गेलो. ही बसते न बसते तोच त्या सात-आठ-दहा वैद्यकीय निष्णातांना हिने विचारले, ‘माझ्यावर अन्याय झाला आहे तेव्हा तुम्ही किती नुकसानभरपाई देता, हे सांगा.’ ते सगळे निष्णात खुर्चीतून एक फूट उंच उडाले. त्यांनी- ‘इथे गुन्हा ठरवतात भरपाई नव्हे’ असे सांगितल्यावर ती तडकाफडकी उठून जाऊ लागल्यावर ‘तुमचे म्हणणे सांगा. आम्ही तुमचे ऐकायला आलो आहोत,’ असे तिला सांगण्यात आले, पण ही गप्प बसली.
मग माझी साक्ष झाली. जे घडले ते मी वर्णन केले. कागदपत्रे दिली. रुग्णालयात संप झाला. त्याला मी जबाबदार नाही हे सांगितले. हिची तुम्ही तपासणी करा. काही चुकले असेल तर माझ्यावर कारवाई करा, असा एक धडा वाचला. सुनावणी संपल्याचे जाहीर करण्यात आले आणि काही दिवसांनीच मी निर्दोष असल्याचा निर्णय मला कळविण्यात आला.
मी ते पत्र घेऊन माझ्या वकिलांकडे गेलो. मोठा खुशीत होतो. म्हटले ‘आता ग्राहक मंचासमोरचा खटलाही बारगळणार’ तेव्हा मला एक दारुण न्यायिक सत्यही ऐकविण्यात आले. ‘मामला एक असला तरी दुसरा खटला चालणारच. ग्राहक मंचाचे न्यायालय सार्वभौम आहे. तिथेही तुला अग्निपरीक्षा द्यावीच लागेल.’ मी परत सुन्न झालो.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : रक्ताचे विकार : भाग-३
कारणे : ३) रांजणवाडी- मलावरोधामुळे पोटांत उष्णता वाढणे. पित्त वाढेल असे खाणे, पिणे, वागणे वारंवार घडणे. ४) थुंकीतून रक्त पडणे – क्षय, अधिक श्रमाचे काम दीर्घकाळ, शारीरिक ताकद कमी असतांनाही करीत राहणे. सर्दी, पडसे, खोकला, ताप दीर्घकाळ टिकून राहणे. बोलणे, ओरडणे, वादविवाद, धूम्रपान यांचा अतिरेक. ५) अंगावर लाल ठिपके येणे – रक्ताचे प्रमाण वाढणे, तीक्ष्ण, उष्ण, पित्तवर्धक आहारविहार, तीव्र उन्हाळा, गोवर, कांजिण्याची साथ, ६) संडासवाटे रक्त पडणे – मोड, मूळव्याध, भगंदर, सार्वदेहिक उष्णता, मिरच्या, लोणची, पापड, चहा, मांसाहार, धूम्रपान, मद्यपान यांचा अतिरेक. बसण्याचे आसन उंचसखल असणे. ७) रक्तस्राव  न थांबणे –  पित्त वाढेल असा पातळ पदार्थाचा आहारात जास्त समावेश असणे. उदा. दही, मद्य, शिरका व्हीनेगार, खूप उष्ण रस व सांभार. उन्हातान्हांत, गरम भट्टीशी दीर्घकाळ काम. रक्तघटकांत दोष, अनुवंशिकता. ८) रक्ताचा कर्करोग – यकृत प्लीहा यांचे कार्य बिघडणे. कावीळ, शोथ, जीर्ण ज्वर, पांडु, कृमी या विकारांचा इतिहास. विचार, चिंता, ताण, राग, अनिद्रा यामुळे रक्त तयार होण्याची यंत्रणा नादुरूस्त.
उपचारांची दिशा – नाकातून रक्त वाहात असताना शौचाचे सौम्य औषध देऊन, नाकात तूप साडावे. संडासवाटे रक्त जात असल्यास वांतीच्या औषधांचा विचार व्हावा. डोळ्यातील लालीकरिता पाद/नेत्रपूरण, आहारावर अनम्ल, अलवण असे नियंत्रण ठेवावे. अन्य रक्तवृद्धीत रक्तमोक्षणाचा विचार व्हावा. रक्त वाहात असताना कसेही करून रक्त थांबवावे, पांडुता येऊ नये यावर लक्ष हवे.
पथ्यापथ्य – उष्ण, तिखट, आंबटखारट पदार्थ खाऊं नये. जागरण, उन्हात हिंडणे, चिंता, फाजील श्रम टाळावे. दही, मासे, लोणचेपापड, मिरच्या, चहा, धूम्रपान, तंबाखू, मद्य टाळावे. करडई,  जवस, कारळे, मोहरी, हिंग, लसूण, हळद नको! तूप, दूध, अंजीर, मनुका, धने, कोथिंबीर, जिरे, मूग, ज्वारी, दुधी, कारले, पडवळ, दोडका यांचा आहारात वापर असावा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ८ जून
१९१० > तत्त्वचिंतक, समीक्षक, विचारवंत दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म. लेख तसेच कथा-कविताही त्यांनी लिहिल्या. तत्कालीन मासिकांतून छापून आलेले त्यांचे बरेच लिखाण आजही पुस्तकरूप झालेले नसले, तरी ‘साहित्यविचार’, ‘हेगेल : जीवन व तत्त्वज्ञान’, ‘केशवसुतांची काव्यदृष्टी’, ‘आधुनिक मराठी काव्य’, ‘अणुयुगातील मानवधर्म’, ‘समाजचिंतन’ आदी पुस्तके प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक म्हणून त्यांनी काम केले होते. १९६९ > ‘सिनेमासृष्टी’ या १९३२ साली सुरू झालेल्या मराठीतील पहिल्या सिने-नाटय़ नियतकालिकाचे कर्ते, लेखक-पत्रकार आणि कोशकार गणेश रंगो भिडे यांचे निधन. ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर’, ‘फोटो कसे घ्यावेत’, ‘सावरकर सूत्रे’, आदी पुस्तके लिहिणाऱ्या भिडे यांनी ‘व्यावहारिक ज्ञानकोश’ (५ खंड), ‘अभिनव ज्ञानकोश’ ‘बालकोश’, अशा कोशांचे संपादनही केले.
१९९५ > ‘रामनगरी’ या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणाऱ्या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर यांचे निधन. उत्कृष्ट विनोदी अभिनेते असलेले नगरकर, राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात होते. तेथे सहज सांगितलेल्या किश्श्यांचे रूपांतर म्हणजे पुढे त्यांनीच लिहिलेले हे पुस्तक!  
– संजय वझरेकर