सर्कशींतील हत्तींचा छळ असो, की जहाज कारखान्यामुळे ऑलिव्ह रिडले या कासवांच्या नष्ट होणाऱ्या घरटय़ांविरोधात उठवलेला आवाज असो, अथवा गीर अभयारण्याच्या सीमेलगत असलेल्या कोडिनारमधल्या अवैध खाणी असोत; सौराष्ट्र, गुजरातमधल्या पर्यावरणविरोधी कोणत्याही योजना, प्रकल्पांविरोधात अमित जेठवा हे निडर पर्यावरणवादी कार्यकर्ते नेहमी कायदेशीर लढाईसाठी पुढाकार घेत.

अमित जेठवा यांचा जन्म १९७५ साली गुजरातमधील अमरेली जिल्ह्य़ातील खंबा गावात झाला. ते सरकारी आरोग्य विभागात ‘फार्मासिस्ट’ म्हणून काम करत होते. तिथे सरकारी औषधांच्या खासगी विक्रीचा गैरव्यवहार त्यांनी उघडकीस आणला. या कामगिरीचे ‘बक्षीस’ म्हणून प्रथम कच्छ आणि त्यानंतर महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील दुर्गम जिल्ह्य़ात त्यांची बदली करण्यात आली. २००७ साली ही नोकरी त्यांनी सोडली आणि पूर्णवेळ कार्यकर्तेपण स्वीकारले.

‘गीर नेचर युथ क्लब’ या संस्थेची स्थापना करून तिच्यामार्फत खंबा परिसरातील अनेक अवैध आणि पर्यावरणाला हानिकारक ठरतील असे प्रकल्प त्यांनी उघडकीस आणले. पुढे त्याच परिसराला त्यांनी आपले कार्यस्थान बनविले. २००७ मध्ये जेठवा यांनी गीर जंगलात सिंहांच्या अनाकलनीय मृत्यूंमागील वास्तव शोधून काढले. त्यामुळे सिंहांची शिकार करणारी एक मोठी टोळी उघडकीस आली. बर्दा अभयारण्याच्या परिसरातील सिमेंट कारखान्याविरोधात स्थानिक लोकांना एकत्रित करून जेठवा यांनी मोठे जनआंदोलन उभे केले. गीर जंगलातील लाकूड तस्करी, तसेच भावनगरमधील पाणथळ भूमीवर होणाऱ्या अतिक्रमणांविरोधातही त्यांनी आवाज उठवला. सिनेअभिनेता सलमान खानला काळवीट हत्या प्रकरणात शिक्षा झाली. या प्रकरणात पुरावे जमा करण्यात जेठवा यांचा महत्त्वाचा वाटा होता.

अमित जेठवा यांनी माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करत सर्वप्रथम गीर अभयारण्यातील ‘बफर झोन’मध्ये सुरू असलेल्या अवैध खाणकामांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. या माहितीच्या आधारे त्यांनी अवैध खाणकामांविरोधात गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचदरम्यान २०१० सालच्या जुलैमध्ये जेठवा यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात पर्यावरण आणि वन्यजीवांनी आपला हा संरक्षक गमावला. परंतु जेठवा यांनी केलेल्या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून, या भागातील अनेक खाण कंपन्यांना न्यायालयाने नोटीस पाठवल्या आणि त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला. तसेच राज्य सरकारवरही बेकायदा उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org