– डॉ. यश वेलणकर

पातंजल योगसूत्रानुसार मनात येणारे विचार पाच प्रकारचे असतात. माणसाला आकलन होते ते योग्य किंवा चुकीचे असे दोन्ही प्रकारचे असू शकते. योग्य आकलनाला ‘प्रमाण’ आणि अयोग्य आकलनाला ‘विपर्यय’ म्हणतात. ‘समोर साप आहे’ असा विचार येतो; पण जवळ जाऊन पाहिले की, ती दोरी आहे हे दिसते. ‘साप आहे’ वाटणे म्हणजे विपर्यय आणि दोरी आहे हे ज्ञान म्हणजे प्रमाण होय. आकलन नेहमी योग्य असतेच असे नाही, हेच योगातही सांगितले आहे. योग्य किंवा अयोग्य ज्ञान प्रत्यक्ष, अनुमान आणि शाब्द अशा तीन मार्गानी होते. पाच ज्ञानेंद्रिये माहिती देतात ते प्रत्यक्ष, त्यावरून तर्क करून काढले जाते ते अनुमान आणि दुसऱ्या व्यक्तीचे ऐकून किंवा वाचून आपण विश्वास ठेवतो ते शाब्द प्रमाण होय. या तीनही प्रकारांनी चुकीचे ज्ञानही होऊ शकते. वर्तमानपत्रात, टीव्ही किंवा समाजमाध्यमांवरून आपण माहिती घेतो ती शाब्द प्रमाणानुसार असते. मात्र ती माहिती नेहमी बरोबरच असेल असा विश्वास ठेवणे योग्य नाही. ती माहिती नेहमी चूकच असते असे अनुमानही नेहमीच योग्य होणार नाही. आपल्याला झालेले आकलन ही एक शक्यता आहे, असेच योगशास्त्राचेही प्रतिपादन आहे.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Job Opportunity Recruitment of License Inspector Posts
नोकरीची संधी: अनुज्ञापन निरीक्षकपदांची भरती

तिसरी वृत्ती म्हणजे ‘विकल्प’! याला आजच्या भाषेत कल्पना म्हणता येईल. अस्तित्वात नसलेल्या गोष्टीविषयी अनेक वेगवेगळे विचार मनात येतात, त्यांना विकल्प म्हणतात. भविष्यकाळाविषयी मनात येणारे विचार, अमूर्त चिंतन हे सारे विकल्प या प्रकारात घेता येईल. भूतकाळातील आठवणी म्हणजे ‘स्मृती’ या चौथ्या प्रकारच्या वृत्ती आहेत. माणसाच्या मनात येणाऱ्या साऱ्या विचारांचे या चार प्रकारच्या वृत्तींमध्ये वर्गीकरण करता येते. प्रमाण, विपर्यय, विकल्प आणि स्मृती यापेक्षा वेगळे विचार असत नाहीत. समोर दिसणारा पदार्थ गुलाबजाम आहे हे प्रमाण आणि मी तो खाणार आहे हा विचार म्हणजे विकल्प होय. तो खावा की खाऊ नये, असे परस्परविरोधी विचार हे विकल्प या वृत्तीचे वैशिष्टय़ आहे.

योगानुसार ‘निद्रा’ ही पाचवी वृत्ती आहे. झोप येऊ लागली आहे याचे माणसाला ज्ञान होते; तो झोपेत असतो त्या वेळी अन्य साऱ्या वृत्तींचा अभाव असतो. त्यामुळे ही वेगळी वृत्ती आहे. मनातील विचारांकडे ध्यान दिले, की या वृत्ती लक्षात घेऊन त्यांचे वर्गीकरण शक्य होते. मनाकडे साक्षीभावाने पाहण्यासाठी असे वर्गीकरण उपयोगी आहे.

yashwel@gmail.com