डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शारीरिक आजार होऊ नये म्हणून सध्या आपण बरीच काळजी घेत आहोत. ती घ्यायला हवीच. पण त्याबरोबर मानसिक आजार कसे होतात आणि ते कसे टाळता येतील, हेही समजून घ्यायला हवे. घरात राहावे लागणे, त्याचा व्यवसायावर दुष्परिणाम होणे हा काही जणांसाठी मानसिक आघात आहे. अशा आघाताचा दुष्परिणाम आघात होऊन गेल्यानंतरही जाणवू शकतो. म्हणजे हा कालावधी संपला, सारे उद्योग पुन्हा सुरू झाले तरीदेखील भीती वाटणे, त्यामुळे झोप न लागणे, झोपेत भीतीदायक स्वप्ने पडणे, छातीत धडधड होणे असे त्रास होऊ शकतात. ते टाळायचे असतील तर सध्या संवेदनांची सजगता वाढवणे आवश्यक आहे. मनात अस्वस्थता आली, भीतीचा विचार आला, की काही रसायने पाझरतात. त्यामुळे छातीत धडधड, छातीत वा डोक्यात भार येणे, पोटात कालवाकालव, हातापायांत कंप, अंगावर भीतीने शहारा येणे अशा संवेदना निर्माण होतात. या अप्रिय संवेदनांना आपला भावनिक मेंदू ‘या नकोत’ अशी प्रतिक्रिया देतो. मात्र त्यामुळेच त्यांची आठवण मेंदूत कोरली जाते. मेंदूत साठलेल्या या त्रासदायक आठवणीच नंतर तणाव निर्माण करतात.

तो नंतर होणारा त्रास टाळायचा असेल, तर सध्या साक्षीभाव विकसित करायला हवा. त्यासाठी रोज दहा मिनिटे शांत बसून शरीराकडे लक्ष द्यायचे. आंघोळ करताना सर्वागाला होणारा पाण्याचा स्पर्श लक्ष देऊन अनुभवायचा. असे केल्याने शरीरातील संवेदना जाणणारा मेंदूचा भाग सक्रिय होतो. त्यामुळे मन अस्वस्थ झाल्यावर शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना समजू लागतात. अन्यथा त्या निर्माण होत असल्या तरी माणसाच्या जागृत मनाला समजत नाहीत. त्यामुळेच त्या नकळत साठत जातात आणि नंतर तणाव निर्माण करतात. तो टाळण्यासाठी सध्या मनात अस्वस्थता आली, की शरीरावर लक्ष न्यायचे. छाती, पोट, डोके येथे काही जाणवते का, हे उत्सुकतेने पाहायचे. जे काही जाणवते ते कुठपर्यंत आहे  आणि कुठे नाही, हे पाहायचे. असे केल्याने भावनिक मेंदूची या संवेदनांना प्रतिक्रिया करण्याची सवय बदलली जाते. तो मेंदू अधिक संवेदनशील झाल्याने आघाताचा कालखंड संपला तरी तणावाचा त्रास होत राहतो. माणूस या संवेदनांचा स्वीकार करतो, त्या वेळी भावनिक मेंदूची सक्रियता कमी करतो. त्यामुळे शांत बसून शरीराकडे लक्ष नेण्याच्या सरावाने भविष्यातील मानसिक आजारही टाळता येतील.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on prevention of post traumatic stress abn
First published on: 24-04-2020 at 00:02 IST