त्रावणकोर संस्थानात मातृसत्ताक राज्यपद्धतीची परंपरा होती. राज्याला कोणी स्त्री वारस नसल्याने सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा याच्या चौथ्या पिढीतील सेथु लक्ष्मीबाई आणि सेथुपार्वतीबाई यांना त्रावणकोरच्या राजघराण्याने दत्तक घेतले. १९२४ मध्ये त्रावणकोर महाराजा मुलम थिरुनलच्या मृत्यूनंतर श्री चिथिरा थिरुनल गादीवर आला, परंतु तो त्यावेळी केवळ १२ वर्षांचा असल्यामुळे महाराणी सेथु लक्ष्मीबाईने इ.स. १९२४ ते १९३१ या काळात पालक कारभारी म्हणून काम पाहिले.
या अल्पावधीत सेथु लक्ष्मीबाईने एक प्रशासक म्हणून अनेक सामाजिक सुधारणा केल्या. तिने अनेक शतकांपासून चालत आलेली देवदासी आणि धार्मिक विधींमध्ये पशुबळी देण्याची परंपरा कायद्याने बंद केली. १९२५ साली महात्मा गांधींनी त्रावणकोर राज्यातील वायकोम येथील प्रसिद्ध महादेव मंदिरात दलितांनाही प्रवेश खुला करण्यासाठी सत्याग्रह केला. त्या काळात त्या मंदिराकडे जाणारे रस्तेसुद्धा हरिजनांसाठी खुले नव्हते. महात्मा गांधींनी सेथु लक्ष्मीबाईला भेटून या बाबतीत चर्चा केली. लक्ष्मीबाईने त्वरित कारवाई करून मंदिराकडे जाणारे सार्वजनिक रस्ते सर्व जाती-धर्मासाठी कायद्याने खुले केले.
लक्ष्मीबाईने १९२५ साली ग्रामीण भागांमध्ये पंचायत राज्य स्थापन करून स्थानिक लोकांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले. वैद्यकीय सुविधा अद्ययावत करून एका स्त्री वैद्याला राज्याच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुखपद दिले. लक्ष्मीबाईने क्विलॉन-एर्णाकुलम रेल्वे सेवा सुरू करून सार्वजनिक दूरध्वनींचे जाळे स्थापन केले.
त्रावणकोर राज्याच्या महसुलापकी २२ टक्के केवळ शिक्षण व्यवस्थेसाठी खर्च करून लक्ष्मीबाईने या संस्थानाला, भारतीय राज्यांपकी सर्वाधिक सुशिक्षित राज्य असा लौकिक मिळवून दिला. १९३१ मध्ये राजेपदाचा वारस चिथिरा थिरुनल बलरामा वर्मा १९ वर्षांचा झाल्यावर सेथु लक्ष्मीबाई राज्यकारभारातून निवृत्त झाली.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

कुतूहल – वैद्यक तंत्र वस्त्रे -भाग २
स्वास्थ्य आणि आरोग्य क्षेत्र : स्वास्थ्य आणि आरोग्य क्षेत्र हे वैद्यक तंत्र वस्त्रांच्या वापराच्या एक मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्त्रांची कक्षा फार मोठी आहे. प्रामुख्याने या प्रकारामध्ये हॉस्पिटल आणि शस्त्रक्रिया कक्षामध्ये वापरण्यात येणारी वस्त्र व शारीरिक काळजीसाठी उपयोगात येणाऱ्या वस्त्रांचा समावेश होतो. शस्त्रक्रियेच्या वेळी वापरण्यात येणारे गाऊन, मुखत्राण व टोपी, हॉस्पिटलच्या वॉर्डामध्ये वापरण्यात येणारी वस्त्रे, सॅनिटरी नॅपकीन, बेबी डायपर, इत्यादी वैद्यक तंत्र वस्त्रांची काही उदाहरणे आहेत. शस्त्रक्रिया करताना तिथे उपस्थित असलेले डॉक्टर आणि इतर सर्व वर्गातील कर्मचारी यांची वर उल्लेख केलेली सर्व वस्त्रे शस्त्रक्रियेपूर्वी र्निजतुक करून घेतली जातात. एकदा असा वापर झाल्यावरही तोच मार्ग अनुसरला जातो. असे नियमितपणे केले जात असल्यामुळे कापडी वस्त्रे उपयुक्त आणि किफायतशीर ठरतात.
शरीरबाह्य साधने : अशा प्रकारच्या शरीरबाह्य साधनांचा उपयोग हा शरीरातील मूत्राशय, हृदय, फुप्फुसे, यकृत यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांना मदत करण्यासाठी होतो. ही शरीरबाह्य साधने म्हणजे एक प्रकारचे यांत्रिक अवयव असून त्यांचा उपयोग रक्तशुद्धीकरणासाठी करण्यात येतो. पेस मेकर, कृत्रिम मूत्राशय, कृत्रिम फुप्फुसे, कृत्रिम यकृत ही या प्रकारच्या साधनांची उत्तम उदाहरणे आहेत. कृत्रिम मूत्राशयाचा वापर हा शरीरातील टाकाऊ पदार्थ रोग्याच्या रक्तातून बाहेर काढून टाकण्यासाठी केला जातो. कृत्रिम मूत्राशय तयार करण्यासाठी पॉलिस्टर आणि व्हिस्कोजच्या पोकळ तंतूंचा वापर केला जातो. कृत्रिम यकृताचा उपयोग रोग्याच्या रक्तातील प्लाझ्मा वेगळा करून काढून टाकण्यासाठी तसेच नवीन ताजा प्लाझ्मा पुरविण्यासाठी करण्यात येतो. यासाठी व्हिस्कोजच्या पोकळ तंतूंचा वापर करण्यात येतो.
कृत्रिम फुप्फुसांचा उपयोग रोग्याच्या रक्तातील कार्बन डायऑक्साइड वायू काढून टाकून ताज्या रक्ताचा पुरवठा करण्यासाठी केला जातो. यासाठी पॉलिप्रॉपिलीन आणि सिलिकॉनच्या पोकळ तंतूंचा वापर करण्यात येतो.
रोपणक्षम साधने : या प्रकारचे पदार्थ जखमा शिवण्यासाठी तसेच बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येतात. (उदा. कृत्रिम रक्तवाहिन्या, कृत्रिम मज्जातंतू इत्यादी.) जर असे घटक शरीराने स्वीकारावयाची असतील तर अशा वस्त्रांसाठी जैविक सुसंगतता हा सर्वात आवश्यक गुणधर्म असतो.
चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org