– सुनीत पोतनीस

१८९६ पासून फ्रेंच वसाहत बनून परकीय अंमलाखाली राहिलेल्या मादागास्कर बेटावरील जनतेस दुसऱ्या महायुद्धकाळात प्रथमच आपल्या पारतंत्र्याची जाणीव होऊन स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली. १९४७ साली मालागासी जनतेच्या असंतोषाचे रूपांतर फ्रेंच वसाहत प्रशासकांविरोधी उठावात झाले. या उठावाला प्रतिसाद देताना मादागास्करला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देण्याचे फ्रेंच सरकारने ठरवले. प्रथम प्रशासकीय व्यवस्थेत काही बदल करून फ्रेंचांनी सरकारमधील काही खाती मादागास्करच्या मालागासी नेत्यांकडे सोपवत १९५८ मध्ये स्वतंत्र मालागासींच्या नवदेशाची घोषणा केली. हंगामी सरकारचा कार्यकाळ संपल्यावर स्थानिक नेत्यांनी फ्रेंचांच्या मार्गदर्शनाखाली राज्यघटना तयार करून पूर्णपणे सार्वभौम मादागास्करची निर्मितीची घोषणा २६ जून १९६० रोजी केली. पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून फिलबर्ट सिरानेना यांची नियुक्ती झाली.

मादागास्करच्या लोकांना फ्रेंचांकडून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हिंसक आंदोलन, चळवळ करावी लागली नाही. परंतु या देशाचा त्यानंतरचा राजकीय प्रवास चार वेळा राज्यघटना बदलून चार वेळा नवीन प्रजासत्ताक सरकार सत्तेवर येण्यात झाला. १९६० साली फ्रेंचांनी नियुक्त केलेले राष्ट्राध्यक्ष फिलबर्ट यांनी आर्थिक, राजकीय व शिक्षणविषयक निर्णय फ्रेंचांच्या सल्ल्याने घेऊन त्याचा अतिरेक केला. शाळांमधले शिक्षक फ्रेंच, सरकारी कामांसाठी तंत्रज्ञ फ्रेंच वगैरेंमुळे फिलबर्ट हे स्वत: मालागासी असूनही विद्यार्थी व शेतकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलन करून १९७२ मध्ये हे सरकार उलथवून टाकले. फिलबर्ट सरकार बरखास्त झाल्यावर मादागास्करचा ताबा लष्कराने घेतला. पुढची २१ वर्षे या देशात लष्करशाही होती. त्यापैकी शेवटची दहा-बारा वर्षे सरकारवर माक्र्सवादी-समाजवादी प्रणालीचा प्रभाव राहिला. या सरकारच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळून देश कर्जबाजारी झाला. जनतेची परिस्थिती हलाखीची होऊन सर्वत्र निदर्शने आणि दंगली झाल्यामुळे लष्करी सरकार बरखास्त करून हंगामी सरकार नियुक्त केले गेले. १९९२ साली राज्यघटना नव्याने लिहून सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. सध्या  मादागास्करमध्ये अध्यक्षीय, बहुपक्षीय लोकशाही प्रजासत्ताक राज्यव्यवस्था आहे. १९ जानेवारी २०१९ ला झालेल्या निवडणुकीत बहुमताने निवडून आलेले अँड्रि राजोलिना हे सध्या मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षपदी आहेत.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com