डॉ. माधवी वैद्य

कमलाबाई अतिशय नाजूक शरीरयष्टीच्या. तब्येत म्हणजे अगदी तोळामासा. सतत आजारपण पाठीशी लागलेलं. देवदर्शनाला गेल्या नसतील इतक्या डॉक्टर दर्शनासाठी जायला लागे त्यांना! कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना जाता येत नसे. ‘तब्येत ठीक नाही हो. नाहीतर नक्की आले असते.’ हे त्यांचे एक ठरीव उत्तर असे. त्यांची तब्येतच इतकी नाजूक की वारा आला तरी उडून जातील. त्यांच्या मैत्रिणी त्यांच्या तब्येतीवरून त्यांची खूप थट्टामस्करी करीत असत. एकदा त्यांना सोसायटीच्या हळदीकुंकवाला बोलवायला त्यांच्या एका मैत्रिणीचा फोन आला. ती त्यांना म्हणाली,‘‘कमलाबाई! उद्या आपल्या सोसायटीचं हळदीकुंकू आहे. पण बघा बाई तुम्हाला बरं असेल तर या. नाहीतर आम्ही तुम्हाला हळदीकुंकू लावायचो आणि ते नाकावर पाघळून तुम्हाला शिंका, सर्दी सुरू व्हायची! तुमचं काही सांगता येत नाही बाई!’’ खरंतर कमलाबाई या मस्करीनेही दुखावल्या जायच्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी व्यथित होऊन त्या एकदा गेल्या डॉक्टरांकडे. त्यांना म्हणू लागल्या,‘‘डॉक्टर ! मी मरेपर्यंत अशीच राहणार का हो? सतत आजारपणाचा मला खरंच आता कंटाळा यायला लागला आहे. माझ्या तब्येतीला केव्हा काय होईल त्याचा काही अंदाजच लागत नाहीये मला. काही तरी जालीम उपाय करा आता.’’ डॉक्टर हसले, त्यांना म्हणाले, ‘‘अहो, इतकी नाजूक प्रकृती मी आजवर कोणाचीच बघितलेली नाही. दुपारच्या सावलीचा गारवाही तुमच्या तब्येतीला झोल द्यायला कारणीभूत होतो. तुमच्याकडे बघितल्यावर मला एक म्हण नेहेमी आठवते, ‘आरती घेतल्यावर उष्ण आणि तीर्थ घेतल्यावर सैत’ तशी आहे तुमची तब्येत! अहो, निरांजनाच्या ज्योतीवर हात धरल्याने तुम्हाला होते उष्णता आणि तीर्थ प्राशन केलेत की तुम्हाला वाजते थंडी! पंचाईतच आहे खरी! बघू काय करता येईल ते!’’