निर्जंतुकीकरण एखादे द्रावण उकळून घेतले तरी त्यात जंतूंची वाढ का होते? इ.स.१८७०च्या सुमारास चार्ल्स एडवर्ड चेंबरलॅण्ड या फ्रेंच तंत्रज्ञाने लुई पाश्चर यांच्या प्रयोगशाळेतच याचे कारण शोधायला सुरुवात केली. प्रयोगशाळेत द्रव निर्जंतुक करण्यासाठी ते बकपात्रात ठेवून १०० अंश सेल्सिअस तापमानास उकळले जात असे पण द्रव निर्जंतुक होत नसे. काही सूक्ष्मजीव आणि बीजपेशी त्या तापमानाला मरत नसत. चेंबरलॅण्ड यांचा असा होरा होता की १०० अंश सेल्सिअस तापमान अपुरे ठरत असावे. तापमान १० ते २० अंशानी वाढवल्यावर मात्र सर्व जंतू व त्यांची बीजेदेखील नष्ट झाली. भविष्यात निर्जंतुकीकरणाचे तापमान १२१ अंश सेल्सिअस निश्चित झाले. द्रव ज्या पात्रात निर्जंतुक केले जात त्या पात्रात जंतू उरलेले असावेत ही शक्यता लक्षात घेऊन चेंबरलॅण्डने पात्रेही निर्जंतुक केली. अशा तऱ्हेने पात्रे आणि द्रव दोन्ही निर्जंतुक करण्याची व्यवस्था चेंबरलॅण्ड यांनी केली. चेंबरलॅण्ड यांनी अशाप्रकारच्या निर्जंतुकीकरणासाठी ऑटोक्लेव हे उपकरण तयार केले. आजतागायत साऱ्या विश्वात निर्जंतुकीकरणासाठी ते वापरले जाते.

ऑटोक्लेवमुळेच लुई पाश्चर यांना जीवजनन आणि जंतू सिद्धांत (जर्म थियरी) सिद्ध करणे शक्य झाले. त्या काळी चिनी माती किंवा विटेचा चुरा यामधून गाळलेले पाणी प्रयोगासाठी वापरले जाई. पण अशा गाळणीतून सूक्ष्मजीव निसटतात असा चेंबरलॅण्ड यांचा कयास होता म्हणून जंतु गाळण्यासाठी त्यांनी पोर्सेलीनचे गाळणे तयार केले. या गाळणीची छिद्रे सूक्ष्मजीवाणूंच्या आकारापेक्षा लहान होती. या गाळणीचे नावच ‘चेंबरलॅण्ड-पाश्चर गाळणी’ असे पडले. या गाळणीमुळे इ.स.१८९४च्या विषमज्वराच्या साथीत हजारो लोकांचे प्राण वाचले. या गाळणीचा उपयोग करून पाश्चर यांनी घटसर्प आणि धनुर्वात यांची विषद्रव्ये शोधली. त्याच बरोबर कोंबडय़ांना होणारा कॉलरा, मेंढय़ांमधील अँथ्रॅक्स या रोगांविरोधात लस तयार केली.

इ.स.१८६७ मध्ये जोसेफ लिस्टर यांना रोग्यांची सुश्रूषा करताना असे आढळून आले की जवळपास ७०-८० टक्के रोगी शस्त्रक्रिया झाल्यानंतर होणाऱ्या जंतूंच्या प्रादुर्भावाने दगावत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी आपल्या अधिकारात शस्त्रक्रियेदरम्यान काबरेलिक आम्लाने निर्जंतुक केलेले हातमोजे वापरणे, शस्त्रक्रियागृह काबरेलिक आम्ल फवाऱ्याद्वारे निर्जंतुक करणे, जखमांवरील पट्टय़ा निर्जंतुक करून वापरणे, शस्त्रक्रियेची उपकरणे निर्जंतुक करणे, सर्व शल्यचिकित्सकांनी शस्त्रक्रियेपूर्वी पाच टक्के काबरेलिक आम्लाने हात स्वच्छ धुऊन घेणे अशी आग्रही भूमिका घेतली आणि इथूनच त्यांच्या ‘निर्जंतुक शस्त्रक्रिया’ या संकल्पनेचा उदय झाला. यामुळे शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या जंतूंचा प्रादुर्भाव ८० टक्क्यावरून जवळजवळ शून्य टक्क्यावर आला.

– डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईमेल : office@mavipa.org