एक्झॉट रंगाई पद्धतीचा वापर तंतू, सूत किंवा कापड तिन्ही प्रकारांसाठी करता येतो. ही पद्धत पुढीलप्रमाणे असते. प्रथम रंगाचे द्रावण पाण्यात तयार केले जाते. त्यामध्ये जलशोषक आणि अपस्कृत पदार्थाचा वापर केलेला असतो. या द्रावणाचा वापर करून रंगाई केली जाते. मिठाचा वापर रंगाची तंतूबरोबर/ सुताबरोबर/ कापडाबरोबर जास्तीत जास्त अभिक्रिया व्हावी यासाठी केला जातो. ज्या वेळी हा रंग तंतू/ सूत/ कापडावर बसतो, त्यानंतर त्या द्रावणात अल्कली घातले जाते. याचा फायदा रंग पक्का बसण्याला होतो. अर्थातच रंगाईची वेळ आणि द्रावणाचे तापमान या घटकांचे महत्त्वही रंग पक्का बसण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.

एकदा रंगाई होऊन तंतू/ सूत/ कापड तयार झाले की त्याबरोबर अभिक्रिया न झालेला रंग, साबणाच्या तीव्र स्वरूपाच्या द्रावणाचा वापर करून धुऊन काढला जातो. त्यानंतर गरम पाण्याने तसेच थंड पाण्याने धुलाई केली जाते. या करिता अ‍ॅसिटिक आम्लाचा वापर केला जातो. यामुळे रंगाचा पक्केपणा चांगला मिळायला मदत होते.

पॅिडग पद्धतीचा वापर फक्त कापडासाठीच करता येतो. या पद्धतीत रंगाचे द्रावण आणि आम्लारीचे द्रावण वेगवेगळ्या हौदांमध्ये तयार केले जाते. प्रथम सुरकुतीविरहित कापड रंगाईचे द्रावण असलेल्या हौदात बुडवून पुढे नेले जाते. त्यासाठी मार्गदर्शक रुळांचा वापर केला जातो. मग ते कापड आम्लारीचे द्रावण असलेल्या हौदातून पाठवले जाते. यामुळे रंगाचे द्रावण आणि आम्लारीचे मिश्रण होते. त्या स्थितीत रंगाची तंतूबरोबर अभिक्रिया घडून येते. प्रक्रिया न झालेला रंग कापड पिळून काढणाऱ्या दोन रोलच्या माध्यमातून वेगळा केला जातो. या पद्धतीत कपडा साधारण १२ ते २४ तास फिरता ठेवला जातो. हा कालावधीत रंगछटेच्या गडदपणावर अवलंबून असतो. समजा कपडा १२ तास असा ठेवला तर फिकी रंगछटा मिळते तर २४ तास ठेवला तर गडद रंगछटा प्राप्त होते. असा रंगवलेला कपडा १२ ते २४ तास फिरत ठेवला जातो, म्हणजे रंग पक्का बसायला मदत होते. मग हे कापड साबणाच्या पाण्यातून पाच ते सात वेळा धुऊन घेतले जाते. कापड धुताना आळीपाळीने थंड व गरम पाण्याचा वापर करतात. शेवटी उदासिनीकरण करुन कापड सुकवले जाते.

 सतीश दिंडे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

 

संस्थानांची बखर – सत्तांतर

इ.स. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी ताराबाईंचा पन्हाळा घेतला; परंतु पुढच्या चारच महिन्यांत सावंतवाडीच्या खेम सावंताच्या मदतीने ताराबाईने पन्हाळा हस्तगत करून १७१० मध्ये शिवाजी प्रथम (कोल्हापूर) सार्वभौम राजे म्हणून जाहीर करून कोल्हापूरच्या स्वतंत्र राज्याची द्वाही फिरविली.

मधल्या काळात ताराबाईंच्या स्वभावामुळे कान्होजी आंग्रे, सिधोजी घोरपडे, दमाजी थोरात वगरे प्रमुख सेनानी कोल्हापूर सोडून शाहू महाराजांच्या पक्षात गेले. तसेच राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई यांच्या गटाची ताराबाईंशी धुसफुस चालूच होती. या काळात कोल्हापूर राज्यात रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारखा कर्तबगार, निष्ठावान पुरुष दुसरा कोणीही नव्हता. १७१० सालानंतरच्या राज्यातल्या एकंदर परिस्थितीमुळे रामचंद्रपंतांना ताराबाई आणि शिवाजी यांच्या शासनाखालील राज्याचे भवितव्य सुरक्षित वाटेना. त्यांनी इतर जबाबदार व्यक्तींच्या सल्ल्याने सप्टेंबर १७१४ मध्ये कोल्हापूर राज्यात सत्तांतर घडवून आणले.

राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई यांच्या हातात कारभाराची सूत्रे देऊन त्यांचा पुत्र संभाजी यास कोल्हापूरच्या गादीवर बसविले. ताराबाई आणि शिवाजी प्रथम यांना बंदिवासात टाकले गेले. संभाजी (कोल्हापूर) याची राजकीय कारकीर्द इ.स. १७१४ ते १७६० अशी झाली. संभाजी महाराज (कोल्हापूर) आणि शाहू महाराज यांच्या फौजांमध्ये चार लढाया झाल्या. शेवटची लढाई १७३१ मध्ये होऊन कोल्हापूरच्या फौजेचा वारणेच्या काठी पराभव झाला.

संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com