जैवविविधतेचे संरक्षण हे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे. लाखो वर्षांपासून आदिवासींनी जंगल आणि जमिनीचे संरक्षण करून जैवविविधता वाचवली होती. परंतु जसा विकास होतो, तसा सुधारणेच्या नावाखाली जैवविविधतेचा बळी दिला जातो आणि त्याचसोबत स्थानिकांचादेखील!

याचे उत्तम उदाहरण म्हणजे यलोस्टोन, सिकोइया आणि योसेमिटी ही राष्ट्रीय उद्याने. या उद्यानांचा विकास करताना तेथील मूळ अमेरिकी लोकांना हटविण्यात आले. ते अल्प प्रमाणात शिकार करून जगत होते. परंतु संवर्धनाच्या नावाखाली एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांना तेथून हुसकावण्यात आले. विकसनशील देशांत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अशाच प्रकारची संरक्षित वन क्षेत्रे निर्माण करण्यास सुरुवात झाली. पण त्यामुळे लक्षावधी ‘संवर्धनाचे निर्वासित’ तयार झाले. जोपर्यंत हे मूळ रहिवासी या जंगलांत राहात होते, तोपर्यंत वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा वेग फारसा नव्हता. परंतु संवर्धन आणि संरक्षण झाल्यानंतर आसपासच्या औद्योगिकीकरणामुळे या संरक्षित क्षेत्रात जास्त प्रमाणात घुसखोरी होत गेली. यामुळे अमेरिकी सरकारने आपल्या कायद्यात काही सुधारणा केल्या.

‘द युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी’च्या २०२१ साली झालेल्या सभेत जैवविविधता जपताना स्थानिक आदिवासी व इतर समाजांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या मदतीने संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही शासनापेक्षा आदिवासी लोकसमूह आणि स्थानिक जनता ही जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उत्तम ठरते, हे अभ्यासातून शास्त्रज्ञांच्याही लक्षात आले आहे. संरक्षण आणि संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या पृथ्वीवरच्या १७ टक्के जागा आता पुन्हा अशा लोकसमुदायाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण हेच लोक कोणत्याही शासनकर्त्यांपेक्षा अथवा औद्योगिकीकरण करणाऱ्यांपेक्षा आपापल्या क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण आणि पुनर्जीवन खूप नेटाने करतात, असे सगळय़ांच्याच लक्षात आले आहे. अमेरिकेत ‘बायडेन प्रशासनाने’ मे २०२१ मध्ये स्थानिक लोकसमुदायांना जैवविविधता संवर्धन आणि पुनस्र्थापना यासाठी शपथ घेण्याची विनंती केली आहे. आता जगातल्या महासत्तांच्या लक्षात येऊ लागले आहे, की जैवविविधता वाचवायची असेल तर स्थानिकांच्या मदतीनेच हे करता येईल. आपल्या पृथ्वीवर असणारे असंख्य बारीकसारीक जीव हे आदिवासी आणि स्थानिकांच्या पालकत्वाखालीच तग धरून राहू शकतात.

डॉ. नंदिनी वि. देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org