३ मार्च १९९२ रोजी युगोस्लाव्हिया संघराज्यातून बाहेर पडून पूर्णपणे स्वयंशासित स्वतंत्र देश स्थापन केल्याची घोषणा बोस्नियाने केली. या बदलाला बोस्नियात राहणाºया सर्ब व क्रोएट लोकांचा विरोध होता. बोस्निया-हर्जेगोव्हिनाच्या लोकावस्तीत ४४ टक्के मुस्लिम बोस्नियन, ३३ टक्के ऑर्थोडॉक्स ख्रिचन सर्बियन तर १७ टक्के कॅथोलिक क्रोएशियन असे तीन गट आहेत. हर्जेगोव्हिना हा बोस्नियाचा दक्षिणेतला छोटासा प्रांत. बोस्नियाने स्वातंत्र्याची घोषणा करताच येथील सर्ब आणि क्रोएट लोकांनी अनुक्रमे सर्बिया तसेच क्रोएशियाच्या पाठिंब्यावर काही प्रदेशांवर आपले सरकार स्थापून आपला अधिकार नोंदविला. यामध्ये सर्बांचा रिपब्लिका सर्पस्का अणि क्रोएशियनांचा हेरेज-बोस्निया होते. स्वतंत्र बोस्नियाच्या संघर्षातून पुढे या तीन गटांत यादवीचे वळण लागले. १९९२ ते १९९५ अशी तीन वर्षे चाललेल्या या भीषण युद्धात ८० हजार लोक मारले गेले, २० लाख विस्थापित झाले. अखेरीस संयुक्त राष्ट्रसंघाने यात लक्ष घालून युद्धबंदीची घोषणा केली. ‘नाटो’ने शांतिफौजा पाठवून हा संघर्ष नियंत्रणात आणला. नोव्हेंबर १९९५ मध्ये अमेरिकेत डेटन येथे बोस्नियाच्या सर्ब गटांमध्ये शांतता करार झाला. सध्या या देशात सांसदीय लोकशाही पद्धतीचे, बोस्निया-हर्जेगोव्हिना, प्रजासत्ताक सर्पस्का आणि ब्रको या नियंत्रित स्वायत्तता असलेल्या सरकारांचे बनलेले संघराज्य आहे. बोस्नियामधील सर्ब, बोस्नियाक व क्रोएशियन या वंशांच्या प्रतिनिधींचे तीन सदस्यीय अध्यक्षमंडळ हे संघराज्याचे प्रमुख असते. ३४  लाख लोकसंख्येच्या बोस्नियात ५१ टक्के  मुस्लिम, ४६ टक्के ख्रिस्तीधर्मीय असून बोस्नियन, सर्बियन आणि क्रोएशियन या तीन भाषा  प्रचलित आहेत. हा देश युनायटेड नेशन्स, नाटो, युरोपियन युनियन इ. आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. सारायेव्हो ही या देशाची राजधानी आणि मोठे औद्योगिक शहर. युगोस्लाव्हियाचा भाग असताना औद्योगीकरणामुळे येथील बेरोजगारी संपली होती. परंतु यादवी युद्धामुळे बहुतेक कारखानदारी नष्ट होऊन पायाभूत सुविधांचा विध्वंस झाल्यामुळे अर्थव्यवस्था मोडकळीला आली. सध्या प्रगतिपथावर येत असलेल्या बोस्नियन अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com