पूर्वापार मानवाला माहीत असलेला पदार्थ म्हणजे प्राणिजन्य तूप, जो गाई, म्हैस, शेळी, मेंढी यांच्या दुधापासून तयार करतात. साधारण पहिल्या महायुद्धानंतर मानवाला परिचित झालेला, प्राणिजन्य तुपासारखा दिसणारा पदार्थ म्हणजेच ‘वनस्पती तूप’ होय. ‘वनस्पती तूप’ बनविताना वनस्पती तेलावर रासायनिक प्रक्रियेद्वारा हायड्रोजनशी संयोग करून त्याचं घनीकरण केलं जातं, म्हणजेच तो तेलाचा घन स्थितीतील प्रकार आहे.
वनस्पती तेलांपासून वनस्पती तूप बनविण्यासाठी हायड्रोजनीकरण प्रक्रिया फार महत्त्वाची ठरलेली आहे. यासाठी शुद्ध तेल, शुद्ध हायड्रोजन वायू व उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट- रासायनिक क्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ) हे घटक महत्त्वाचे आहेत. हायड्रोजनीकरणाकरिता प्रारंभी फक्त शेंगदाण्याचं तेल वापरीत असत, पण जसजसा वनस्पती तुपाचा व्यवसाय वाढत गेला आणि इतर व्यवसायांत व खाण्याकरिताही त्याचा खप वाढत गेला तसतसा त्याचा तुटवडा पडू लागला, त्यामुळे मग वनस्पतिजन्य खाद्य द्रव तेलांचा उपयोग करण्याचे प्रयत्न झाले. आता शेंगदाण्याच्या तेलाबरोबरच सरकी, तीळ, करडई, कारळे, भाताचा कोंडा, मका, मोह, सोयाबीन, पाम, सूर्यफूल इत्यादींच्या खाद्य तेलांचा वनस्पती तूप तयार करण्यासाठी उपयोग करता येतो.
तेलातील असंपृक्त मेदाम्लांना हायड्रोजन वायूचे अणू संलग्न करण्यासाठी उत्प्रेरकाची आवश्यकता असते. या प्रक्रियेकरिता प्रामुख्यानं निकेल उत्प्रेरक वापरतात. जसजसं हायड्रोजनीकरण होत जातं तसतसा तेलाचा वितळिबदू वाढत जाऊन साधारण ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचतो.
वनस्पती तूप म्हणजे संपृक्त केलेलं वनस्पती तेल होय. वनस्पती तूप जर काळजीपूर्वक संपृक्त बनवलं तर ते तुपासारखं दाणेदार बनविता येतं किंवा लोण्यासारखं स्निग्ध व घट्ट बनविता येतं. वनस्पती तेल संपृक्त केल्यानंतर घट्ट होत असल्यानं डब्यांतून गळण्याची भीती नाही व टिकाऊही आहे, शिवाय शुद्ध तुपापेक्षा बरंच स्वस्त. त्यामुळे तेही लोकप्रिय होऊ लागलं. पण हायड्रोजनीकरणच्या प्रक्रियेत तेलातील बहुतेक सर्व आवश्यक मेदाम्लं नष्ट होतात किंवा त्यांचं मूळ मेदाम्लांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या मेदाम्लांत (Trans Fatty Acid) रूपांतर होतं. ही रूपांतरित मेदाम्लं शरीरास निरुपयोगीच नव्हे तर अपायकारक असतात. वनस्पती तुपात ‘अ’  जीवनसत्त्व नसतं, म्हणून ते बाहेरून घातलं जातं.
शुभदा वक्टे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई –  office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमोराचा पिसारा – कुकूर, बोकी आणि पावसाळा
कुकूरला पावसाळा आवडत नाही, हे कळायला किंचित वेळ लागला. तो गडगडाट झाला की, बिचकत असे आणि एखादा कोपरा शोधून गपचूप बसे. त्याच्याजवळ बसलं की गडी सावरायचा. त्याला पावसाळा न आवडणं स्वाभाविक होतं. रोजच्या फिरण्यावर, अंगावर वारा झेलण्यावर मर्यादा यायच्या. हुंदडायला मिळायचं नाही म्हणून तो रुसायचा. बोकीला घरी आणल्यावर मात्र पावसाळ्यातला कुकूरचा मूड सुधारला.
बोकी अगदी इवलीशी त्यामुळे पहिल्या पावसात तिचं काय करू नि काय नाही असं त्याचं झालं. बरं, कुकूर आपल्यापाशी घुटमळतोय ते कंपनी द्यायला हे बोकीला कळायला वेळ लागला. ती पळून जायची. पावसाचा आवाज झाला की, त्यांची घरातल्या घरात पळापळी सुरू व्हायची आणि कोणाला तरी बहुतेक कुकूरला (तू मोठा ना! मग सोड तिचा नाद!!) ओरडा बसायचा.
कुकूर मान खाली घालून त्याच्या बास्केटमध्ये बसला की, बोकीला प्रेमाचं भरतं यायचं. तोवर कुकूर रुसलेला असायचा. मग पावसाचा जोर वाढला की, दोघं गपचूपपणे एकमेकांच्या कुशीत झोपायचे. तरी अधूनमधून बोकीच्या मिशा कुकूरला टोचायच्या आणि कुकूरच्या ओलसर लांब नाकाचा बोकीला राग यायचा, पण पावसाच्या कुंद हवेत दोघेही एकमेकांना सांभाळून घ्यायचे.
पाऊस थांबल्यावर, घराबाहेर पडण्याची संधी मिळाली की, मग
कुकूर कोणाचं ऐकत नसे. उडय़ा मारून थोडं गुरगुरून, लाडात येऊन मागे लागायचा. ‘चल बाबा, चल’ असं म्हणत बाहेर पडलो की खूश.
बोकी त्या मानानं स्वतंत्र. खिडकीची फट मिळाली की पाय मोकळे करून येत असे. एकदा दिसली अशीच बाहेर, बसली होती समोरच्या इमारतीतल्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारताना. गंमत म्हणजे तेवढय़ात त्या दोघी ज्या बोक्याविषयी बोलत होत्या तोच समोरून आला. तिघांची नजरानजर झाली. बोक्यानं डोळे रोखून, स्थिर राहून शेपूट आपटली. (म्हणजे इशारा : पैकी कोणावर हल्ला करू?) त्यावर दोघींनी त्याच्याकडे यथास्थित दुर्लक्ष केलं. त्यावर त्यानं मनातल्या मनात ‘लय भारी काम दिसतंय’ असं म्हणून काढता पाय नि शेपूट घेतलं.
पावसाळ्यात कुकूर-बोकीला बाल्कनीत बसून बाहेरची पावसाची झिम्माडबाजी बघायला आवडते. दोघं पावसाकडे टक लावून बघतात. मध्येच जोराची सर आली, छत्र्यांची फडफड झाली की एकमेकांकडे बघतात.
कुकूर उजवा पाय उचलून लोकांच्या फजितीला दाद तेतो आणि बोकी कान हलवून ‘बघ तरी येडपट ध्यानच असतात, ही माणसं!! पावसात निवांतपणे घरी बसायचं सोडून, निष्कारण कडमडायला बाहेर पडतात!’ असं सुचवायची. त्या दोघांना त्या क्षणी त्यांच्या पाठीवरून हात फिरवून घ्यायचा असतो. तसा उबदार प्रतिसाद मिळाला की, त्यांचे डोळे पेंगुळतात आणि दोघे मस्त ताणून देतात.
अशा वेळी कळतं की जांभया आणि झोप यांची लागण लागते. शांत, निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या शरीराच्या लयबद्ध हालचाली दिसू लागल्या की, आपले डोळे जडावतात. बाहेर पावसाची रिपरिप, सोबतीला कुकूर आणि बोकी, डोळ्यांवर मस्त झोप.. अजून काय हवं?
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghee from vegetable oil
First published on: 23-07-2014 at 12:04 IST