आपल्या शरीरात, पेशींना योग्य ते संदेश देऊन विविध क्रियांवर नियंत्रण ठेवणारी एक यंत्रणा आहे. ही यंत्रणा निरनिराळ्या अवयवांतील अंतस्रावी ग्रंथींतून स्रवणाऱ्या विविध जैवरसायनांनी बनलेली आहे. ही जैवरसायने म्हणजे ‘संप्रेरके’ (हॉर्मोन). या संप्रेरकांवरील संशोधनाची सुरुवात १८४९ साली झाली. जर्मन संशोधक अर्नॉल्ड बर्टहोल्ड याने कोंबडय़ाचे वृषण काढल्यावर त्याच्या कलगी-तुऱ्यांची वाढ बंद झाल्याचे दाखवून दिले. वृषणातून निघणाऱ्या एखाद्या रसायनाचा कोंबडय़ाच्या या अवयवांच्या वाढीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले.

पचन होताना जठरात हायड्रोक्लोरिक आम्लाची निर्मिती होऊन ते अन्नासहित आद्यांत्रात (डय़ूओडेनम) शिरते. ब्रिटिश संशोधक एन्रेस्ट स्टारिलग आणि विल्यम बेलिस यांनी १९०२ साली एक वैशिष्टय़पूर्ण प्रयोग केला. त्यांनी गुंगी दिलेल्या एका कुत्र्याच्या आद्यांत्राला जोडलेल्या नसा कापून टाकल्या, तसेच आद्यांत्रात अन्नाचा व हायड्रोक्लोरिक आम्लाचा प्रवेश होणारा मार्गसुद्धा बांधून बंद केला. त्यानंतर त्यांनी आद्यांत्रात बाहेरून हायड्रोक्लोरिक आम्ल सोडले. हे आम्ल आद्यांत्रात शिरताच, कुत्र्याच्या स्वादुपिंडातून पाचकरसाची निर्मिती होऊ लागली. नसा कापून मज्जासंस्थेशी संपर्क तोडलेला असतानाही पाचकरसाची निर्मिती होत होती! म्हणजे स्वादुपिंडाला पाचकरसाच्या निर्मितीचा संदेश मज्जासंस्थेकडून दिला जात नव्हता. स्टारिलगच्या मते हा संदेश एखाद्या रसायनाद्वारे दिला जात होता. पाचकरस निर्माण होत असतानाच,  त्याने या कुत्र्याच्या आद्यांत्राजवळच्या भागातील श्लेष्म पटलाचा (म्युकस मेंब्रेन) काही भाग बाहेर काढला. त्याचे हायड्रोक्लोरिक आम्लात मिश्रण करून, ते त्या कुत्र्याला टोचले. आता तर त्या कुत्र्याच्या स्वादुपिंडातून पाचकरसाची अधिक वेगाने निर्मिती सुरू झाली. म्हणजे या श्लेष्म पटलातील एखादे रसायनच स्वादुपिंडाला सक्रिय करत होते. या रसायनाला स्टारिलग आणि बेलिस यांनी ‘सिक्रेटिन’ म्हणून संबोधले.

रासायनिक संदेश देऊन जैविक क्रियांना उद्दीपित करणाऱ्या अशा प्रकारच्या रसायनांना काही काळाने ‘हॉर्मोन’ हे नाव दिले गेले. १९४० साली संप्रेरके ही पेशीत न शिरता ती पेशीपटलाशी संयोग पावून कृती घडवून आणतात हे सिद्ध झाले. सजीवांच्या शरीरात कार्यरत असणारी अनेक संप्रेरके, त्या आणि नंतरच्या काळात वेगळी केली गेली असली, तरी स्टारिलग आणि बेलिस यांनी शोधलेले सिक्रेटिन हे संप्रेरक शुद्ध स्वरूपात मिळण्यास मात्र १९६०चे दशक उजाडावे लागले.

– डॉ. रमेश महाजन

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org