scorecardresearch

भाषासूत्र : उपसर्गाची उदाहरणे

गैरहजरला ‘अनुपस्थित’ म्हणू शकतो. गैरसमजला ‘चुकीचा समज’ ऐवजी काय पर्याय सुचतोय पाहा! आणखी काही उपसर्गघटित शब्द पुढच्या भागात!

भाषासूत्र : उपसर्गाची उदाहरणे

डॉ. निधी पटवर्धन

‘गाडी सुटली, रुमाल हलले.. क्षणात डोळे टचकन ओले’ आता या इतक्या हळव्या कवितेत रुमालाला मराठी पर्यायी शब्द द्या असे म्हटले, तर काय द्यायचा? हिंदीत म्हणे ‘करपट’ म्हणतात, संस्कृतात ‘करवस्त्र’. रूक्ष पद्धतीने मराठीत ‘फडके’ म्हटले तर त्यात बरीच अर्थव्याप्ती येते, त्याला त्या नाजूक साजूक रुमालाची भावनाही येत नाही.

मराठीत हा शब्द दोन अर्थानी वापरतात; एक म्हणजे तोंड पुसावयाचे फडके आणि दुसरे डोक्याला बांधावयाचे फडके! निरनिराळय़ा काळात या फडक्याची लांबी-रुंदी वाढत गेली आहे. हा शब्द फारसी. ‘रू’ म्हणजे चेहरा आणि ‘माल’ म्हणजे फडके. हा शब्द आपल्याकडे आला आणि आपण त्याला आपलाच मानला.

भाषेत शब्द कसे तयार होतात हे पाहणे नेहमीच रंजक ठरते.

मराठी भाषेत उपसर्गघटित, प्रत्ययघटित, समासघटित आणि अभ्यस्त असे साधित शब्दांचे चार प्रकार येतात. उपसर्गघटित प्रकारामध्ये इंग्रजी शब्द जवळजवळ नाहीत. मात्र उपसर्गघटित फारसी व अरबी शब्द पुष्कळच पाहावयास मिळतात. फारसी व अरबीमधून मराठीत आलेले काही उपसर्ग म्हणजे ऐन, कम, गैर, दर, ना, बंद, ब, बर, बिन, बे, बेला, ला, सर आणि हर! आता एकेक करून या उपसर्गाचे अर्थ पाहू या. ऐन म्हणजे मुख्य, पूर्ण किंवा पुष्कळ. ऐनउन्हाळय़ात, ऐनभरात, ऐनरंगात. ‘कम’ या फारसी उपसर्गाचा अर्थ आहे कमी किंवा अपुरा. कमजोर, कमनजर, कमअक्कल, कमकुवत. हा उपसर्ग काही मराठी शब्दांना सुद्धा लागतो, जसे कमनशीब, कमजात. ‘गैर’ म्हणजे वाचून किंवा विन- गैरहजर, गैरसमज, गैरकायदा. हा उपसर्ग काही मराठी आणि संस्कृत शब्दांना लागलेला पाहावयास मिळतो, जसे की गैरप्रकारचा, गैरमान्य, गैरमार्ग, गैररीत, गैरवळण, गैरसावध, गैरसोय. ‘गैर’ हा उपसर्ग अरबी मूळ ‘घैर’ आहे. त्याचे बहुवचन घैरह असे आहे. गैरहजरला ‘अनुपस्थित’ म्हणू शकतो. गैरसमजला ‘चुकीचा समज’ ऐवजी काय पर्याय सुचतोय पाहा! आणखी काही उपसर्गघटित शब्द पुढच्या भागात!

nidheepatwardhan@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या