मासे, कोळंबी, खेकडे, शिंपले असे मानवी खाद्य व आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या जलचरांना जलाशयात विक्रीयोग्य होईपर्यंत देखरेखीखाली वाढवणे म्हणजे मत्स्यशेती. मत्स्यशेती खाऱ्या, निमखाऱ्या वा बिनखाऱ्या पाण्यात केली जाते. शेतीयोग्य प्राण्यांच्या ‘बोटुकल्या’ (छोटी पिल्ले) पाण्यात सोडली जातात, त्यांना नैसर्गिक/ कृत्रिम खाद्य देऊन, नीट काळजी घेऊन त्यांची योग्य प्रमाणात वाढ होऊ दिली जाते आणि विक्रीयोग्य झाल्यावर पाण्याबाहेर काढून विक्री केली जाते.
मत्स्यशेती अनेक मार्गानी करतात. पिंजऱ्यात (विविध उपप्रकार), नैसर्गिक पाणवठय़ात, बंदिस्त जलाशयात, छोटय़ा टाक्यांत कार्प मासे (देशी व चिनी), कोळंबी (विविध प्रकार), खेकडे, शिंपले अशा जलचरांची पैदास प्रामुख्याने होते. वाढीच्या तंत्रानुसार नैसर्गिक, निमकृत्रिम, कृत्रिम, अत्याधुनिक अशा चार प्रकारे ही शेती करतात. पहिली पद्धत पारंपरिक आहे, ज्यात नैसर्गिक पाणवठय़ात प्रति चौरस मीटर ५-१० बोटुकल्या सोडून पाण्यातील उपलब्ध खाद्य देऊन पिलांची काळजी घेतात. गुंतवणूक व खर्च तुलनेने अल्प असून उत्पादनदेखील कमी असते. मात्र, हे उत्पन्न दीर्घकालीन असून याचा पर्यावरणावर कमीत कमी विपरीत परिणाम होतो. याउलट, अत्याधुनिक मत्स्यशेतीत अगदी छोटय़ा कृत्रिम टाकीत प्रति चौरस मीटर शंभरहून जास्त बोटुकल्या सोडून; तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याची प्रत, तापमान, क्षारता, प्रकाश, मानवनिर्मित पौष्टिक खाद्य इ. आवश्यक घटक पूर्णपणे नियंत्रित केले जातात. नफा मोठय़ा प्रमाणावर होतो असे मानले तरीही, गुंतवणूक व आवर्ती खर्च प्रचंड आहे. अनेक साधने-संसाधने वापरावी लागत असल्याने ऊर्जा-मागणी अनन्वित असून पर्यावरणावर याचा खूप ताण येतो. इतर दोन प्रकार या दोन पर्यायांच्या मधील असतात; सर्व समीकरणे त्यानुरूप ठरतात. यात परिस्थितीनुरूप योग्यरीत्या अंमलबजावणी निश्चितच किफायतशीर ठरते. मिश्र-शेतीचा पर्यायदेखील लाभदायी ठरतो.
जगभरात पावणेनऊ कोटी टन मत्स्य खाद्य प्रजातीचे उत्पादन मत्स्यशेतीने होते, पैकी चीनमध्ये सात कोटी टन व भारतात १.२ कोटी टन उत्पादन घेतले जाते. भारतात आंध्र प्रदेशात ६.३५ लाख टन, खालोखाल गुजरातमध्ये ५० हजार टन तर महाराष्ट्रात ४.२५ हजार टन उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र मत्स्यशेतीत सहाव्या स्थानी आहे. देशातील मत्स्यशेतीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी केंद्र व संबंधित राज्य सरकारे अनेक योजना राबवत आहेत. मत्स्यशेती हा आर्थिक लाभ देणारा व्यवसाय ठरू शकतो.
डॉ. प्रसाद कर्णिक , मराठी विज्ञान परिषद