चारुशीला जुईकर, मराठी विज्ञान परिषद

ही कथा आहे किमान सात लाख वर्षांपासून चालत आलेली! मोरेसी कुलातील झाडांची आणि सुईच्या छिद्रापेक्षाही लहान असणाऱ्या कीटक, वरट किंवा केंबरे (ब्लॅस्टोफॅगा प्रजातीतील जाती) यांच्या सहजीवनाची!

अंजीर, उंबर, वड, पिंपळ ही सगळी झाडे मोरेसी कुलातली. या झाडांची फळे सहज दिसून येतात, पण फुले मात्र दिसत नाहीत. या झाडांना अनेक हिरवे, लहान, गोलाकार, पोकळ, मांसल भाग दिसू लागतात. प्रत्येक भाग म्हणजे त्या वनस्पतीचा पुष्पसमूहच असतो. त्यास सायकोनिया (हायपॅनथोडीयम) असे शास्त्रीय नाव आहे. नरफुले यामध्ये पुढच्या भागात तर मादीफुले देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधील भागातील फुले नपुंसक असतात. आधी मादीफुले परिपक्व होतात तेव्हा सायकोनियाच्या देठाच्या विरुद्ध बाजूला एक लहानसे छिद्र उघडते आणि मादीफुले पक्व झाल्याचा संदेश आसमंतात पसरतो. आधी परिपक्व झालेल्या फळांतील गर्भार वरटमाद्या तिथले परागकण लेवून अंडी घालायला या पुष्पसमूहात येतात. अतिशय लहान, कठीण आणि कुसळं असलेल्या छिद्रातून आत शिरताना त्यांचे पंख-स्पृशा तुटून जातात. शरीर दबले जाते, पण तरीही त्या आत प्रवेश करतात. अंगावरच्या परागकणांचे धन वरटमाद्या फुलांवर रित्या करतात. या काळात नरफुले सुप्तावस्थेत असतात.

वरटमाद्या आपल्या खास अवयवाने नपुंसक फुलांत अंडी घालतात आणि इथेच मादीचे जीवनकार्य संपते. वनस्पतीच्या जातीनुसार फलनाचा कालावधी कमी-अधिक आठवडय़ांचा असू शकतो. या काळात, सायकोनामाचा रंग बदलत नाही की कुठलाही गंध सोडला जात नाही. त्यामुळे इतर प्राणीही फळे खाण्यासाठी तेथे फिरकत नाहीत. कीटकांच्या अंडय़ांचे फलन होण्यासाठी आणि फळांत बी तयार होण्यासाठी अवधी मिळतो. कीटकांच्या अंडय़ांतून नर अथवा मादी कीटक बाहेर येतात. काही जातींत नर आधी जन्माला येतात. नर आणि मादी यांचे तिथेच मीलन होते. ज्या जातीत नर आधी जन्माला येतात, त्यांचे मीलन सुप्तावस्थेतील माद्यांशी होते.

नराला ना पंख असतात, ना डोळे! मात्र आपल्या मजबूत जबडय़ांच्या साहाय्याने मादीला बाहेर जाण्यासाठी वाट (छिद्र) तयार करण्याचे काम तो करतो आणि मरण पावतो. जणू मीलन आणि वाट खोदणे ही दोनच उद्दिष्टे त्याच्या जीवनाची असतात. विशेष म्हणजे प्रत्येक जातीच्या झाडासाठी विशिष्ट जातीचेच वरट असतात. वरट नसतील तर झाडाचे बीज निर्माण होणार नाही, मग वरटाची पुढची पिढी कशी तयार होईल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता आतील नरफुलेही विकसित झालेली असतात. गर्भार वरटमाद्या नरफुलांतील परागकण अंगावर लेवून बसतात, दुसऱ्या झाडाकडून संदेश येण्याची वाट पाहात!