महाराष्ट्राचे सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ काळ्या कातळाने व्यापलेले आहे. इंग्रजीत या खडकाला बेसाल्ट म्हणतात. महाराष्ट्राच्या बाहेर हा खडक मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगण या राज्यांमध्येही मोठ्या क्षेत्रावर आढळतो. राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही अत्यल्प क्षेत्रात याचे अस्तित्व आहे. या कातळाने भारतीय द्वीपकल्पाचे सुमारे पाच लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे.

सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटातील हालचालींमुळे भारतीय द्वीपकल्पाच्या काही भागांत भूमीला लांब भेगा पडून त्यातून तप्त लाव्हा बाहेर पडू लागला. तो थंड होऊन त्यापासून काळ्या कातळाचे थर निर्माण होऊ लागले. थांबून थांबून, नवीन भेगा पडून, त्यातून नव्याने लाव्हा बाहेर पडून पुन्हा पुन्हा नवे थर निर्माण होत असत. सुमारे ४८ लाख वर्षे असे काळ्या कातळाचे एकावर एक थर निर्माण होत होते.

या खडकाचे थर क्षितिजसमांतर आहेत. त्यांच्या टेकड्यांचे उतार एखाद्या महाकाय जिन्याच्या पायऱ्यांप्रमाणे दिसतात. असे भूरूप असणाऱ्या ज्वालामुखीजन्य पाषाणसमूहांना भूवैज्ञानिक परिभाषेत सोपानप्रस्तर (ट्रॅप) म्हणतात. भारतीय द्वीपकल्पात आढळणारा काळ्या कातळांचा हा पाषाणसमूह प्रामुख्याने दक्खनच्या पठारावर आढळतो. त्यामुळे भूवैज्ञानिक त्यास ‘दक्खनचे सोपानप्रस्तर’ (डेक्कन ट्रॅप) म्हणतात.

अर्थातच सर्व थरांतले खडक अगदी एकसारखे नसून विविध थरांत आणि वेगवेगळ्या ठिकाणी काळ्या कातळाचे निरनिराळे प्रकार आढळतात. त्यातले काही प्रकार, विशेषत: एकसंध असणारे प्रकार, हे बांधकामात वापरण्यासाठी आणि लेणी खोदण्यासाठी अगदी योग्य आहेत. त्यामुळे भारताच्या इतिहासात लेणी खोदण्याची प्रथा अस्तित्वात होती, त्या काळात महाराष्ट्रातला काळा कातळ शिल्पकला जाणणाऱ्या कलाकारांच्या विशेष पसंतीस उतरला.

म्हणूनच भारतात जवळपास दीड हजार मानवनिर्मित गुहा आहेत. त्या गुहांपैकी ८०० गुहा महाराष्ट्रातल्या काळ्या कातळात खोदल्या गेल्या आहेत. आपल्या देशातल्या अनेक गुहांमध्ये शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात. हिंदू, जैन आणि बौद्ध या तीन धर्मांतल्या लोकांनी या गुहांची निर्मिती केली आहे. पण त्यात बौद्ध धर्मीयांच्या गुहांचे प्रमाण अधिक आहे. भिक्षूंच्या निवासासाठी असणाऱ्या गुहांना ‘विहार’, तर विचारमंथनाकरिता भिक्षू जिथे एकत्र जमत त्या गुहांना ‘चैत्य’ म्हणत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अप्रतिम शिल्पकलेसाठी (स्कल्प्चर) आणि उत्कृष्ट वास्तुविद्योसाठी (आर्किटेक्चर) महाराष्ट्रातल्या अजंठा आणि वेरूळ येथील गुहांच्या संकुलांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळांचा दर्जा दिला आहे. त्याचे थोडेफार श्रेय उत्कृष्ट गुणवत्ता असणाऱ्या काळ्या पाषाणालाही दिले पाहिजे.