समुद्रप्रवासाचा इतिहास सुमारे पाच हजार वर्षे जुना आहे. जहाजांना मार्ग दाखवणारी दीपगृहे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. त्यापूर्वी रात्रीच्या वेळी बंदर कुठे आहे हे समजण्यासाठी डोंगरमाथ्यावर किंवा जमिनीवर जाळ पेटवून जहाजांना मार्गदर्शन केले जाई. पूर्वीच्या काळात मुख्यत: युरोपमध्ये काही बंदरांच्या प्रवेशद्वारी मोठमोठी दीपगृहे बांधल्याचे पुरावे पाहायला मिळतात. रोमन साम्राज्यातील अलेक्झांड्रिया बंदराच्या प्रवेशद्वारी अनेक शतके उभे असलेले भव्य दीपगृह हजार वर्षांपूर्वी भूकंपात नष्ट झाले. स्पेनमध्ये सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बांधलेले ‘टॉवर ऑफ हरक्यूलीस’ हे दीपगृह आजही सुस्थितीत आहे. भर समुद्रात खडकावर दीपगृहे उभारणे अत्यंत जिकिरीचे असल्याने अशा ठिकाणी दीपगृहे बांधण्याचे काम सुमारे दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाले. 

दीपगृहाची रचना मनोऱ्यासारखी असते. त्यात सर्वात खाली दीपगृहाला लागणारे सामान ठेवण्याची सोय असते. त्यावरील मजल्यावर दीपगृह-रक्षकांची राहण्याची व्यवस्था असते. त्याही वर एक प्रचंड शक्तिमान दिवा, त्याच्यापुढे किंवा सभोवताली भिंग (फ्रेस्नेल जातीचे) आणि त्या दिव्याभोवती गोल फिरणारा आंतरगोल आरसा असल्याने दीपगृह फिरणारा प्रकाशझोत देऊ शकते. पूर्वी दिवा ‘कोल्झा’ किंवा तत्सम कमी धूर देणाऱ्या तेलावर जळणाऱ्या वातीचा असे. नंतर ‘गॅसबत्ती’सारख्या जाळीत केरोसीनची वाफ पेटवून लख्ख प्रकाश पाडण्याची पद्धत आली. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी दीपगृहे विजेवर चालू लागली. सुरुवातीच्या काही दीपगृहांमध्ये अत्यंत प्रखर आर्क लॅम्प वापरत.  त्यांना लागणारी वीज अनेकदा दीपगृहाखाली लावलेल्या जनरेटरवर तयार होते किंवा काही ठिकाणी या कामासाठी आजही गॅस वापरतात.

Loksatta kutuhal Problems with chatgpt
कुतूहल: चॅटजीपीटीच्या समस्या
Loksatta kutuhal Chat gpt AI Artificial intelligence information set
कुतूहल: चॅट जीपीटीचे आगमन
Loksatta kutuhal Architect of ChatGPT Sam Altman
कुतूहल: चॅटजीपीटीचे शिल्पकार – सॅम ऑल्टमन
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?

हल्ली यामध्ये एलईडी दिवे वापरून कमी विजेत जास्त प्रकाश निर्माण केला जातो. प्रत्येक दीपगृहाला रक्षकांची गरज लागत नाही. काही दिवे स्वयंचलित, तर काही दूरनियंत्रित असतात. काही दीपगृहे केवळ साध्या प्रकाशाऐवजी लेझर किरणे वापरतात, तर काही धुक्यातसुद्धा दिसावे यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर’ प्रसारित करतात. ही सिग्नेचर रडारच्या पडद्यावर मोर्स कोडच्या रूपात दिसते. आता जीपीएससारखे पर्याय आल्यामुळे दीपगृहांची संख्या घटू लागली आहे, पण त्यांच्या देखण्या रूपामुळे आजही अनेक ऐतिहासिक दीपगृहे जतन करून ठेवली आहेत.

  कॅ. सुनील सुळे ,मराठी विज्ञान परिषद