मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई विभागाने आयोजित केलेले वार्षिक अधिवेशन २०२३ साठी प्रतिनिधी नोंदणी व प्रदर्शन दालन, निवास व्यवस्था, भोजनाचा बेत, तसेच तीन दिवसांत होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळासमवेत अधिवेशनस्थळी कसे पोहोचावे? संपर्क कुणाशी साधावा? याची माहिती व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून दिली ती बॉट प्रकारातील चॅट्बॉट्च्या मदतीने.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमून दिलेल्या सूचनांची पुनरावृत्ती; मनुष्यापेक्षा अनेकपट वेगाने करू शकणारी, ठरावीक कार्यासाठी निर्माण केलेली मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रणाली म्हणजे ‘बॉट’. चॅटबॉट, हा बॉटचा प्रकार असून पूर्वनियोजित उत्तरांचा संचय प्रणालीमध्ये केल्यामुळे ठरावीक प्रश्नांना उत्तरे देणे, वारंवार किंवा सामान्यत: विचारल्या जाणाऱ्या शंकांचे निरसन करणे आणि प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी अनेक संकेतस्थळांवर चॅटबॉट्सच्या रूपात साहाय्यक सदैव कार्यरत असतात.

हेही वाचा >>> कुतूहल : मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा

‘एलायझा’ हा शाब्दिक संवाद साधणारा पहिला चॅटबॉट मानला जातो. मानसशास्त्रज्ञ असल्याचे भासवून, त्याने लोकांना त्याच्याशी अधिकाधिक बोलायला प्रवृत्त करून त्यांचेच प्रश्न उलट त्यांनाच विचारले.‘पॅरी’ नावाच्या चॅटबॉटनेही तशीच क्रिया करून यश संपादन केले.

‘क्लेव्हरबॉट’ या चॅटबॉटने लोकांशी संवाद साधण्याचे तंत्र भिन्न दृष्टिकोनातून हाताळल्याने त्याचे वेगळेपण आणि चतुराई दिसते. प्रत्यक्षपणे होणारे आणि झालेले संवाद, प्रक्रिया न केलेल्या माहितीच्या रूपात त्याच्या प्रणालीत साठवले आहेत. संवादादरम्यान, संवादाचे विश्लेषण करून सांख्यिकीच्याआधारे त्या साठ्यातील सर्वोत्तम जुळणाऱ्या उत्तराची निवड क्लेव्हरबॉट करतो. संवादांचा प्रचंड साठा माहितीच्या रूपात केल्यामुळे नजीकच्या काळात क्लेव्हरबॉटच्या संवादात अधिकाधिक सहजता येऊ लागली असली तरी संवादात अपरिचित विषय आल्यावर अर्थातच त्याचे बिंग फुटण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा >>> कुतूहल : मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेचे दैनंदिन उपयोजन

मनुष्याप्रमाणे संभाषण करताना ‘चॅटबॉट’ला झगडावे लागते. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचा गुंतागुंतीचा भाषेचा वापर. माणूस कोणते शब्द उच्चारेल याचे अनुमान लावायचे तर सगळे शब्दकोश तुटपुंजे पडतील. आपण बोलताना काही क्षणांसाठी थांबलो, विचारात पडलो किंवा ‘अं… हं…’असे उच्चार केले तर संवाद साधणारे संगणक गोंधळात पडतात.

वाक्यातल्या शब्दांचा व्याकरणासहित अर्थ लावण्याची प्रक्रियाही अत्यंत किचकट असते. मानवी संवादाचा सरळ अर्थ काढण्यासाठी केवळ अधिक क्षमतेच्या संगणकांचा वापर पुरेसा ठरत नाही तर त्या पलीकडील काही मुद्दे समजून घ्यावे लागतात. आपल्या मनातील विचार हे केवळ मेंदूतील मज्जातंतूचे जाळे आहे का? की आणखी काही? म्हणूनच चॅटबॉटची उत्तरे ऐकताना मनुष्यच बोलत असल्यासारखे वाटले तरी या प्रश्नांचा ऊहापोह करणे आवश्यक ठरते.

वैशाली फाटक-काटकर
मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal introduction to chatbots chatbot technique for conversation with people zws
First published on: 15-02-2024 at 04:02 IST