भारताला आठ हजार किलोमीटरचा विस्तीर्ण सागरकिनारा लाभला आहे. या सागराने अनेक परिपूर्ण, जटिल परिसंस्थांना आपल्या कवेत घेतले आहे. भरती ओहोटीदरम्यानचा सागरकिनारा, किनाऱ्यालगतच्या खारफुटीचा प्रदेश, प्रवाळ खडक, नदी समुद्रला मिळते तो त्रिभुज प्रदेश, सागरी कुरण, सागराचा पृष्ठभाग, मधला भाग, सागरतळ अशा अनेक परिसंस्थांनी महासागर व्यापलेला आहे! सागरातील या विविध परिसंस्थातील सजीवांचा अभ्यास करणे हे जमिनीवरील सजीवांचा अभ्यास करण्यापेक्षा अतिशय कठीण आहे.

तरीही भारतात आणि परदेशात समग्र सागराचा अभ्यास करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यात सागरी जैवतंत्रज्ञानाचाही अभ्यास आणि संशोधन चालते. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी गोवा, सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट लखनऊ, बोस इन्स्टिटय़ूट कोलकाता, रिजनल रिसर्च लॅबोरेटरी भुवनेश्वर या संस्थांचा. समुद्रातील सजीवांपासून जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने जीव वाचवणारी औषधे कशी मिळवता येतील, यावरही संशोधन सुरू आहे.

sahyadri rock adventure foundation marathi news
समुद्रालगतच्या १०० फूट उंच सुया सुळक्यावरून राज्याला मानवंदना
america student protest
अमेरिकेतील विद्यापीठं आंदोलनाचं केंद्र म्हणून का ओळखली जातात? या आंदोलनांचा इतिहास काय?
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

अनेक महाविद्यालयांत आणि विद्यापीठांत सागरी जैवतंत्रज्ञानाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आरोग्यम् मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (एएमसीएच), रुरकी (उत्तराखंड), अकॅडमी ऑफ मेरिटाइम एज्युकेशन अँड ट्रेनिंग (एएमईटी), चेन्नई (तमिळनाडू), अन्नमलाई युनिव्हर्सिटी, कडलूर (तमिळनाडू), कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), एनआयएनआयटीटीई युनिव्हर्सिटी, मंगळूर (कर्नाटक), टीएमसी शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड, पंचकुला (हरियाणा), गोवा विद्यापीठ, पणजी या त्यापैकी काही संस्था.

इच्छुक आणि जिज्ञासू विद्यार्थी आंतरजालावर अधिक शोध घेऊ शकतात. यातील काही संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी करण्याचीही सोय आहे.

सागर जेवढा अथांग, तेवढेच सागराचे ज्ञानही अथांग. सागरी जैवतंत्रज्ञान ही विज्ञानाच्या क्षितिजावर उदयाला आलेली नवीन विज्ञान शाखा आहे. सागरी परिसंस्थेत प्रचंड जैवविविधता आहे. याचाच अर्थ असा की तिथे प्रचंड जनुकविविधता आहे. या जनुकांच्या खजिन्यातून उपयुक्त जनुकांचा अभ्यास जनुकीय अभियांत्रिकी या जैवतंत्रज्ञानाच्या शाखेद्वारे करता येतो. या क्षेत्रातील संशोधनाला प्रचंड वाव आहे. विद्यार्थ्यांनी या ज्ञानसागरात उडी घ्यावी आणि सागरज्ञानाचे मंथन करून ज्ञानकणांच्या नवनीताचा आस्वाद घ्यावा, असे केले तर विद्यार्थी नक्कीच सागर तरून जातील यात शंका नाही.

 बिपीन भालचंद्र देशमाने ,मराठी विज्ञान परिषद