डॉ. फर्डिनांड स्टॉलिक्ज्का यांची कर्मभूमी भारतीय उपखंड असली, तरी ते मूळचे झेक रिपब्लिकच्या मोराविया या प्रांताचे होते. त्यांचा जन्म ७ जून १८३८ रोजी झाला. व्हिएन्ना विद्यापीठातून त्यांनी भूविज्ञान आणि पुराजीवविज्ञान या विषयांमध्ये स्नातकोत्तर पदवी घेतली. नंतर ट्यूबिंगन विद्यापीठातून त्यांनी १९६१ मध्ये पीएच. डी. प्राप्त केली. तथापि प्राणीविज्ञान या विषयावरही त्यांचे तितकेच प्रभुत्व होते. ऑस्ट्रियन भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागात त्यांनी अल्पकाळ काम केले, पण १९६२ मध्ये भारतीय भूविज्ञान सर्वेक्षणात नियुक्ती मिळाल्यामुळे ते भारतात आले.

ते रुजू झाले, त्या सुमाराला कॉरोमांडेल किनाऱ्यावरील पुदुचेरी (पॉन्डिचेरी) ते तिरुचिरापल्ली यांदरम्यान पसरलेल्या, आणि क्रिटेशियस कालखंडात, सुमारे ११ ते ६ कोटी वर्षांदरम्यान निर्माण झालेल्या पाषाणप्रस्तरांमधून निरनिराळ्या प्रकारच्या हजारो जीवाश्मांचा खजिना उपलब्ध झाला होता. त्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी स्टॉलिक्ज्का यांच्यावर सोपवण्यात आली. भारतीय भूविज्ञान सर्वेक्षणातर्फे पुराजीवविज्ञानाच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या संशोधनावर आधारित ‘पॅलिआँटॉलॉजिया इंडिका’ या नावाने प्रकाशनांची मालिका प्रसिद्ध केली जाते. त्यात स्टॉलिक्ज्का यांच्या या संशोधनावर आधारित चार खंडांमधे अनेक अंक प्रसिद्ध झाले. या अभ्यासाची जगभर प्रशंसा झाली.

स्टॉलिक्ज्का यांना कच्छ, पश्चिम हिमालय, म्यानमार, अंदमान-निकोबार, सिंगापूर आणि मलाया अशा विविध प्रदेशात सर्वेक्षण करण्याची संधी मिळाली. या प्रदेशांमधल्या पुराजीववैज्ञानिक आणि प्राणीवैज्ञानिक विविधतेचा त्यांनी कसून अभ्यास केला. यात त्यांनी केलेल्या जीवाश्मांवरील संशोधनाचे झाले, तितकेच प्राणीजगतावरील संशोधनाचेही स्वागत झाले. अतिशय बारकाईने निरीक्षण करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे, आणि निष्कर्षांमधल्या अचूकतेमुळे त्यांच्या शोधनिबंधांना वैज्ञानिक जगतात प्रचंड मान्यता मिळाली. त्यावेळी त्यांनी तिशीही गाठली नव्हती.

त्यांचा आवाका पाहून आव्हानात्मक प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग आवर्जून घेतला जात असे. १८७३ मधे रशियाशी असणाऱ्या राजकीय चढाओढीतून तत्कालीन ब्रिटिश सरकारने काश्मीर आणि तिबेटमार्गे जाणाऱ्या चीन ते तुर्किये या रस्त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाची माहिती मिळवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली. या भागातल्या नैसर्गिक संसाधनांची माहिती मिळवणे हा या मोहिमेचा एक महत्त्वाचा उद्देश होता. या मोहिमेत जे सात अधिकारी होते त्यांच्यात स्टॉलिक्ज्का यांचाही समावेश होता. पण तीव्र थंडी आणि मोहिमेतल्या प्रचंड दगदगीने मेंदुज्वराने (मेनिंजायटिस) त्यांना गाठले. या तल्लख बुद्धीच्या मेहनती भूवैज्ञानिकाचा १९ जून १८७४ रोजी, वयाच्या केवळ ३६व्या वर्षी अंत झाला. लेहजवळ त्यांचा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे.

अनघा शिराळकर ,मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org