कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अलीकडे अनेक क्षेत्रांत वाढू लागला आहे. वैद्याकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. समजा, आज एका अत्याधुनिक रुग्णालयात रोगांचे निदान (डायग्नोसिस) करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित प्रणाली उपलब्ध आहे. तिची विशेषता अशी की, तिला आपण आपली लक्षणे सांगितली आणि त्यानंतर तिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिल्यावर, ती त्यांचे विश्लेषण करून आपल्या आजाराचे किंवा व्याधीचे निदान सांगेल. काही वेळा, आपल्याला त्या प्रणालीने केलेले ते निदान कदाचित सपशेल चुकीचे वाटू शकते. त्या परिस्थितीत आपण तिला ते निदान तिने कसे केले हे विचारल्यास बहुधा काही उत्तर मिळणार नाही, किंवा ते अगम्य भाषेत सांगितले जाऊ शकते. हा अनुभव आपला अपेक्षाभंग तसेच, अशा प्रणालींवरील विश्वास कमी करू शकतो.

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता व संशोधन संस्था

असे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन, कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकाधिक मानवाभिमुख कशी करता येईल याचा विचार सुरू झाला. त्यासाठी २०१७-२०२१ दरम्यान अमेरिकेच्या संरक्षण प्रगत संशोधन संस्थेने (डीएआरपीए) एका प्रकल्प राबवला. त्याचा परिपाक म्हणजे ‘पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एक्सप्लनेबल आर्टिफिशिअल इंटिलिजन्स – एक्सएआय) या संकल्पनेचा उदय. ही नवी संकल्पना समजून घेण्यापूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झालेल्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेऊ या.

मुळात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे माहिती विश्लेषणाची विशिष्ट प्रकारे आखलेली (प्रोग्रॅम्ड) शैली अशी व्याख्या केली जाते. तिच्या पुढील चार पायऱ्या आहेत : प्राप्त झालेली माहिती व्यवस्थितपणे रचणे, ती समजून विविध प्रकारे बोध घेणे, माहितीवर योग्य प्रक्रिया करून नवा अर्थ काढणे, आणि तो अर्थ किंवा निष्कर्ष काही प्रमाणित चाचण्यांनी तपासून अंतिम करणे.

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे खेळाडूंचे खासगीपण धोक्यात

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दोन लाटा आत्तापर्यंत येऊन गेल्या आहेत असे मानले जाते. पहिल्या लाटेत, मानवाने माहिती आणि विश्लेषणाचे नियम दिल्यावर यांत्रिक प्रणालीने विविध पर्याय शोधणे असे केले जायचे होते. दुसऱ्या लाटेत, विशिष्ट अभिक्षेत्रांतील (डोमेन) अनिश्चितता हाताळण्यासाठी सांख्यिकी प्रारूपे आणि पद्धती दिल्यावर निष्कर्ष काढणे, अशी प्रगती झाली. आपण सध्या या लाटेच्या प्रगत अवस्थेत आहोत.

संदर्भ लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने तिच्या प्रत्येक निष्कर्षाची कारणमीमांसा देणे, ही तिची तिसरी लाट मानता येईल. अपेक्षा अशी की सामन्यालाही समजेल असे ते स्पष्टीकरण असेल उदा. वैद्याकीय निदानाबाबत. पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता मानव आणि यंत्रातील संवाद वरच्या स्तरावर नेईल.

डॉ विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ई-मेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org