२७ डिसेंबर १८२२ रोजी जन्मलेले फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी निसर्गातील सूक्ष्मजीवसृष्टीकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. गरीब चर्मकार कुटुंबात जन्मलेल्या पाश्चर यांना लहानपणी शिक्षणापेक्षा मासेमारी व चित्रकला यात विशेष रस होता. इ.स.१८४७ मध्ये डॉक्टरेट संपादन केल्यावर स्टॉसबर्ग विद्यापीठात त्यांची प्राध्यापकपदावर नियुक्ती झाली. त्यांचे सुरवातीचे संशोधन रसायनशास्त्रात होते. टार्टारिक आम्लाच्या रेणूंचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले की नैसर्गिक आणि कृत्रिमरीत्या तयार केलेल्या टार्टारिक आम्लाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म एकसारखे असले तरी त्याची ध्रुवीकृत प्रकाशाची दिशा बदलण्याची क्षमता वेगळी असते. या आम्लाच्या स्फटिकांचा सखोल अभ्यास करून पाश्चर यांनी आण्विक विषमतेचे अस्तित्व शोधले. यालाच आज स्टीरिओकेमिस्ट्रीचा पाया मानला जातो.

१८५४ मध्ये लिले विद्यापीठात विज्ञान शाखेचे डीन म्हणून नियुक्त झाले असताना, त्यांना स्थानिक डिस्टिलरीमध्ये अल्कोहोल उत्पादनाशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत करण्यास सांगितले गेले. त्यासाठी त्यांनी अल्कोहोलिक किण्वन प्रक्रियेवर अभ्यास सुरू केला आणि त्या प्रक्रियांमध्ये जीवांचा सहभाग असल्याचे प्रायोगिक पुरावे सादर केले. तसेच विविध किण्वन प्रक्रियेत त्यांचे विशिष्ट जीव संबंधित असल्याचे दर्शविले. यातूनच पुढे जैवतंत्रज्ञानाचा उगम झाला.

इ.स.१८६३ मध्ये, फ्रान्सचे सम्राट नेपोलियन-तिसरे यांच्या विनंतीनुसार, पाश्चर यांनी वाइन दूषित का होते, याचा अभ्यास केला. इतर अनावश्यक सूक्ष्मजीवांमुळे दूषित होण्यापासून रोखण्यासाठी, पाश्चर यांनी वाइन ६० अंश ते १०० अंश सेल्सिअस तापमानाला ३० मिनिटे गरम करण्याची प्रक्रिया वापरली. यालाच पाश्चरायझेशन असे संबोधतात. आज जगभरात अनेक पदार्थ, पेये व दुधाचे दीर्घकाळ जतन करण्यासाठी पाश्चरायझेशनचा वापर केला जातो.

इ.स.१८४९च्या सुमारास फ्रान्समध्ये रेशमाच्या किडय़ावर रोगाची लागण होऊन संपूर्ण युरोपातील रेशीमउद्योगाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होऊ लागले होते. त्यावर पाश्चर यांनी अखेर इ.स.१८६७ मध्ये अळय़ांची दूषित झालेली अंडी नष्ट करून निरोगी अंडय़ांपासून अळय़ा तयार करण्यात यश मिळवले व रोगावर नियंत्रण झाले.

पाश्चर यांनी प्राण्यांच्या व माणसांच्या अनेक प्राणघातक रोगांना कारक असलेले जंतू व त्यांचा परस्परसंबंध प्रथमच सिद्ध केला. यातूनच विज्ञानाला कलाटणी देणारा जंतू-सिद्धांत उदयाला आला. त्यांनी लसनिर्मितीचे शास्त्र विकसित केले. सर्वप्रथम कोंबडय़ा व नंतर माणसांसाठी अँथ्रॅक्स, रेबीज, कॉलरा, घटसर्प, क्षय, देवी यावर रोगप्रतिबंधक लसी तयार केल्या.

इ.स.१८८७ मध्ये त्यांनी ‘पाश्चर इन्स्टिटय़ूट’ची स्थापना केली. अनेक रोगांवरील उपचार व प्रतिबंधाच्या क्षेत्रात आजही पॅरीसमधील ही संस्था अव्वल दर्जाची मानली जाते.

– डॉ. अपर्णा दुभाषी

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईमेल : office@mavipa.org