ही आपली गावरान मेव्यातील चिंच. लालसर, गुलाबी बांगडीच्या आकाराचे आकडे असलेली ही चिंच म्हणजे एक हिरवागार सदाहरित वृक्ष. हा वृक्ष मूळचा पॅसिफिक महासागरानजीकचा रहिवासी आहे. म्हणूनच याचे नाव विलायती चिंच असे पडले. याचे इंग्रजी नाव ‘मनिला टॅमरिंड’ असून याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पिथेसेलोबियम डल्से’ असे आहे. लेग्युमिनोजी कुळात या वृक्षाची गणना केली जाते.
साधारण १५ ते २० मीटर वाढणारा हा वृक्ष आपल्याला खूप ठिकाणी मुद्दामहून लावलेला आढळतो. याचे खोड काळपट करडय़ा रंगाचे असते. त्याच्या फांद्या दूरवर विस्तारत जातात. म्हणून त्याचा पर्णसंभार मोठा विस्तारलेला असतो. त्यामुळे त्याची सावली चांगली पडते. त्याची पाने नाजूक, द्विखंडी, संयुक्त आणि हिरवीगार असतात. लहान पानाच्या मुळाशी बाजूला दोन टोकदार काटे असतात नवीन पाने येत असताना जुनी पाने गळून पडतात. त्यामुळे झाड सतत हिरवे गार दिसते. आकाराने लहान असलेली ही फुले एक सेमी व्यासाची पिवळट दुधट पांढऱ्या रंगाची असतात. बारीक केसरांचा नळीच्या आकाराचा पुंजका फुलाच्या तळाशी राहतो. याला शेंगा येतात. त्या ५ ते १० सेंमी आकाराच्या गोलाकार असतात. ५ ते १० चमकदार तांबट काळ्या बिया प्रत्येक शेंगेमध्ये असतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नवी पालवी आली की झाड फुलून शेंगा येईपर्यंत फेब्रुवारी महिना उजाडतो. या शेंगेच्या आकारावरूनच हिंदीमध्ये याला ‘जंगल जिलेबी’ असे म्हणतात.
या झाडाच्या सालीमध्ये टॅनिन असते. खोडाच्या सालीपासून पिवळा रंग काढतात. या झाडाचं लाकूड पिंगट रंगाचे, कठीण आणि मजबूत असते. नांगर, विविध प्रकारची खोकी तयार करण्यासाठी हे लाकूड उत्तम समजले जाते. कातडे कमावण्यासाठी आणि कातडे रंगवण्यासाठी याचा उपयोग करतात. याच्यापासून डिंक तयार होतो. रस्त्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी रस्त्याच्या कडेला हा वृक्ष लावला जातो.
अनिता कुळकर्णी (मुंबई) ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office[at]mavipamumbai[dot]org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागर आख्यान – रोमन राज्यस्थापना
रोम सध्या वसले आहे त्या इटालीच्या प्रदेशात सहा हजार वर्षांपूर्वी मानवी अस्तित्व असल्याच्या खुणा पुरातत्त्व विभागाला सापडल्या आहेत. एट्रस्कन या जमातीचे लोक ख्रिस्तपूर्व नवव्या शतकात इथे प्रथम राहावयास आले. या लोकांनी या प्रदेशात आपली लहान लहान गावे वसविली. हल्ल्ीच्या रोम शहराजवळच असलेले लॅटियम हे त्या पंचक्रोशीतले प्रमुख राज्य. लॅटियममध्ये राहणाऱ्यांना आणि त्यांच्या भाषेला ‘लॅटीन’ म्हणत. तिथल्या नुमिटर या राजाला त्याचा क्रूर भाऊ अम्पुलियस याने कपटाने पदच्युत केले. त्याच वेळी नुमिटरची मुलगी ऱ्हिआ सिल्व्हिया हिने एका जुळ्याला जन्म दिला. या जुळ्या मुलांची नावे तिने रोम्युलस आणि रेमस ठेवली. मार्स या देवतेपासून सिल्व्हियाला ही मुले झाली आणि त्यामुळे त्यांच्यात दैवी गुण आहेत असा लोकांचा समज होता. ही मुले आपले राज्य परत बळकावतील म्हणून सिल्व्हियाचा चुलता अम्युलियसने त्यांना नदीत बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. पण त्या वेळी तिथे असलेल्या एका लांडगिणीने (किंवा एका मेंढपाळाच्या बायकोने) त्यांना वाचवून त्यांचे संगोपन केले. ती मुले मोठी झाल्यावर त्यांनी अम्युलियसकडून आपले राज्य परत घेतले. ते आजोबा नुमिटरला देऊन पुढे ख्रिस्तपूर्व २१ एप्रिल ७५३ रोजी स्वत:साठी राज्य वसविले आणि त्याचे नाव ठेवले रोम ऊर्फ रोमा. या रोमचे राजेपद कोणी घ्यायचे, याबाबत पुढे रोम्युलस आणि रेमस या भावांमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यातून रोम्युलसने रेमसला ठार मारले. रोम्युलस रोमचा पहिला राजा झाला. रोम शहरात त्या काळी पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे रोमचे रहिवासी लॅटीन लोकांनी शेजारच्या राज्यातल्या सॅबाइन जमातीच्या लोकांना एका धार्मिक कार्यक्रमाला बोलवून त्या वेळी त्यांच्या स्त्रियांना पळवून त्यांच्याशी लग्ने लावली. त्यामुळे पुढे लॅटीन आणि सॅबाइन जमातींमध्ये नातेसंबंध निर्माण होऊन एकोपा झाला. हेच पहिले रोमन!-
सुनीत पोतनीस -sunitpotnis[at]rediffmail[dot]com

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manila tamarind
First published on: 05-04-2016 at 00:51 IST