वातावरणात बाष्पाच्या स्वरूपात पाणी आढळतं. हवेतलं हे बाष्प म्हणजेच आद्र्रता होय. पण, हवेचं तापमान वाढलं की हवेची पाणी धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढते. जास्त तापमानाला हवा अधिकाधिक बाष्प सामावून घेऊ शकते आणि आपल्याला हवेतला दमटपणा जाणवतही नाही. याउलट, हवेचं तापमान कमी झालं की हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि हवेतल्या बाष्पाचं रूपांतर दवामध्ये होतं. अशा वेळी हवेतला दमटपणा आपल्याला जाणवतो. याचाच अर्थ, ‘हवा दमट आहे’, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हवेमध्ये नेमकं किती बाष्प आहे यापेक्षा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, हे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळेच हवेतल्या आद्र्रतेचं मापन करताना ‘सापेक्ष आद्र्रता’ मोजली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सापेक्ष आद्र्रता म्हणजे ठरावीक आकारमानाच्या हवेत असलेलं बाष्पाचं नेमकं प्रमाण आणि त्या आकारमानाच्या हवेत त्या तापमानाला सामावू शकणारं कमाल बाष्प यांचं गुणोत्तर होय. सापेक्ष आद्र्रता शतमान किंवा टक्केवारीमध्ये व्यक्त केली जाते.

सापेक्ष आद्र्रता मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. एका पद्धतीमध्ये तापमानातील फरकाच्या मदतीने सापेक्ष आद्र्रतेचं मापन केलं जातं. त्यासाठी दोन तापमापकांचा वापर केला जातो. दोनपैकी एका तापमापकाच्या पारा ठेवलेल्या फुग्याला मलमलचं पातळ कापड गुंडाळलेलं असतं आणि ते सतत ओलं राहण्याची व्यवस्था केलेली असते. ओलसर कापडातून पाण्याचं बाष्पीभवन होत असल्याने या तापमापकावर काहीसं कमी तापमान दाखवलं जातं. या तापमानाला ‘वेट बल्ब तापमान’ म्हणतात. दुसऱ्या तापमापकाचा पाऱ्याचा फुगा कोरडा ठेवलेला असतो. या तापमापकावर दाखवल्या जाणाऱ्या तापमानाला ‘ड्राय बल्ब तापमान’ म्हणतात.

जर हवेतली सापेक्ष आद्र्रता कमी असेल तर पाण्याचं बाष्पीभवन जास्त प्रमाणात होतं आणि ओल्या तापमापकाचा फुगा जास्त थंड होतो. त्यामुळे दोन्ही तापमापकांतल्या तापमानातला फरक जास्त होतो. पण जर आद्र्रता खूप जास्त असेल तर पाण्याचे बाष्पीभवन अगदी कमी होतं आणि दोन्ही तापमापकांनी दाखवलेल्या तापमानातील फरक खूप कमी असतो. सापेक्ष आद्र्रता जर १०० टक्के असेल तर पाण्याचं बाष्पीभवन शून्य होऊन दोन्ही तापमापक समान तापमान दाखवतात.

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

डी. जयकान्तन यांची कथा..

जयकान्तनच्या कथा या अनुवादित संग्रहातील अंधाराकडे दोन मैत्रिणींच्या भेटीचा या कथेचा विषय आणि त्याकडे बघण्याचा, व्यक्त होण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा आहे ते जाणून घेऊ या.

पट्टू आणि रुक्कू या दोन मैत्रिणी अनेक वर्षांनी अचानक भेटतात. परिस्थितीवश गावातून शहरात आलेल्या या दोघी मुली इतकी वर्षे इथे काय करतात? याविषयी दोघीही एकमेकींना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. शहरामध्ये येऊन दुहेरी जीवन जगणारी पट्टू स्वत:विषयी नीटसे काही सांगत नाही. पण रुक्कू  मात्र शहरातील धडपडीविषयी, ती करत असलेल्या मॉडेलिंगविषयी मोकळेपणाने बोलू लागते तेव्हा मॉडेलिंगकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी ही कथा आपल्याला देते. बडे आर्टिस्ट रुक्कूला सांगतात, चित्र, शिल्पकला भवन (चित्रकाराचा स्टुडिओ) ही जागा एखाद्या मंदिरासारखी पवित्र आहे. माणसाचं सौंदर्य केवळ पोषाखाचं सौंदर्य असू शकत नाही तर कपडे, दागिने या सगळ्या विकृती आहेत. इथे फक्त शिक्षणापुरतीच आपल्या  सौंदर्याची गरज भासते.. नीट विचार कर. नग्नता काय अश्लील असते? या रंगमंचावर येता क्षणी तुम्ही जणू निसर्गाचाच एक अंश बनता. इथे सौंदर्य हेच आवरण असते. कलाकाराने त्याची अभिलाषा न धरता, त्यातून एखादी सत्य गोष्ट, कलाकृती निर्माण केली पाहिजे. त्या ठिकाणी स्त्री-पुरुष भेद नाहीसा होतो. हा धंदा नसून कलेची सेवा आहे. तुला मान्य असेल तर तू मॉडेल म्हणून इथे राहू शकतेस. त्याबद्दल तुला मानधनही मिळेल. हे सार ऐकून रुक्कू मॉडेल बनायला तयार होते. पण हे सारं बोलणं पट्टूला नीटस समजतच नाही. हे सारं ऐकल्यावर आपण स्वीकारलेलं नरकपुरीतील आयुष्य आठवून तिला रडावंसंच वाटलं. तरीही उपरोधाने ती रुक्कूला म्हणते, ‘कलाबिला तू काहीही म्हण. अखेर तुझं पोटच तुला तुझे कपडे उतरावयाला भाग पाडतं. खरं ना? शेवटी सगळं पोटासाठीचना? त्यावर रुक्कू म्हणते, ‘हे मॉडेलिंग करायला मला कोणी भाग पाडत नाही. कुणाला खुश करण्यासाठी मी हे करीत नाहीए. हां, तू अंधारात उभी असतेस आणि मी स्टुडिओच्या उजेडात, मॉडेल म्हणून उभी असते.. एक अभिमानाची गोष्ट आहे तर दुसरी शरमेची.

स्त्री जन्मात पतित झालेल्या पट्टूसमोर पुरुष स्पर्शापासून दूर राहिलेली, उज्ज्वल स्त्रीत्वाची ज्योतच जणू अशी रुक्कू, पट्टूला मदतीचा हात देऊ करते. स्टुडिओत घेऊन जाते. पण मला माफ कर. मी चालले इथे फार प्रकाश आहे- म्हणत पट्टू निघून जाते.

थोडय़ा वेळानंतर प्रकाशाचं वस्त्र चोहोबाजूंनी लपेटून त्या कलाभवनात कितीतरी वेळा रुक्कु आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करीत उभी होती.. त्याचवेळी पट्टू मात्र अंधाराच्या दिशेने पळत सुटली होती. अंधाराचंच वस्त्र लेवून कुणा बरोबर तरी स्वत:ला लपवण्यासाठी शहराच्या अंधेऱ्या वस्तीकडे ती पळत होती..

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Measuring humidity humidity counting
First published on: 17-10-2017 at 02:25 IST