फळातील गराच्या रंगावरून प्रामुख्याने सफेद पेरू व गुलाबी पेरू अशा दोन जाती दिसून येतात. महाराष्ट्रात सरदार या जातीची लागवड मोठय़ा प्रमाणावर झालेली दिसून येतात. या जातीची फळे आकाराने मोठी व गोलसर असून बियांची संख्या कमी असते. फळातील गर चवीस गोड असून तो पांढऱ्या रंगाचा असतो. या फळामध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर असते. हे फळ अत्यंत नाशवंत असल्याने दूरच्या बाजारपेठेसाठी पाठवता येत नाही. त्यामुळे त्यापासून प्रक्रिया पदार्थ तयार करणे फायदेशीर असते.
पेरूपासून रस तयार करण्यासाठी थोडेसे पिवळसर रंगाचे पेरू वापरतात. त्याचा लगदा करून, तो गाळून, त्यात पेक्टीन एन्झाइम मिसळून गरम करतात. थंड झाल्यावर रस वेगळा करतात.
पेरूच्या रसात सायट्रिक आम्ल व पाणी टाकून मिश्रण गरम करतात व त्यात सोडियम बेन्झोएट मिसळून सरबत बनवतात.
पेरूच्या रसापासून बनवलेले काबरेनेटेड शीतपेय फार स्वादिष्ट असते. यासाठी पेरूच्या रसात साखर, सायट्रिक आम्ल, टीएसएस, केएमएस टाकून सिरप तयार करतात व त्यात कार्बन डायॉक्साइड वायू भरतात.
कच्च्या पेरूपासून जेली तयार करता येते. आंब्यापासून जसा आम्रखंड तयार करतात, तसा पेरूच्या गरात चक्का, साखर व पिवळा रंग मिसळून पेरूखंड तयार करता येतो.
पेरूच्या फोडी हवाबंद डब्यात कित्येक महिने साठवता येतात. त्यासाठी पक्व पेरूच्या साल व बियांविरहित फोडी मिठाच्या द्रावणात थोडा वेळ ठेवून त्यात साखरेचा पाक टाकतात. या मिश्रणाची बरणी गरम पाण्यात ठेवून पाश्चरायझेशन करतात.
पेरूचा गर, साखर, मक्याचे पीठ, वनस्पती तूप हे मिश्रण शिजवून त्यात मीठ, सायट्रिक आम्ल टाकतात. पुन्हा शिजवून गरम मिश्रण परातीत पसरतात व तुकडे करतात. तयार झालेली ही पेरूची टॉफी म्हणजे लहान मुलांना चॉकलेटच्या रूपात फळांचे सेवन करण्याची गोडी लावण्याचा उत्तम मार्ग.
बिया काढलेल्या पेरूच्या फोडी मिठाच्या द्रावणात ठेवून व सुकवून पावडर तयार करतात. रसापासूनही पावडर बनवता येते.
-डॉ. विष्णू गरंडे (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
जे देखे रवी.. – दोन मोठे वैष्णव
मी लहान होतो तेव्हा टिळक जाऊन अनेक वर्षे झाली होती. पण गांधी गेले तेव्हा मी नऊ वर्षांचा होतो. सगळ्याच नातेवाईकांचे टिळकांचे नुसते नाव काढले तरी डोळे चकाकत असत. महाराष्ट्रातल्या नवशिक्षित पांढरपेशा समाजावर टिळकांचा मोठा पगडा होता. टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केला. इंग्रजांविरुद्ध डोळ्यात भरतील, अशा आक्रमक भूमिका घेणारे टिळकच. अनेक कारणांमुळे ते तुरुंगात गेले. सर्वात महत्त्वाचे कर्म करणे हेच गीतेचे सार असल्याचे त्यांच्या गीतारहस्य या पुस्तकात त्यांनी ठासून सांगितले. या विचाराची दुसरी बाजू अशी की, त्यांनी काढलेल्या शाळेचे नाव New English School असे होते. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था काढली त्या संस्थेने Fergusson College काढले त्यात त्यांनी काही वर्षे शिकविले. त्यांनी Maratha नावाचे इंग्रजी वर्तमानपत्र चालविले आणि त्यांना ब्रह्मदेशात इंग्रजांनी तुरुंगात पाठविण्याआधी जो खटला चालला त्यातला त्यांचा त्यांनी स्वत: केलेला बचाव इंग्रजीत होता. ब्रह्मदेशातल्या तुरुंगातच त्यांनी गीतेवर गीतारहस्य लिहिले तेव्हा ते त्यांना लिहिता यावे यासाठी इंग्रजांनी त्यांना अनेक पुस्तके ठेवण्यास परवानगी दिली आणि त्या पुस्तकांत त्यांनी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा प्रखर प्रतिवाद केला असूनही इंग्रजांनी त्या पुस्तकावर बंदी घातली नाही. इंग्लंडमधल्या मजूर पक्षाला, तो पक्ष भारताला स्वातंत्र्य देण्यास धार्जिणा होता म्हणून, टिळकांनी देणगी दिल्याची नोंद इतिहासात सापडते.
मग गांधी युग सुरू झाले. त्यांनीही गीतेचाच आधार घेत समाजकारण आणि राजकारण केले. कर्मयोगाऐवजी अनासक्त योग सांगितला. इंग्रजांच्या विरुद्धचा संघर्ष चालूच ठेवला. असहकार आणि सत्याग्रह या नव्या कल्पना मांडल्या आणि अहिंसात्मक विरोधाची नवी प्रथा सुरू केली. टिळक, गांधी दोन्ही युगांत संघर्ष आणि सहजीवन दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालू होत्या याचे कारण ज्या विष्णूप्रधान पुस्तकांवर त्यांनी त्यांचे जीवन बेतले होते. त्या गीतेत युद्ध सोडून इतके सारे पर्याय दडलेले होते आणि ते वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर अशा तऱ्हेने महाभारताच्या पाश्र्वभूमीवर रचले होते की, इंग्रजांना शेवटी नाकी नऊ आले. यापेक्षा उघड युद्ध पत्करले, असे त्यांना मनोमनी वाटले असणार, पण ते शक्यच नव्हते. एक मृतप्राय संस्कृती इंग्रजी शिकून डोळे किलकिले करून बघू लागली होती. त्या संस्कृतीचे संचित असे की, दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ‘असतीलही ते आमचे शत्रू, पण इतक्या दिवसांचा सहवास आहे. तेव्हा आपण त्यांच्या बाजूनेच लढायचे,’ असे उद्गार गांधींनी काढले. श्रीकृष्णाला रणछोडदास म्हणतात ते उगीचच नाही. माणसाला योद्धा आणि मुत्सद्दी दोन्ही व्हावे लागते.
उद्या इंग्रजांबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – आयुर्वेदीय प्रथमोपचार तातडीचे उपचार (भाग-२)
आयुर्वेदीय ग्रंथात आशुकारी आत्ययिक अवस्था, कष्टसाध्य अवस्था, रोगाच्या प्राथमिक अवस्थेतील उपचार, रिष्ट लक्षणे व त्याकरिता उपचार असा विविध अंगांनी, विविध ठिकाणी विचार केलेला आढळतो. त्याचप्रमाणे औषधी द्रव्यांचे गुणधर्म सांगताना द्रव्यांचे आशुकारी कार्य आवर्जून सांगितलेले दिसते. विशेषत: विषोपविषे, कर्पूर वर्गातील द्रव्ये, सुगंधी द्रव्ये यांचे तत्काळ काम करण्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत.
आयुर्वेदीय इमर्जन्सी ट्रीटमेंटचा विचार करता रोगांच्या मूळ कारणांचा विचार थोडा बाजूला ठेवून रोगांच्या प्रमुख लक्षणांचाच विचार डोळ्यासमोर हवा. उलटय़ा, जुलाब होऊ लागल्यावर दोष कोणता आहे हे शोधण्यापेक्षा ते थांबविणे, रक्तक्षय किंवा डिहायड्रेशन होऊ न देणे याला फार महत्त्व आहे.
आयुर्वेदात वात, पित्त, कफ अशा तीन दोषांचा विचार, रोगांचे मूलभूत कारण किंवा प्रकार म्हणून केला जातो. वातविकार झपाटय़ाने येणारे-जाणारे, अनाकलनीय, खात्री भरोसा देता येणार नाही असे चंचल, आपले रंगरूप वारंवार बदलणारे, गतिमान व गतिविध्वंसक असे असतात. पित्तामुळे उत्पन्न होणारे विकार तीव्र, एकदम झपाटा दाखविणारे पण अल्पायू असे असतात. इथे रोगाचे स्वरूप बघता बघता रौद्र स्वरूप धारण करते, त्याला एक निश्चित पण तुलनेने लहान कालावधी असतो.
या दोघांचे उलट कफविकार आहे. कफविकार कळतनकळत सावकाश मंद वेगाने व फार तीव्र वेदना न देता हळूहळू वाढत असतात. या कफ स्वरूपाच्या विकारांची तातडी नेहमी भासते असे नाही. मात्र वात व पित्त यांचे स्वतंत्र विकार व त्यांच्याच प्रामुख्याने संबंध असलेले वातपित्त, वातकफ व पित्तकफ अशा विकारांच्या इमर्जन्सी ट्रीटमेंटसंबंधात विचार व्हावयास हवा. काही विकारांत वात, पित्त, कफ या तिघांचेही कमी-अधिक किंवा साम्यावस्था असे स्वरूप असते. इथे तारतम्याने प्रमुख दोषांनुरूप, दुसऱ्या दोघांना न दुखावता उपचार करावे लागतात.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – १७ डिसेंबर
१९०१> कथा-कादंबरीकार यशवंत गोपाळ जोशी यांचे निधन. त्यांच्या कथांचे पुर्नभेट (सात भाग), तुळशीपत्रे आणि इतर लघुकथा, रेघोटय़ांचे दैवत, मायेच्या सावल्या, तरंग आदी संग्रह निघाले, तसेच पडसाद, होमकुंड या कादंबऱ्या. दुधाची साय हे पुस्तकही आत्मपर पुस्तकांत उल्लेखनीय ठरले. वहिनींच्या बांगडय़ा आणि शेवग्याच्या शेंगा हे गाजलेले चित्रपट त्यांच्या कथांवरून निघाले.
१९२४> संघातले दिवस आणि इतर लेख या गाजलेल्या पुस्तकासह, सावरकर ते भाजप, किबुट्झ-नवसमाजनिर्मितीचा एक प्रयोग, आदी पुस्तके लिहिणारे अभ्यासक सखाराम हरी देशपांडे यांचा जन्म. सावरकरी हिंदुत्वापासून आजचे राजकारण कसे, किती व का दूर गेले याची अभ्यासपूर्ण चिकित्सा त्यांनी वेळोवेळी केली होती.
१९४२> नट आणि नाटककार विष्णू हरी औंधकर यांचे निधन. ‘बेबंदशाही, आग्य््रााहून सुटका’ ह्य़ा ऐतिहासिक नाटकांसह ‘महारथी कर्ण’ हे पौराणिक नाटकही त्यांनी लिहिले.
१९८५> ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘या, घर आपलंच आहे’ अशी कित्येक, एकापेक्षा एक यशस्वी नाटके लिहिणारे नाटककार व नट मधुसूदन रामचंद्र कालेलकर यांचे निधन.
– संजय वझरेकर