सुमारे आठशे वर्षांपूर्वीपासून युद्धात अग्निबाणांचा वापर केला गेल्याची इतिहासात नोंद आहे. घन इंधन वापरलेल्या अशा अग्निबाणांचा वापर चीन, कोरिया, अरबस्तान, मंगोलिया आणि भारतातसुद्धा होत होता. भारतात हैदर अली आणि टिपू सुलतान या पिता-पुत्रांनी इंग्रजांविरुद्ध ‘मैसूर रॉकेट’ वापरून त्यांच्यावर जरब बसवली होती. ही रॉकेट्स पत्र्याची बनवलेली असायची आणि ती सरळ दिशेने जावीत म्हणून त्यांना मागे एक काठी लावलेली असायची. यानंतरच्या काळात ज्यूल्स व्हर्न आदी विज्ञानकथा लेखकांनी ‘रॉकेट’च्या मदतीने अंतराळ प्रवास करण्याच्या कल्पना पुरवल्या. अंतराळ संशोधनासाठी रॉकेटच्या वापराची व्यावहारिक कल्पना सुचवली ती रशियाच्या कॉन्स्टन्टिन त्सिओल्कोव्स्की याने. त्सिओल्कोव्स्कीने रॉकेटचा सैद्धान्तिक अभ्यास केला. सन १९०३ मध्ये त्याने अधिक पल्ला गाठण्यासाठी घनस्वरूपी इंधनाऐवजी द्रवस्वरूपातले इंधन वापरण्याची सूचना केली.

अमेरिकेच्या रॉबर्ट गॉडर्ड याने अंतराळ उड्डाणाची कल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणली. गॉडर्डच्या मते, सुरुवातीलाच सर्व इंधन जाळण्यापेक्षा जर हे इंधन टप्प्यांच्या (स्टेजेस्) स्वरूपात वापरले, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून रॉकेटला अधिक उंची गाठणे शक्य होणार होते. १९१० च्या दशकात गॉडर्डने घन इंधनाच्या वापराद्वारे आपले रॉकेटवरील प्राथमिक प्रयोग सुरू केले. परंतु अल्पकाळात त्याच्याही लक्षात आले की, घन इंधनापेक्षा द्रवरूपी इंधन हे अधिक उपयुक्त ठरेल. द्रवरूपी इंधनाच्या वापराचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने, गॉडर्डचे हे काम अत्यंत आव्हानात्मक ठरले. अखेर सर्व तांत्रिक अडचणींवर मात करून गॉडर्डच्या रॉकेटने १६ मार्च १९२६ रोजी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथील वोर्सेस्टर येथे झाले.

गॉडर्डच्या रॉकेटची एकूण उंची सुमारे तीन मीटर होती. हे रॉकेट दोन मीटर उंचीच्या सांगाडय़ात बसवले होते. या रॉकेटसाठी गॉडर्डने पेट्रोल आणि द्रवरूपी ऑक्सिजन इंधन म्हणून वापरले होते. इंधनाने पेट घेतल्यानंतर पुरेसा रेटा निर्माण होईपर्यंत २० सेकंदांसाठी हे रॉकेट जमिनीवरच थांबले. त्यानंतर या रॉकेटने ताशी सुमारे १०० किलोमीटर वेगाने साडेबारा मीटरची उंची गाठली आणि अखेर ते ५६ मीटर अंतरावर जाऊन पडले. या रॉकेटचा एकूण प्रवास जरी फक्त अडीच सेकंदांचाच असला, तरी या द्रवरूपी इंधनावर आधारलेल्या पहिल्या रॉकेटद्वारे अंतराळयुगाचा आरंभ झाला.

सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org