scorecardresearch

कुतूहल : आभाळाचा रंग कसा?

आपल्याला दिसणारा प्रकाश आणि वेगवेगळे रंग हे सूर्यापासून येणाऱ्या विद्युत चुंबकीय प्रारणाचा छोटा हिस्सा आहेत.

आकाशातली रंगांची उधळण आपण रोजच पाहात असतो. आज त्यापाठीमागचे विज्ञान जाणून घेऊ या. आपल्याला दिसणारा प्रकाश आणि वेगवेगळे रंग हे सूर्यापासून येणाऱ्या विद्युत चुंबकीय प्रारणाचा छोटा हिस्सा आहेत. साधारणत: ३८०-७५० नॅनोमीटर (म्हणजे ०.०००३८ ते ०.०००७ मिलिमीटर) या पट्टय़ातील तरंगलहरी आपण पाहू शकतो. जांभळय़ा रंगाच्या तरंगलहरींची लांबी सर्वात कमी असते, तर लाल रंगाच्या तरंगलहरी सगळय़ात जास्त लांब असतात.

वातावरणातून येताना प्रकाशलहरींची धूलिकण व वायूंच्या अणु /रेणूंशी टक्कर होऊन प्रकाशलहरी शोषल्या जातात किंवा त्यांच्या ऊर्जेत बदल न होता त्यांची दिशा बदलते. दुसऱ्या प्रकाराला विकरण (स्कॅटिरग) म्हणतात. वातावरणातील अधिक उंचीवरील थरातील अणु/रेणू किंवा धूलिकण खूपच लहान, काही नॅनोमीटर असतात. अशा कणांपासून विकिरित झालेल्या तरंगलहरींची प्रखरता तरंगलांबीच्या चतुर्थ घाताच्या व्यस्त प्रमाणात असते. त्यामुळे विकिरित तरंगलहरींत जांभळय़ा वा निळय़ा तरंगलहरी इतर रंगांच्या तुलनेत खूप अधिक प्रखर असतात. आपला डोळा जांभळय़ा रंगापेक्षा निळय़ा रंगाप्रति जास्त संवेदनशील असतो म्हणून विकिरित होऊन येणारा प्रकाश आणि आकाशही आपल्याला निळे दिसते. याला रॅले विकिरण असे म्हणतात.

वातावरणातील खालच्या थरात आढळणारे बर्फाचे कण, पाण्याचे थेंब इत्यादींचा आकार साधारणत: तरंगलांबी एवढाच असतो. त्यापासून विकिरित होणाऱ्या तरंगलहरींची प्रखरता तरंगलांबीच्या व्यस्त प्रमाणात असते. विकिरित तरंगलहरीत निळय़ा तरंगलहरी सर्वात जास्त प्रखर असतात, परंतु इतरही रंग प्रखर असतात. विकिरित प्रकाशातील पिवळय़ा हिरव्या रंगांमुळे आकाश फिकट निळे किंवा राखाडी दिसते. याला मिए विकिरण असे म्हणतात.

पावसाळय़ात आकाश खूपदा काळसर दिसते, कारण पाण्याने भरलेल्या ढगात पाण्याच्या थेंबांचा आकार बराच मोठा असतो. त्यात सूर्यकिरण शोषले जाऊन हे ढग काळे दिसतात.

वातावरणात असलेले ढगातील पाण्याचे थेंब किंवा धुके इत्यादींच्या कणांचा आकार जर तरंगलहरींपेक्षा फार मोठा असेल तर सर्व रंग सारख्याच प्रमाणात विकिरित होतात आणि आकाश पांढरे दिसते. बर्फवृष्टी म्हणूनच पांढरी दिसते.

सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य क्षितिजावर असतो आणि प्रकाशलहरींना आपल्यापर्यंत येण्यासाठी बरेच जास्त अंतर पार करावे लागते. या प्रवासादरम्यान निळय़ा जांभळय़ा लहरींचे अगोदरच विकिरण होते, आणि आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशात लाल व पिवळय़ा तरंगलहरींचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे क्षितिज वा आजूबाजूचे आकाश आपल्याला लाल, पिवळे, नािरगी दिसते.

– डॉ. सुभगा कार्लेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Science behind the beautiful colors of the sky zws