पृथ्वीवरील अनेक सूक्ष्मजीव व त्यांच्या वसाहती (कॉलनीज) म्हणजे आपल्या नजरेत सहज लक्षात न येणारे विज्ञानाचे देखणे रूप आहे. ‘‘स्लाईम मोल्ड’’ हे यातीलच एका सौंदर्यपूर्ण सूक्ष्मजीवाचे उदाहरण. हा शब्द ऐकताक्षणी चिकट लिबलिबीत बुरशी, असे काहीसे चित्र आपल्या डोळय़ासमोर आले असावे. मात्र बुरशी आणि प्रोटोझोआ (आदिजीव) या दोघांचे गुणधर्म काही प्रमाणात दर्शविणारा, चित्ताकर्षक रचना आणि रंग निर्माण करणारा हा सूक्ष्मजीव आहे. 

इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडव्हान्स आर्किटेक्चर ऑफ कॅटालोनिया (आय.ए.ए.सी.) मधील स्थापत्यतज्ज्ञ वास्तुशास्त्रीय शोधांची माहिती घेण्यासाठी सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियांवर संशोधन करत आहेत. ‘लिव्हिंग स्क्रीन्स’ (जिवंत पेशींचा पातळ पापुद्रा) हा त्यांचा असाच एक प्रकल्प. यामध्ये स्लाईम मोल्डच्या वसाहतींचा तसेच त्यामधील कल्पक आणि नवीन रचनांच्या शक्यतांचा अभ्यास केला जात आहे. स्लाईम मोल्डची अनुकूलता, बहुरूपता, रंग आणि सौंदर्य यांनी अनेक वास्तुविशारदांना अचंबित केले आहे. बाह्य उद्दीपनांस प्रतिसाद देण्याच्या गुणधर्मामुळे आणि त्यांच्या पेशीतील परस्पर संवादामुळे स्लाईम मोल्ड एक स्वयंप्रेरित द्रव्य म्हणून कार्य करते. त्यामुळे सतत त्यांचा आकार बदलत असल्याचे दिसून आले आहे.  या प्रकल्पाद्वारे स्लाईम मोल्डचा जैविक गुणधर्म अभ्यासून त्यांचा असे रचनात्मक जैव-यंत्र म्हणून वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Apple, Let Loose, May 7, iPads
विश्लेषण : शक्तिमान आयपॅड.. नवीन एआय.. की आणखी काही…? ‘ॲपल’च्या ७ मेच्या कार्यक्रमात काय घडणार?
scientists to make healthier white bread
विश्लेषण: व्हाइट ब्रेडही चक्क पौष्टिक होणार? ब्रिटनमधील संशोधकांचा अनोखा निर्धार!
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!

या संशोधनाचा अजून एक प्रमुख भाग म्हणजे स्लाईम मोल्डच्या मूलभूत गुणधर्माचे अधिकाधिक विश्लेषण करून संगणकाच्या साहाय्याने हे गुणधर्म वास्तुशास्त्रात कसे वापरू शकतो हे पाहणे. हे सूक्ष्मजीव इतक्या गुंतागुंतीची कवकतंतूंची रचना कशी करतात? कवकतंतूंमधे काही ठिकाणीच बीजाणू निर्मिती कशी होते? विशिष्ट ठिकाणीच रंगद्रव्याची निर्मिती का होते? हे तंतू उभे आणि आडवे कसेही कसे वाढू शकतात? असे अनेक प्रश्न शास्त्रज्ञांसमोर आहेत. स्लाईम मोल्डचे पातळ पापुद्रे प्रकाशाची तीव्रता कमी करतात. तसेच परावर्तित प्रकाशाचा रंग बदलतात. पापुद्र्याच्या पारदर्शकतेत बदल व सावली निर्माण करण्यासही ही स्लाईम मोल्ड सक्षम आहेत. या रचनांच्या बाबींचा विचार केल्यास हा अभ्यास जैवप्रक्रियेचे मूल्य अधोरिखित करतो. यातून असेही लक्षात येते की या सजीवाला स्थापत्यशास्त्रात समाविष्ट केल्याने ती जागा अधिक जिवंत होऊ शकते. सजीव व निर्जीव, घन व द्रव, तसेच विज्ञान व कला यांच्यातील बंधने काढून टाकण्याची क्षमता या देखण्या स्लाईम मोल्डमध्ये आहे. पृथ्वीवरील हे सूक्ष्म सौंदर्य स्थापत्यशास्त्रास भविष्यामध्ये एक वरदान ठरू शकते.

– डॉ. गिरीश ब. महाजन

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org