डॉ. श्रुती पानसे

‘माकडापासून माणूस घडला’ किंवा ‘आदिमानवाने चाकाचा शोध लावला’ ही संकल्पना तिसरीतल्या आठ वर्षांच्या मुलांना स्पष्ट करून सांगायची तर त्यांना काळाच्या केवढं तरी मागे न्यावं लागेल. त्यांच्या मनात उमटणाऱ्या छोटय़ा छोटय़ा प्रश्नांना समजतील अशा भाषेत आणि समजतील अशा उदाहरणांसह उत्तरं द्यावी लागतील. अशा संकल्पना स्पष्ट करत करत शिक्षक शिकवत असतील तर मुलांना त्या संकल्पना समजतील. अन्यथा अशा अवघड, कल्पनेच्या पलीकडच्या संकल्पनांची नोंद घेणं हे अनेकदा त्यांच्या मेंदूच्या आवाक्याबाहेर असतं.

जे शब्द आधीपासून माहीत आहेत, ज्या संकल्पना माहीत आहेत, त्या शब्दांना मेंदू प्रतिसाद देतो. ज्या विषयाशी संबंधित अनुभव घेतलेले आहेत, त्या संदर्भातले शब्द कृतींसह पक्के कळलेले असतात. त्या बाबतीत प्रश्न नसतो. प्रश्न असतो तो माहीत नसलेल्या शब्द- संकल्पनांबद्दल. पालक किंवा शिक्षक शिकवत असतात, त्यावेळी  ऐकलेल्या माहितीतले बरेचसे शब्द कळलेच नाहीत, तर तिथे ‘रिकाम्या जागा’ तयार होतात. तांत्रिक भाषेत सांगायचं तर मेंदूत विद्युत-रासायनिक प्रक्रिया घडून येत नाही. ते शब्द केवळ कानांवरून जातात. मेंदू अर्थासह त्याची दखल घेत नाही. त्यामुळे त्या शब्दांचं आकलन होत नाही.

प्रौढांच्या मेंदूतही हे घडत असतं. इंग्रजी बातम्या ऐकताना जे तांत्रिक शब्द माहितीचे नसतात, ते समजत नाहीत. माहीत नसलेली भाषा ऐकत असताना तर सगळेच शब्द आकलनाशिवाय तसेच पुढे जातात. परंतु या शब्दांचा लगेच शब्दकोषात अर्थ बघितला तर बातमीचा एकूण अर्थ चटकन लागतो. तसाच मुलांचाही आकलनाशिवाय ऐकलेला मजकूर तसाच वाया जातो. दिवसभरातल्या विविध विषयांच्या तासांमध्ये असे अनेक ‘मजकूर’ वाया जातात.

अशा रिकाम्या जागा भरणं हे पालक – शिक्षकाचं खरं काम आहे. विषय शिकवणं म्हणजे समोरच्याला जे माहीत नाही ते नीटपणे माहीत करून देणं. पण असं नीटपणे माहीत करून दिलं जातं का, याचं उत्तर शोधावं लागेल. वर्गात जर खूप मुलं असतील तर एका शिक्षकाला प्रत्येकाची दखल घेणं कदाचित जमणार नाही.

contact@shrutipanse.com