scorecardresearch

भाषासूत्र : भलूबाईची मवाळ भाषा भांडण लावून बघते तमाशा

अशाच विमलाबाई होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर, आकर्षक दिसायचे खरे, पण त्यांच्या डोक्यात सदैव विचारांची दलदलच असायची.

भाषासूत्र : भलूबाईची मवाळ भाषा भांडण लावून बघते तमाशा
प्रतिनिधिक छायाचित्र photo source : loksatta file photo

डॉ. माधवी वैद्य

भलूबाई म्हणजे वरवर भोळेपणाचा आव आणणारी बाई, व्यक्ती. काही माणसे आपल्या गोड बोलण्याने लोकांना अंकित करून घेतात. आणि एकदा असा एखादा आपल्या तावडीत सापडला की मग आपले नको ते उद्याग सुरू करतात. अशी प्रेमळ, नम्र भासणारी व्यक्ती मग दुसऱ्याच्या पोटात शिरून त्यांच्या मनातला भाव जाणून घेते आणि मग त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला तिखट मीठ लावून ते इतरांना सांगत सुटते. कधी कधी त्यांचे कानही एकमेकांविरुद्ध भरते. काहीबाही सांगून त्यांच्या संबंधात विघ्न आणते. त्यांच्यात वितुष्ट आले की आपण त्या गावचेच नाही जणू असे म्हणून आपणच लावून दिलेल्या भांडणाची मजा बघत बसते.

अशाच विमलाबाई होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर, आकर्षक दिसायचे खरे, पण त्यांच्या डोक्यात सदैव विचारांची दलदलच असायची. कोणाते तरी वितुष्ट आणल्याशिवाय त्यांच्या मनाला चैनच पडायचे नाही. सासूला सुनेच्या चहाडय़ा सांग आणि सुनेला सासूच्या! दुसरा उद्योगच नसायचा त्यांना. असतात ना अशी काही माणसे आपल्या अवतीभवती! आपल्या गोड आणि साळसूद बोलण्याने त्यांनी आपल्या बहिणीचे आणि तिच्या सुनेचे संबंध इतके बिघडवून टाकले की त्या एकमेकीचे तोंड बघायलाही तयार होईनात. आता मात्र विमलाबाई आपले काम झाले असे समजून मस्तपैकी दोघींच्या भांडणाचा तमाशा बघत बसल्या आहेत आणि इतरांनाही बघायला उद्युक्त करीत आहेत. ही एकदा शिलगवलेली वादाची ठिणगी विझायची शक्यता तशी कमीच! तोवर त्या वादात चमचा चमचा तेल टाकून तो कसा भडकेल, त्याकडेही त्या आपल्या गोड आणि बोलघेवडय़ा स्वभावाने लक्ष देतीलच यात काही शंकाच नाही. चला! ‘भलूबाई’चे तरी काम झाले! तिला काय, रोजच बघायला मिळतोय बिनपैशाचा तमाशा!

madhavivaidya@ymail.Com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 04:00 IST

संबंधित बातम्या