डॉ. माधवी वैद्य     

एक दिवस माझ्या मैत्रिणीची लेक अगदी खूश होऊन माझ्याकडे आली आणि मला सांगू लागली, ‘‘अगं, काय सांगू मावशी तुला! अगं, आपल्या त्या कसूरकर वहिनी आहेत ना, त्यांच्याकडे आज गेले होते. पेढे द्यायला. माझ्याशी इतकं छान बोलल्या. म्हणाल्या, ‘थांब पोरी, इतके सुंदर मार्क्‍स मिळवले आहेस परीक्षेत तू! आधी तुझी दृष्टच काढून टाकते’. आणि असं म्हणून त्यांनी खरंच दृष्ट काढली माझी.’’ मी म्हटलं, ‘‘अगं बाई! खरंच का? आणि काय म्हणाल्या त्या?’’ ती पुढे उत्साहाने सांगू लागली, ‘‘आणि त्या म्हणाल्या, ‘हे बघ, तू परवा ये बरं का माझ्याकडे. जेवायलाच ये. अगं, तू मला माझ्या नातीसारखीच. तुझं खूप कौतुक करायचं आहे मला. तुला काय आवडतं जेवायला? हवं ते गोडधोड करीन. आणि एक छानसं बक्षीसही देईन बरं का! मी काय देईन ते गोड मानून घेशील ना गं?’ मला फारच आवडल्या त्या.’’ मी हसले आणि गप्प बसले. मनात म्हटलं, वाट बघा! यांच्या हातून काय सुटणार? ‘हाताची जड आणि बोलून गोड’ अशी आहे ही बाई! कारण त्यांच्या अशा प्रकारे गोड बोलण्याने भारावून गेलेली ही पाचवी मुलगी मला त्यांचे गुणगान ऐकवत होती. पण आधीच्या चौघींपैकी कोणाच्याच पदरी काही पडलेले नाही अजून. ना जेवण, ना भेटवस्तू! नुसती बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात!           

काही व्यक्ती अशाच असतात. इतक्या गोड गोड बोलतात की समोरच्याला बोलणे ऐकूनच मधुमेह व्हावा. त्यांचे गोड बोलणे ऐकून विरघळून जायला होते, पण त्या बोलण्यात काही तथ्य नव्हते असे कालांतराने त्या व्यक्तीच्या लक्षात येते.

जो नुसतीच पोपटपंची करतो आणि काही देण्यासाठी मात्र आपली मूठ कधीच उघडत नाही, अशा स्वभावाच्या माणसासाठी ‘हाताचा जड आणि बोलून गोड..’ ही म्हण तंतोतंत लागू पडते.

अजून तरी कसूरकर वहिनींचे बक्षीस त्या भाचीला मिळालेले नाही. ती भाची बिचारी बक्षिसाची वाट बघते आहे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

madhavivaidya@ymail.com