विजेला मानवी जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे; कारण आपली बरीचशी कामे त्यावर अवलंबून असतात. अंबरची (एक प्रकारची वनस्पतीपासून मिळणारी राळ) काडी केसाळ भागावर घासली की भेंडाच्या (ज्वारी, बाजरीच्या खोडाच्या आतील सुकलेला गर) तुकडय़ासारखा हलका पदार्थ त्याकडे आकर्षति होतो, म्हणजेच अंबर विद्युतभारित होते, असे आढळले. अशा रीतीने स्थिरविद्युतचा शोध लागला. काच, गंधक, मेण, लाख या पदार्थातही अंबरसारखा गुणधर्म आहे. अंबरला ग्रीक भाषेत ‘इलेक्ट्रॉन’ व लॅटिन भाषेत ‘इलेक्ट्रम्’ म्हणतात. त्यावरून इलेक्ट्रिसिटी (वीज) हा शब्द रूढ झाला.

विद्युतभारित असलेल्या काही पदार्थात एकमेकांत आकर्षण तर काही पदार्थात प्रतिकर्षण आढळले. याचे कारण शोधताना विद्युतप्रभार धन व ऋण असे दोन प्रकारचे असतात असे लक्षात आले. समभारात प्रतिकर्षण व विषमभारात आकर्षण दिसून येते.

It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?

आद्र्र वातावरणात दोन भिन्न धातूंमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्माण होते, असे व्होल्टा या शास्त्रज्ञाच्या निदर्शनास आले. याचा उपयोग करून पहिली विद्युतघटमाला त्यांनी बनविली. त्याला व्होल्टाचा विद्युतघट म्हटले गेले. यातूनच पुढे आधुनिक विद्युतघटांचा विकास झाला.

विद्युतधारा म्हणजे विद्युतप्रभाराचे वहन. विद्युत परिपथामध्ये वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन्सकडून या प्रभाराचे वहन होते. विद्युतवाहकाच्या धातूच्या अणूमध्ये केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स असतात. त्यातील काही इलेक्ट्रॉन्स अणुकेंद्रकाशी क्षीण बलाने बद्ध असतात, त्यांना मुक्त इलेक्ट्रॉन्स म्हणतात. हे मुक्त इलेक्ट्रॉन्स वाहकात एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सहजपणे जाऊ शकतात, ज्याच्याबरोबर ऋण प्रभाराचे वहन होते. वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच ठरावीक क्षेत्रातून एकक कालावधीत वाहणारा विद्युतप्रभार म्हणजेच विद्युतधारा होय.

विद्युतवाहक तार जेव्हा विद्युतघटाला जोडलेली नसते, तेव्हा तिच्यातील इलेक्ट्रॉन्स इतर अणूंच्या दरम्यान मुक्तपणे फिरत असतात. पण जर या तारेची टोके विद्युतघटास जोडली तर इलेक्ट्रॉन्स ऋणप्रभारित असल्याने ते घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहू लागतात. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहामुळे तारेतून विद्युतधारा वाहते.

रक पद्धतीत विद्युतप्रभाराचे एकक कुलोम असून कालावधी सेकंदांत मोजतात आणि विद्युतधारा अ‍ॅम्पिअर या एककात व्यक्त करतात. जर वाहकातून एका सेकंदास एक कुलोम इतका विद्युतप्रभार प्रवाहित होत असेल, तर त्या वाहकात एक अ‍ॅम्पिअर विद्युतधारा वाहत आहे असे म्हणतात.  विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणे व्यक्त करण्यासाठी मिलिअ‍ॅम्पिअर व मायक्रोअ‍ॅम्पिअर ही एकके वापरतात.

-डॉ. सुनंदा जनार्दन करंदीकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

गिरीश कर्नाडांचे ‘हयवदन ’

‘हयवदन’ हे नाटक कर्नाडांचे एक महत्त्वाचे, वैशिष्टय़पूर्ण लेखन आहे. १९७० च्या सुमारास ‘हयवदन’ कन्नड रंगभूमीवर प्रदर्शित झालेले, लोकसाहित्यावर आधारलेले पहिले नाटक आहे. या नाटकाला भारतभर मिळालेल्या यशाने नाटकात लोकसाहित्य वापरण्याची परंपरा निर्माण झाली. या नाटकाची मध्यवर्ती कल्पना ‘कथासरित्ससागर’- या संस्कृतमधील प्राचीन कथासंग्रहातून घेतलेली आहे. याचं स्वरूप कोडय़ासारखं आहे.

‘हयवदन’मध्ये परिपूर्णतेसाठी मनुष्याचा शाश्वत शोध आहे. हृदय आणि मेंदू यांच्यामध्ये वाटला गेलेला माणूस एकाची सर्वोच्चता आणि दुसऱ्याचे आकर्षण याच्या स्पर्धेत आपली ओळख हरवून बसतो. अपूर्णतेचं रहस्य उलगडण्यासाठी लेखकाने देवदत्त, कपिल आणि पद्मिनी ही तीन प्रातिनिधिक पात्रं निवडली आहेत. या दोन पुरुषांच्या डोक्याची काली मंदिरात अदलाबदली झाली तर कुठला पुरुष कोण? हे कसं ओळखायचं? डोक्यावरून वा धडावरून? या बदलामुळे मानवाच्या मनातील अनेक विसंगती समोर येतात.

मानवी जीवनातील अंतर्विरोध, ताणतणाव अत्यंत कल्पकतेने नाटय़रूपात व्यक्त झाले आहेत. प्रसंगानुरूप आणि प्रभावशाली कथन हे ‘हयवदन’ चे वैशिष्टय़ आहे. केवळ कन्नड नाटय़लेखनासाठीच नाही तर संपूर्ण आधुनिक भारतीय नाटय़ लेखनातील ही एक महत्त्वपूर्ण नाटय़कृती आहे. कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारही ‘हयवदन’ला मिळाले आहेत. संगीत आणि नृत्याचा वापर केलेलं भारतातील पहिलंवहिलं आधुनिक नाटक म्हणून ‘हयवदन’चं अभूतपूर्व स्वागत झालं.

‘नागमंडल’ या नाटकात लोककथेचा उत्तम वापर करून, कर्नाडांनी प्रेमाचं अमरत्व यशस्वीपणे दाखवलं आहे. या नाटकाला दोन शेवट आहेत. या नाटकाचा इंग्रजी अनुवादही झाला असून, त्याचे अमेरिकेत प्रयोगही झाले आहेत.

‘तलेदंड’ नाटकाचा विषय ऐतिहासिक आहे. पण त्यातील बेबंदशाहीचं वर्णन करताना कर्नाडांनी आपल्या देशातील राजकीय परिस्थितीचं रूपक रचलं आहे.

कर्नाडांची नाटकं वैशिष्टय़पूर्ण आहेत, लोकप्रिय आहेत. पुरस्कारप्राप्त आहेत. पण तरीही नाटक हे उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकत नाही. हे जाणवल्याने ते चित्रपटसृष्टीकडे वळले.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com