शेतीचे सिंचन करण्यासाठी आपण वापरतो ते पाणी योग्य आहे की नाही, हे त्या पाण्यातील ‘सार’ (एसएआर ‘म्हणजेच ‘सोडियम अ‍ॅबसॉप्र्शन रेश्यो) हा घटक मोजला की कळते.  म्हणजेच सोडियमचे अन्य धन आयनांशी असलेले प्रमाण. जमिनीत सोडियम इतर धन आयनांच्या तुलनेत जास्त झाल्यास, सार वाढतो व जमिनीचा पोत खराब होतो. पिकासाठीही ते हानीकारक ठरते.
मातीचे पाण्यात द्रावण बनवून त्यातील आयनांचे प्रमाण मोजून सार काढतात. सार जेव्हा १५ पेक्षा जास्त होतो, तेव्हा झाडांची पानगळ होते, त्यांना पाणी मिळत नाही, वाढीसाठी आवश्यक द्रव्ये मिळत नाहीत. माती ओली असल्यावर मऊ बनते आणि वाळल्यावर अगदी कठीण बनते. एकंदरीतच, जमीन रचनाविरहित होते. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही. मातीतील पाण्याचा योग्य निचरा होत नाही. झाडांच्या मुळांना हानी पोहोचते.
सारनुसार जमिनीचे चार प्रकार करतात (सार १० पेक्षा कमी, १० ते १८, १८ ते २६ आणि २६ पेक्षा जास्त). सार या घटकाचा परिणाम जमिनीच्या प्रकारानुसार बदलतो, हे उपाययोजना करताना लक्षात घ्यावे लागते. सार जास्त असलेली जमीन पिकांना लागवडीयोग्य करण्यासाठी जमिनीत जिप्सम (कॅल्शियम सल्फेट) टाकतात. त्यामुळे जमिनीत कॅल्शियम वाढून सार कमी होतो.
वनस्पतीच्या शरीरात जिप्समची क्रिया, पाणी व क्षारांचे प्रमाण, क्षार गाळण्याची वनस्पतीची क्षमता, सभोवतालची परिस्थिती अशा अनेक बाबींवर जिप्समचे प्रमाण ठरवतात. ‘सभोवतालची परिस्थिती’ याचा अर्थ हा की, शेती करण्यासाठी नसíगकरीत्या वाढणाऱ्या, खोल मुळे असलेल्या झाडाझुडुपांचे उच्चाटन केले असेल, तर पिकाच्या मुळाशी क्षारांचे प्रमाण वाढते. हे क्षार पाण्याबरोबर पिकाच्या शरीरात जात असतात. सारचे नियंत्रण करताना हे लक्षात घेतात.
समुद्राच्या पाण्यातही काही वनस्पती वाढतात. याचाच अर्थ, पाण्यातील सार जास्त असतानासुद्धा त्या स्थितीशी सामना करू शकणाऱ्या वनस्पतीची, पिकाची जात असू शकते. त्यामुळे रसायने वापरून सार दुरुस्त करण्यापेक्षा पिकाची कोणती जात वापरून आपण सारचे नियमन करू शकतो, याचा अभ्यास व्हायला हवा.
– उपेंद्र कुलकर्णी (नांदेड) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस : त्वचाविकार भाग -२
आयुर्वेदीय थोर संहिता ग्रंथात कुष्ठविकाराचे दोन प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. त्यातील क्षुद्र कुष्ठविकार-त्वचाविकारांच्या कारणांचा मागोवा पुढीलप्रमाणे आहे. १) इसब, गजकर्ण, खरूज, नायटा-साथ असणे, रोगी माणसाचा संपर्क, अस्वच्छ राहणी, खराब पाणी, काँग्रेससारखे विषारी गवत, प्लॅस्टिक, रबर, नायलॉन, टेरेलिन अशांची पादत्राणे व कपडे (नापिताच्या दूषित वस्तऱ्याने मानेला नायटा होतो.) विषारी वायू, तेल यात काम करणे. सल्फा ड्रग घेणे, शरीरात कफ व पित्ताची म्हणजेच पू व उष्णतेची फाजील वाढ होण्याची कारणे घडणे, थोडक्यात, रस-रक्त बिघडणे, शौचाला साफ न होणे, जंत व कृमी असणे, मधुमेह व स्थूलपणा होण्यास कारण असणारा खूप गोड, पचावयास जड, फाजील मीठ व आंबट पदार्थाचा वापर असणे. २) त्वचेवरील काळे व पांढरे डाग- काळे डाग-आंबट, खारट, दही, मिरची, लोणचे, पापड, लिंबू अशा पदार्थाच्या अतिरेकी आहाराने तसेच पेट्रोलियम पदार्थ, केमिकल्स, विषारी गॅस, गंध, साबण, सोडा यांच्या संपर्कात सातत्याने दीर्घकाळ काम असणे, त्यामुळे त्वचेवर विशेषत: उघडय़ा त्वचेवर काळे डाग पडतात व वाढत जातात. पांढरे डाग, पांडुता, कृमी, जंत, जास्त मीठ किंवा आंबट पदार्थ खाणे, पोट साफ नसणे, यामुळे त्वचेवर, गालावर, चेहऱ्यावर, हातावर पांढरे डाग उठतात. अशाच कारणाने छाती, गळा यावर शिब्याचे पांढरे डाग उठतात. ३) रूक्ष व तेलकट त्वचा- शरीराचे पोषण होईल असा संतुलित प्रमाणशीर आहार नसणे. उशिरा जेवण, उपवास, कदन्न, शिळे अन्न, पोषणाअभावी त्वाचा रूक्ष होणे. भरीस भर म्हणून उन्हातान्हात, पावसात श्रमाची भरपूर कामे, यामुळे त्वचा रुक्ष होऊन जळवात, भेगा असे विकार होतात. याउलट अति स्निग्ध तेलकट, तुपकट, पौष्टिक आहार खाऊन त्वचा फारच तेलकट होते.या क्षुद्र त्वचाविकारांची कारणे टाळण्याकरिता शरीराची आंतरबाहय़ स्वच्छता, साधी राहणी, मीठ वा आंबट पदार्थाचा किमान वापर व आठवडय़ातून किमान एक दिवस लंघन करावेच. आपले कपडे उकळून रोज धुवावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

This is what happens to the body when you drink milk tea every day
तुम्ही रोज दुधाचा चहा प्यायला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा
viagra tablet for dimensia
लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्रा मेंदूसाठी ठरणार फायदेशीर? काय सांगतंय नवीन संशोधन?
How much water do you need to drink to control blood sugar?
मधुमेह असलेल्यांसाठी निर्जलीकरण धोकादायक; रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी किती पाणी प्यावे?तज्ज्ञांनी दिले उत्तर
beetroot-pineapple-lemon juice remedy for iron deficiency
रक्तातील लोह वाढवण्यासाठी ‘बीट, अननस अन् लिंबाचा रस ठरेल का फायदेशीर? काय सांगतात तज्ज्ञ?
Aluminium Foil paper or butter paper
अ‍ॅल्युमिनियम फॉइल पेपर की बटर पेपर? खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी काय योग्य जाणून घ्या
Black Salt Water Benefits
तुमचेही केस खूप गळतात का? काळ्या मिठाचं पाणी प्या अन् फरक बघा; जाणून घ्या योग्य पद्धत
ginger health benefits
तुम्ही रोज रिकाम्या पोटी आल्याचा तुकडा चघळल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Loksatta explained Should licenses be enforced for weather forecasters
विश्लेषण: हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांसाठी परवाने लागू करावेत का?

जे देखे रवी.. : भक्त आणि विज्ञान
मागच्या लेखातला मारुतीला घास भरवणारा तो ज्येष्ठ नागरिक रेल्वेत खलाशी म्हणून लागला आणि रेल्वेच्याच वर्कशॉपमधे देखरेख करणारा अशा त्याच्या दृष्टीने मोठय़ा हुद्दय़ावर असताना निवृत्त झाला. मारुती ह्य़ांचा घास स्वीकारतो अशी यांची खात्री. ह्य़ा भक्ताला बघून मला हेवा वाटला आणि मी हेलावलो. कोठल्या प्रकारचा भक्त होता हा? हा प्रश्न विचारण्याचे कारण माहिती मिळवण्यात पटाईत असलेल्या म्याने भक्ताचे चार प्रकार असतात ही माहिती मिळवली आहे. एक भक्त काही मिळावे अशी इच्छा ठेवून येतो. आम्ही दोघे त्यातले नसणार. हे सुखी वाटले. माझ्यापुरते म्हणाल तर भारतातल्या पाच टक्के खाऊनपिऊन सुखी ह्य़ा सदरात मी मोडतो. काही भक्त दु:ख निवारण्यासाठी येतात. त्यातले हे नसणार. चाळीस वर्षे घास भरवत आहेत तेव्हा काही विशिष्ट दु:खासाठी हे येण्याची शक्यता कमी. मी मात्र त्या मानाने कमीच. माझी साडेसाती सुरू होणार तेव्हा मारुती ह्य़ा इष्ट देवतेकडे मी जाणे म्हणजे जरा स्वार्थीच विचार झाला. तिसऱ्या प्रकारचा भक्त कुतूहलाने देवाकडे वळतो असे वर्गीकरण आहे. त्यात मी शंभर टक्के बसतो. हे गृहस्थ तसे नसणार. देव हे त्यांच्या बाबतीतले गृहीतक आहे. शेवटचा भक्ताचा प्रकार अजब आहे. त्याला ह्य़ा विश्वातल्या चैतन्य नावाच्या तत्त्वाचे आकलन होते. हा भक्त संसार वगैरे करतो, पण वैकुंठाच्या मार्गावर नसतो, तर हा स्वत:च वैकुंठ झालेला असतो. त्याला कोठे जावे लागत नाही, उलट मी तुझ्यासाठी धावत येईन, असे दस्तुरखुद्द श्रीकृष्ण ह्य़ाला वचन देतो. हा विश्वचैतन्याच्या सागरात स्वत: एक खालीवर होणारी लाट असतो आणि लाट असली तरी मी हा महासागरच आहे असे उमगतो. व्यक्ती असूनही व्यक्तिमत्त्व हरवतो. हा समर्पित असतो. मी फक्त माहिती देतो आहे. पण खरे सांगायचे तर हे सगळे मला फारच भारी जाते. आपल्या शास्त्रात शंका, संशय किंवा विकल्प ह्य़ा गोष्टींना थारा देऊ नका, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. म्हणून माझी आणखीनच कुचंबणा होते. त्यातल्या त्यात बाराव्या अध्यायात ‘माझी पूजा कर, माझी सतत आठवण ठेव, मला तुझ्या चोवीस तासांतले निमिष तरी दे, हे सगळे जमत नसेल तर तुझी कर्मे मला अर्पण कर आणि ह्य़ाही पुढे अगदीच जर त्रास करून घ्यायचा नसेल तर स्वत:ची बुद्धी वापर’ असा क्रम सांगितला आहे. भक्तियोग ज्या अध्यायात सांगितला आहे त्यात तुझे डोके वापर असा संदेश मिळाल्यामुळे माझ्यासारख्याला बुडत्याला काडीचा आधार मिळाल्यासारखे वाटते आहे.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ४ मार्च
१८७७ >  ‘धौममहाबळेश्वरवर्णन’ या चार भागांच्या पुस्तकाद्वारे स्थलवर्णनपर लेखनाची शिस्त मराठीत घालून देणारे यशवंतराव आनंदराव उदास यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी निधन.
१८८६ > ‘गोंधळ’ या कलेला राजमान्यता मिळवून देणारे राजाराम रामचंद्र कदम यांचा जन्म. अनेक गोंधळगीते त्यांनी स्वत रचून मराठी लोककाव्याच्या मौखिक परंपरेत भर घातली.  
१९६८ > ‘मौक्तिकप्रकाश अर्थात मोत्यांविषयी सर्व काही’ तसेच ‘रत्नप्रदीप (खंड १ व २)’ या पुस्तकांतून मोत्यांसह विविध रत्नांचे विज्ञान आणि अन्य माहिती सुगम मराठीत मांडणारे रत्नपारखी महादेव लक्ष्मण खांबेटे यांचे निधन.
१९८५ > लेखक, विचारवंत, निबंधकार पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांचे निधन. ‘महाराष्ट्रसंस्कृती’ या ग्रंथातून इसवीसन पूर्व २३५ ते इ. स. १९४७ या काळाचा आढावा त्यांनी घेतला. ‘माझे चिंतन’, ‘विज्ञानप्रणीत समाजरचना’, ‘भारतीय लोकसत्ता’ ही त्यांची गाजलेली पुस्तके. राजविद्या, पराधीन सरस्वती हे स्फुटलेख संग्रह तर ‘लपलेले खडक’ हा कथा संग्रही, ‘वधुसंशोधन’ आणि ‘सत्याचे वाली’ ही नाटकेदेखील त्यांनी लिहिली होती!
– संजय वझरेकर