दूध, मद्य किंवा फळांचे रस, यांसारख्या अन्नपदार्थातील रोगकारक किंवा अन्न खराब करणारे जंतू नष्ट करण्यासाठी, तो पदार्थ अल्पकाळाकरिता उच्च तापमानाला तापवण्याच्या पद्धतीला ‘पाश्चरायझेशन’ म्हणतात. पाश्चरायझेशनच्या शोधाची पाळेमुळे १८५०-६०च्या दशकातील, फ्रान्समधल्या मद्यव्यवसायापर्यंत पोहोचतात. त्या काळात फ्रान्समधील लिले विद्यापीठात विज्ञान विभागाचा अधिष्ठाता असणाऱ्या लुई पाश्चरला बिगो हा माणूस भेटायला आला. बीटाच्या साखरेपासून मद्य तयार करणारी त्याची फॅक्टरी होती. या फॅक्टरीत यीस्ट या सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने, बीटाच्या साखरेचे किण्वन (फर्मेटेशन) करून मद्याची निर्मिती केली जाई. बिगोच्या फॅक्टरीतील मद्याची चव अनेक वेळा बदलून ती आंबट होत असे. बिगोशी बोलणे झाल्यानंतर, लुई पाश्चरने अशा आंबट मद्याचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले. या नमुन्यांत त्याला किण्वनासाठी वापरल्या जाणाऱ्या गोलाकार यीस्टव्यतिरिक्त लांबट आकाराचे अ‍ॅसिटोबॅक्टेर अ‍ॅसेटी हे सूक्ष्मजीवाणूही आढळले.

इ.स. १८५७मध्ये लुई पाश्चर पॅरिस येथील इकोल नॉम्रेल सुपीरियूर या महाविद्यालयात रुजू झाला आणि त्याने मद्यासंबंधीचे संशोधन हाती घेतले. पाश्चरने ओळखले की, ही रासायनिक क्रिया नसून जीवाणूंद्वारे घडून आलेली क्रिया आहे. पाश्चरला सापडलेले जीवाणू, किण्वनाद्वारे निर्माण झालेल्या अल्कोहोलचे आंबट चवीच्या अ‍ॅसेटिक आम्लात रूपांतर करीत होते. १८६२ साली पाश्चरने या जीवाणूंचा नाश करण्यासाठीच्या चाचण्या हाती घेतल्या. या वेळेपर्यंत मद्य आंबट होण्याचा प्रकार फ्रान्समधील अनेक मद्यनिर्मितीच्या ठिकाणी होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पाश्चरच्या पुढील प्रयोगांनी, मद्य जर पन्नास ते साठ अंश सेल्सियसपर्यंत तापवून थंड केले, तर मद्याची चव न बदलता त्यातील जीवाणू नष्ट होत असल्याचे दाखवून दिले. पाश्चरने १८६५ साली या प्रक्रियेचे पेटंटही मिळवले.

पाश्चरने सुचवलेली ही प्रक्रिया मद्यव्यवसायाने लगेच स्वीकारली. मात्र ही प्रक्रिया दुग्धव्यवसायापर्यंत पोचण्यास काही काळ जावा लागला. दुधातील जीवाणूंद्वारे विषमज्वर, स्काल्रेट फीव्हर, घटसर्प, क्षयरोग, असे अनेक रोग पसरत असत. १८८६ साली जर्मन कृषीरसायनतज्ज्ञ फ्रांझ फॅन सॉक्झलेट याने, पाश्चरने मद्यासाठी सुचवलेली प्रक्रिया दुधासाठीही वापरण्याची सूचना केली. दुधासाठी या प्रक्रियेचा वापर सुरू होताच दगावणाऱ्या बालकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आणि लुई पाश्चरने संशोधलेली ही प्रक्रिया ‘पाश्चरायझेशन’ या नावे सुप्रसिद्ध झाली.

– डॉ. रंजन गग्रे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org