|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर

जगातील विविध देश कृत्रिम प्रज्ञेचा वापर करत आहेत. आपल्या देशातही तो सुरू झाला आहे..

वाफेवरील इंजिनापासून इलेक्ट्रिक मोटार ते इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर आणि सध्याच्या युगातील डिजिटल-विश्व निर्माण असा रंजक प्रवास माणसाने फक्त आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पूर्ण केला आणि आता शेवटी त्याच मानवी बुद्धिमत्तेची प्रतिकृती मशीन्समध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तंत्रज्ञानालाच ‘आर्टिफिशिल इंटेलिजन्स’ म्हणून संबोधिले जाते, ज्याबद्दल आपण आतापर्यंतच्या लेखमालेत माहिती घेतली. अँड्र एनजी, जगातील एआय गुरू व गुगल ब्रेनचे जनक म्हणतात तसे, त्या काळातील इलेक्ट्रिकच्या शोधाप्रमाणेच एआयचा शोध व उपयुक्तता भविष्यातील जगासाठी राहणीमान आमूलाग्रपणे बदलून टाकणारे व तितकेच ऐतिहासिक ठरेल.

कदाचित याचमुळे जगातील विविध देश व त्यांची सरकारे, जागतिक कंपन्या व संस्था, स्टार्टअप्स, छोटे-मोठे व्यावसायिक सगळेच या तंत्रज्ञानाचा उपयोग ‘व्यवसायविस्तार व मूलभूत परिवर्तन’ करण्यासाठी कसा करता येईल म्हणून विविध योजना राबवीत आहेत. काही प्रमुख जागतिक घडामोडी व भाकिते पुढीलप्रमाणे-

१) भारताचा जीडीपी २०३५ पर्यंत फक्त एआयच्या योग्य धोरण व अंमलबजावणीमुळे १.३% जास्त वाढू शकतो.

२) २०३५ पर्यंत जगातील ४६% नोकऱ्या व व्यवसाय एक तर पूर्णपणे नवीन, सध्या अस्तित्वात नसलेल्या प्रकारच्या असतील किंवा पूर्णपणे नवीन कौशल्य लागणाऱ्या असतील.

३) वाफेवरील इंजिन, इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटरमुळे जसे नवनवीन व्यवसाय, नोकऱ्या निर्माण झाल्या त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानदेखील अनेक नवीन व्यवसाय, नोकऱ्या, उद्योगधंदे निर्माण करेल, ज्यासाठी आतापेक्षा जास्त मनुष्यबळ लागेल, पण वेगळे कौशल्य असलेले.

४) अमेरिका, चीन, जपान, ब्रिटन, जर्मनी इत्यादींच्या सरकारांनी आपापल्या ‘शासकीय एआय समित्या’ कधीच निर्माण केल्या असून त्यात मंत्री, उद्योग क्षेत्रातील काही निवडक पुढारी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

५) संयुक्त अरब अमिरातीने तर चक्क ‘मिनिस्ट्री ऑफ एआय’ असे वेगळे मंत्रिपदच निर्माण केले. तसेच ब्रिटनमध्ये ‘ऑफिस ऑफ एआय’, ‘कौन्सिल ऑफ एआय’ निर्माण झाली आहेत.

एआय (कृत्रिम प्रज्ञा) म्हटले की चार प्रमुख गोष्टी महत्त्वाच्या- डेटा कॅप्चर, डेटा ट्रान्स्फर, डेटा अ‍ॅनॅलिटिक्स आणि अ‍ॅक्शनेबल-इनसाइट्स. डेटा ट्रान्स्फरसाठी व डेटा अ‍ॅनॅलिटिक्सच्या सादरीकरणासाठी उच्चगतीची टेलिकॉम यंत्रणा आवश्यक. तसेच अंतिम वापरकर्ता म्हणजेच तुम्हीआम्ही, त्यांना सेवा पुरवायलादेखील उच्च गतीची इंटरनेट सेवा हवीच. त्यामुळेच अनेक देशांत ५जीच्या चाचण्या सुरू आहेत, तर काही ठिकाणी सरकार पुरस्कृत ‘फायबर नेटवर्क’ निर्माण केले जात आहे. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियाचा ‘नॅशनल ब्रॉडब्रँड नेटवर्क’ नामक पायाभूत सुविधांचा प्रकल्प. आपल्या देशातही ‘डिजिटल इंडिया’ खरोखरीच घडवायचा असेल तर सर्वप्रथम गावोगावी टेलिकॉम नेटवर्क व इंटरनेट कनेक्टिव्हिटी अत्यंत गरजेची आहे. तीदेखील उच्च गतीची, वाजवी दरात आणि सतत बंद न पडणारी.

भारतातील घडामोडी

आपल्या देशात २०१७ मध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स टास्क फोर्स’ निर्माण केला. आयआयटी मद्रासचे डॉ. कामाकोटी हे त्याचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच टीसीएसचे डॉ. गौतम श्रॉफ हेही त्याचे सदस्य आहेत. या कार्यदलाचे प्रमुख ध्येय आहे भारताच्या आर्थिक, राजकीय आणि कायदेशीर विचारांच्या प्रक्रियेत एआय तंत्रज्ञान अंतर्भूत करून जागतिक एआय अर्थव्यवस्थेतील एक पुढारलेला देश बनण्यासाठी योगदान करणे. त्याची प्रमुख उद्दिष्टे अशी : १) एआयचा देशांतर्गत आर्थिक फायद्यासाठी वापर. २) एआय धोरण व कायदे निर्माण करणे. ३) सरकारला पंचवार्षिक एआयविषयक सल्ले व शिफारशी. अधिक महितीसाठी (https://www.aitf.org.in/).

महाराष्ट्र सरकारनेही २०१८ मध्ये देशातील एआय कंपन्या, स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी व सामाजिक आव्हाने एआय तंत्रज्ञान वापरून सोडविण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्होव्हेशन चॅलेंज’ नावाचा प्रकल्प सुरू केला. निवड झालेल्या एआय कंपन्या, स्टार्टअप्सना सरकारसोबत संयुक्तपणे पायलट प्रकल्प सुरू करायचा असतो. प्रामुख्याने आरोग्य, कृषी, शिक्षण, परिवहन, स्मार्ट सिटी, जलसंवर्धन व दिव्यांगांसाठी खास सुविधा अशा क्षेत्रांत हे होणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. (https://ai-innovation.maharashtra.gov.in/)

आपल्या निती आयोगाच्या २०१८ मधील नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अहवालानुसार भारताला एआयसंदर्भात तीन प्रमुख संधी आहेत. अधिक माहितीसाठी पाहा-(https://niti.gov.in/writereaddata/files/ document_publication/NationalStrategy-for-AI-Discussion-Paper.pdf)

१) देशांतर्गत आर्थिक संधी व विस्तार  एआय वापरून इंटेलिजन्ट ऑटोमेशन, भांडवल आणि श्रमात वाढ. मुख्य म्हणजे नवीन उपक्रम, व्यवसाय, रोजगारनिर्मिती.

फक्त एआयमुळे आपला जीडीपी १.३ टक्क्याने वाढू शकतो. २०३५ पर्यंत व तितक्याच प्रमाणात रोजगारनिर्मिती.

२) देशांतर्गत सामाजिक विकास व परिवर्तन

माहितीचे लोकशाहीकरण योग्य पद्धतीने झाले की सर्वसामान्य त्याच माहितीचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करू लागतात. उदाहरणार्थ, कृषी क्षेत्रात शेतमालाच्या बाजारभावाबद्दल मशीन  लर्निग वापरून अंदाज वर्तविणे व माहिती त्यांच्यासाठी सहजासहजी उपलब्ध करून देणे.

वरीलप्रमाणे महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या सामाजिक आव्हाने व एआय तंत्रज्ञान यांची सांगड घालून नवीन प्रकल्प व संशोधन.

३) भारत हे जगाचे एआय गॅरेज

एफ. सी. कोहली, ज्यांना आदराने ‘फादर ऑफ इंडियन आयटी इंडस्ट्री’ म्हटले जाते, त्यांनी ४०-४५ वर्षांपूर्वी भारत जागतिक आयटी उद्योगाच्या केंद्रस्थानी राहील असा अंदाज वर्तविला होता. त्यांचे स्वप्न आज नक्कीच खरे झाले असून त्याचप्रमाणे भारत भविष्यात जागतिक एआय उद्योगाच्या केंद्रस्थानी राहील असेही वाटते. जगाला एआय सेवा, सुविधा पुरविण्यातील कमीत कमी ४०% हिस्सा आपण राखू व देशांतून पुरवठा करू, म्हणजे तितकेच आयटी रोजगार व संधी उपलब्ध होतील.

तरीही काहींना अजूनही एआय म्हणजे कविकल्पना किंवा अतिशयोक्ती वाटते. म्हणून खासकरून आपल्याच देशात एआय वापरून अंमलबजावणी झालेली काही सुंदर उदाहरणे आज अस्तिवात आहेत. त्याबद्दल-

१) एचडीएफसी बँकेने एआयच्या नॅच्युरल लँग्वेज प्रोसेसिंगवर आधारित ‘एव्हा’ नावाची चॅटबॉट सादर केलीय. मार्च २०१८ पासून तिने आजपर्यंत जवळजवळ ३० लाख यशस्वी ग्राहक संवाद पूर्ण केलेत. तसेच चॅटबॉट अनेक भारतीय बँका, वित्तीय संस्था, इतर कंपन्या आपल्या ग्राहक सेवेसाठी वापरत आहेत. एसबीआय बँकेची ‘सिया’ नावाची चॅटबॉट सुरू असून त्यांच्या काही शाखेत एआयच्या कॉम्प्युटर व्हिजनवर आधारित  फेश्यल रेकग्निशन कॅमेरे लावले आहेत. ते शाखेत आलेल्या ग्राहकांच्या चेहऱ्याचा नकळत फोटो काढून बँकेला ग्राहक संतुष्ट की असंतुष्ट असा रियल टाइम प्रतिसाद देतात. आयसीआयसीआयने आपल्या २०० पेक्षा अधिक अंतर्गत बॅक ऑफिस प्रक्रिया रोबोटिक सॉफ्टवेअर वापरून ‘ऑटोमेट’ केल्यामुळे त्यांचा ग्राहक सेवा प्रतिसाद वेळ ६० टक्क्यांनी कमी झाला व अचूकता १०० टक्क्यांनी वाढली.

२) २०१८च्या ऑगस्टमध्ये अपोलो हॉस्पिटल्स आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया यांनी मिळून त्यांच्या ग्राहकांसाठी ‘हृदयरोग असण्याची शक्यता वर्तविण्यासाठी’ एआय बेस्ड अलगोरिथम्स वापरून ‘हृदयरोग रिस्क-स्कोरिंग’ प्रणाली विकसित केली. त्याच प्रकल्पामध्ये आता मधुमेहामुळे येणारे अंधत्व आधीच ओळखण्यासाठीच्या प्रणालीची भर पडलीय. ‘एआय नेटवर्क फॉर हेल्थकेअर’ प्रकल्पाच्या अंतर्गत मायक्रोसॉफ्ट इंडियाने एसआरएल डायग्नोस्टिकसह भागीदारीची घोषणा केली. कर्करोगाचे पूर्वनिदान, रक्त व इतर चाचण्या करायला आलेल्या ग्राहकांसाठी.

३) पंजाब पोलिसांनी ‘पीएआयएस’ नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. यात एआय फेश्यल रेकग्निशन व एनएलपी वापरून तेथील १ लाखाहून अधिक सराईत गुन्हेगार आणि कैद्यांचा डेटाबेस बनविला आहे. गस्त घालताना कोणी इसम संशयास्पद कृती करताना आढळला तर पोलीस स्मार्टफोन वापरून  लगेच तिथल्या तिथे त्याचा फोटो घेऊन पीएआयएस अ‍ॅपमध्ये जाऊन ‘सर्च’ करतात. समोरील व्यक्ती सराईत गुन्हेगार, फरारी तर नाही ना, हे लगेच कळते.  भारतातील प्रत्यक्षात वापरात असलेल्या एआयआधारित तंत्रज्ञानाची अशी अनेक उदाहरणे देता येतील. उद्दिष्ट इतकेच की, आपले मराठी नागरिक कुठेही मागे पडू नयेत- नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरात आणि मुख्यत्वे फायदा करून घेण्यात. असो.

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com