अनेक जण सांगतात, मला खूपच निराश वाटतं आणि स्वत:चा राग येतो, पण मला कळत नाही असं का वाटतं ते.. पण तेच कारण आहे असं वाटण्याचं.. ही मनाची युक्ती आहे. समजून घेण्याऐवजी ऊर्जा धिक्काराकडे वळू लागते. आणि बदल तर समजून घेण्यातूनच घडतो, स्वत:चा धिक्कार करून नव्हे.

खरं तर मन खूप धूर्त आहे : तुम्ही ज्या क्षणाला एखाद्या गोष्टीकडे बघायला सुरुवात करता, त्या क्षणाला मन त्या गोष्टीवर उडी घेतं आणि तिची निर्भर्त्सना करू लागतं. आता सगळ्या ऊर्जेचं रूपांतर या निर्भर्त्सनेत होऊन जातं. समजून घेणं विसरलंच जातं, सगळी ऊर्जा खर्च होते ती धिक्कारावर. त्याची काहीच मदत होत नाही.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

धिक्काराची भावना तुम्हाला निराश करू शकते, क्रोधित करू शकते, पण त्याने तुम्ही बदलत नाही. तुम्ही तसेच राहता आणि त्याच दुष्टचक्रात पुन:पुन्हा फिरत राहता. मात्र त्याच गोष्टीला समजून घेण्यामुळे तुम्ही मुक्त होता, तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघता, तेव्हा तिच्यावर टीका करण्याची गरज नाही, त्याबद्दल काळजी करण्याचीही गरज नाही. गरज आहे त्या गोष्टीकडे खोल बघण्याची, ती समजून घेण्याची. मी काही तरी म्हणालो आणि तुम्ही दुखावला गेलात. – म्हणजे माझा हेतूच जर तो होता : तर तुम्ही दुखावले जायलाच हवं – पण  तुम्ही का दुखावला त्याकडे सगळ्या कोनांतून बघावं लागेल.. तुम्ही टीका कराल, तर तुम्हाला सगळ्या कोनांतून त्याकडे बघता येणार नाही. ती गोष्ट वाईट आहे हे तुम्ही आधीच ठरवून टाकलंय.

एखादी गोष्ट ऐका, तिच्यात शिरा, तिच्यावर विचार करा, एखादा दिवस जाऊ द्या. तुम्ही तिचं जेवढं निरीक्षण करू शकाल, तेवढे तिच्यातून बाहेर पडण्याची क्षमता तुमच्यात येईल. समजून घेण्याची क्षमता आणि त्यातून बाहेर पडण्याची क्षमता ही एकाच गोष्टीची दोन नावे आहेत.

मला एखाद्या विशिष्ट गोष्टीचं आकलन झालं, तर मी तिच्यातून बाहेर पडू शकेन, तिच्या पलीकडे जाऊ शकेन. मला एखादी गोष्ट समजलीच नाही, तर मी तिच्यातून बाहेर पडू शकणार नाही. तर हे मन प्रत्येकाशी हा खेळ खेळतं; केवळ तुमच्याशीच असं नाही. एकदम तुम्ही निष्कर्षांपर्यंत पोहोचता आणि म्हणता, ‘हे चुकीचं आहे, हे माझ्यात नको. मी लायकच नाही,  वगरे वगरे’ आणि मग तुम्ही स्वत:ला अपराधी समजू लागता. आता सगळी ऊर्जा वळते या अपराधी भावनेकडे आणि माझं काम आहे तुमच्यातून अपराधी भाव शक्य तेवढा काढून टाकण्याचं.

तेव्हा तुम्ही जे बघता, त्यातलं काहीच स्वत:ला लावून घेऊ नका. याचा तुमच्याशी काहीच संबंध नाही; हे केवळ मनाचे खेळ आहेत. तो मत्सर असेल, ती मालकीची भावना असेल, तो राग असेल, मन असंच काम करतं. प्रत्येकाचं मन हेच करतं. फरक फक्त कमी की जास्त एवढाच आहे.

मनाची आणखी एक यंत्रणा असते : तिला एक तर प्रशंसा करायची असते, नाही तर टीकेची झोड उठवायची असते. याच्या मधलं असं काहीच नसतं. प्रशंसेमुळे तुम्ही विशेष होता, तुमच्या अहंकाराचं समाधान होतं; टीकेमुळेही तुम्ही विशेष होताच. हीच युक्ती आहे : दोन्ही बाजूने तुम्ही विशेष होता! ती कोणी तरी खास व्यक्ती आहे; मग ती संत असेल तर महान संत आणि नाही तर भयंकर पापी, दोन्ही बाजूंनी अहंकार असतोच. कारण दोन्हीकडून तुम्ही एकच गोष्ट सांगता- तू विशेष आहेस. मनाला आपण सामान्य आहोत हे कधीच ऐकायचं नसतं. मत्सर, क्रोध, नातेसंबंधांतल्या समस्या आणि आपलं अस्तित्व. हे सगळं सामान्य आहे, प्रत्येक जण त्यात असतो. सगळी पापंही सामान्य असतात आणि सगळे गुणही सामान्यच असतात. पण अहंकाराला आपण कोणी तरी खास आहोत असं वाटायला हवं असतं. मग तो एक तर सांगतो की, तुम्ही खूपच महान आहात किंवा अगदीच वाईट आहात.

तेव्हा नुसतं बघा.. या सगळ्या सामान्य समस्या आहेत.  कोणत्या समस्या जाणवताहेत तुम्हाला? ‘माझं डोकं दुखत आहे’ – तुम्हाला वेदना होतात, कारण तुम्ही समजून घेत नाही आहात. तुम्ही त्याचा धिक्कार करत राहता; तुम्ही स्वत:लाच सांगता की, तू निराश राहायला नको, तू अशी नाहीच आहेस, हे तुझ्या प्रतिमेला शोभत नाही. – तुम्ही निराश का आहात हे समजून घेण्याऐवजी असं काही तरी सांगत राहता स्वत:ला. नराश्य म्हणजे तुमच्यात कसला तरी राग नकारात्मक स्थितीत दडून बसला आहे. नराश्य ही क्रोधाचीच नकारात्मक अवस्था आहे. नराश्यासाठी असलेला इंग्रजी शब्द खूप अर्थपूर्ण आहे- डिप्रेशन. काही तरी प्रेस्ड आहे, दाबून ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आत काही तरी दाबून ठेवताय आणि क्रोध खूप दाबून ठेवला की त्याचं दु:ख होतं. दु:ख हे रागाचंच नकारात्मक स्वरूप आहे. तुम्ही त्यावरचा दाब काढून टाकाल, तर तो राग म्हणून समोर येईल. तुम्हाला तुमच्या लहानपणापासून कशाचा तरी खूप राग येत असेल आणि तुम्ही तो व्यक्त केला नसेल, तर नराश्य येतं. ते समजून घेण्याचा प्रयत्न करा! आणि मग अडचण काय होते की, नराश्यावर काही उपाय नाही, कारण ती खरी समस्याच नाही. खरी समस्या आहे क्रोध- आणि तुम्ही धिक्कार करताय नराश्याचा. हे म्हणजे सावल्यांशी लढल्यासारखं झालं.

आधी शोधा, तुम्ही का निराश आहात ते.. आत खोलवर बघा आणि तुम्हाला राग सापडेल. तुमच्यात खूप राग आहे, कदाचित तुमच्या आई-वडिलांवरचा असेल, जगा वरचा असेल. स्वत:वरचा असेल, मुद्दा तो नाहीच आहे. तुम्ही आतून क्रोधित आहात आणि अगदी लहानपणापासून तुम्ही हसण्याचा प्रयत्न करत आला आहात, रागावण्याचा नाही. तुम्हाला ते शिकवलं गेलं आणि तुम्ही ते अंगी बाणवलं. त्यामुळे वरवर तुम्ही  हसत असता, पण ते हसू खोटं असतं. खोल कुठे तरी तुम्ही खूप मोठा उद्वेग धरून ठेवलाय. तुम्ही तो व्यक्त करू शकत नाही, आणि मग तुम्हाला निराश वाटतं.

हा राग वाहून जाऊ द्या, एकदा का हा क्रोध बाहेर आला की, तुमचं नराश्यही जाईल. तुम्ही कधीच हे निरीक्षण नाही केलं? कधी कधी खराखुरा राग येऊन गेल्यानंतर तुम्हाला खूप छान, ताजंतवानं वाटलं असेल. नाही? दररोज क्रोधाचं ध्यान करा. वीस मिनिटं पुरे झालं. तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला तो सारखा करावासा वाटेल. तुम्हाला खूप मोकळं वाटेल आणि लक्षात येईल की नराश्य नाहीसं होतंय. प्रथमच तुम्ही खरंखुरं हसाल. कारण नराश्य असताना तुम्ही हसूच शकत नाही, खोटं हसू खूप वेदना देतं.  तुम्ही किती दु:खी आहात याची आठवण करून देतं. पण आता तुम्हाला त्याची जाणीव झाली आहे, हे चांगलं आहे. जेव्हा जेव्हा काही तरी खुपतं, तेव्हा त्याची मदत होते. माणूस इतका आजारी आहे की मदत करणाऱ्या गोष्टीही त्याला खुपतात. कारण, त्यांचा स्पर्श कोणत्या ना कोणत्या जखमेलाच होतो, पण तहीही हे असं दुखणं चांगलच असतं.

‘दिस इज इट’ या पुस्तकातून ओशो टाइम्स इंटरनॅशनल, सौजन्य ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

 भाषांतर – सायली परांजपे