21 March 2019

News Flash

मृत्यू म्हणजे दरवाजा

आयुष्य म्हणजे शेवट नव्हे, ही तर केवळ मरण्याची कला शिकवणारी एक पद्धत आहे

 

सायली परांजपे

आयुष्य म्हणजे यंत्र नव्हे. आयुष्य म्हणजे जाणीव. घडय़ाळाला कोणतीही जाणीव नसते. त्याची टिक-टिक तुम्हाला ऐकू येते. घडय़ाळ स्वत: ती कधीच ऐकत नाही. तुम्ही तुमच्या स्वत:च्या हृदयाचे ठोके ऐकू शकता. इथे ऐकणारा कोण आहे? केवळ हे तुमच्या हृदयाचे ठोके म्हणजे आयुष्य असेल, तर मग ते ऐकणारा कोण आहे? जर आयुष्य म्हणजे केवळ श्वास असता, तर तुम्हाला तुमच्या श्वासांची जाणीव कशी झाली असती?

मृत्यूबद्दल काय म्हणता येईल? खरं तर तुम्ही मृत्यूबद्दल काही म्हणू कसं शकाल? मृत्यूचा अर्थ शब्दांत व्यक्त करणं तर शक्यच नाही. ‘मृत्यू’ या शब्दाचा अर्थ तरी काय? खरं तर याचा अर्थ काहीच नाही. तुम्ही मृत्यू हा शब्द वापरता तेव्हा तुम्हाला नेमकं काय म्हणायचं असतं? हे तर केवळ एक दार आहे, ज्या दाराच्या पलीकडे गेल्यावर काय होतं हे आपल्याला कोणालाच माहीत नाही. आपण माणसाला त्या दारातून नाहीसं होताना बघतो; आपण त्या दारापर्यंत बघू शकतो आणि मग तो माणूस नाहीसाच होतो. तुम्ही मृत्यू हा जो शब्द वापरता त्याचा अर्थ होतो केवळ हे दार; पण त्या दारापलीकडे खरोखर काय होतं? कारण, ते दार हा काही यातला मुद्दा नाही.

ते दार म्हणजे जे केवळ ओलांडून जायचं आहे असं काही तरी. मग आपण ज्या दारापलीकडचं काहीच बघू शकत नाही, ते दार ओलांडून जो नाहीसा झाला त्याचं नक्की काय झालं? आणि हे दार म्हणजे नेमकं काय? केवळ श्वासांचं थांबणं? श्वास थांबतो.. शरीराची अगदीच दूरवस्था होते.. तुम्ही म्हणजे केवळ श्वास आणि शरीरच असाल तर प्रश्नच मिटला. मग काहीच समस्या नाही. कारण, मग मृत्यू म्हणजे काहीच नाही. ते कशाचंही दार नाही. ते केवळ एक थांबणं आहे, नाहीसं होणं नव्हे.

ते एखाद्या घडय़ाळासारखं आहे. ते घडय़ाळ टिक-टिक करत असतं, वेळ दाखवण्याचं त्याचं काम करत असतं आणि मग एका क्षणी ते थांबतं; ही टिक-टिक कुठे गेली, असं काही तुम्ही विचारत नाही. असं विचारण्याला खरं तर काही अर्थही नाही! ती टिक-टिक कुठेही गेलेली नाही. ती केवळ थांबली आहे. ते एक यंत्र होतं आणि या यंत्रातलं काही तरी बिघडलं आहे- तुम्ही हे यंत्र दुरुस्त करू शकता, मग ती टिक-टिक पुन्हा सुरू होईल. मृत्यू म्हणजे केवळ घडय़ाळ बंद पडण्यासारखं आहे का? तेवढंच आहे का ते?

तसं असेल, तर मग त्याबाबत गूढ असं काहीच नाही, मग मृत्यू म्हणजे काहीच नाही; पण आयुष्य इतकं सहज नाहीसं कसं होऊ शकेल? आयुष्य म्हणजे यंत्र नव्हे. आयुष्य म्हणजे जाणीव. घडय़ाळाला कोणतीही जाणीव नसते. त्याची टिक-टिक तुम्हाला ऐकू येते. घडय़ाळ स्वत: ती कधीच ऐकत नाही. तुम्ही तुमच्या स्वत:च्या हृदयाचे ठोके ऐकू शकता. इथे ऐकणारा कोण आहे? केवळ हे तुमच्या हृदयाचे ठोके म्हणजे आयुष्य असेल, तर मग ते ऐकणारा कोण आहे? जर आयुष्य म्हणजे केवळ श्वास असते, तर तुम्हाला तुमच्या श्वासांची जाणीव कशी झाली असती? म्हणूनच पौर्वात्य जगातली ध्यानाची सगळी तंत्रं श्वासाच्या जाणिवेच्या सूक्ष्म तंत्राचा वापर करतात.. कारण तुम्हाला श्वासाची जाणीव झाली, तर मग ही जाणीव म्हणजे नक्की कोण? ही जाणीव म्हणजे श्वासाच्या पलीकडचं असं काही तरी आहे, कारण तुम्ही या श्वासाकडे बघू शकता आणि बघणारा कर्ता असतो. तुम्ही या श्वासाचे साक्षीदार असता; तुम्ही डोळे बंद करू शकता आणि आत जाणारा तसंच बाहेर येणारा श्वास बघू शकता. हा बघणारा कोण आहे? हा साक्षीदार कोण आहे? ही काही तरी स्वतंत्र शक्ती आहे. ही शक्ती श्वासांवर अवलंबून नाही. श्वास बंद होणं घडय़ाळ बंद होण्यासारखं असेल, पण मग ही जाणीव कुठे जाते? ही जाणीव कुठे मार्गक्रमण करते?

मृत्यू हा एक दरवाजा आहे, ते थांबणं नव्हे. जाणीव पुढे जाते, पण तुमचं शरीर त्या दारातच राहतं. तुम्ही इथे आला आहात, पण तुमची पादत्राणं दारात काढून ठेवली आहेत तसंच काहीसं. तुमचं शरीर मंदिराबाहेर राहतं आणि तुमच्यातली जाणीव मंदिरात प्रवेश करते. हे सर्वात सूक्ष्म असं इंद्रियगोचर आहे, याच्यापुढे आयुष्य काहीच नाही. मुळात आयुष्य म्हणजे केवळ मृत्यूची तयारी करणं आहे, आयुष्यात मरावं कसं हे शिकतात तेच शहाणे. तुम्हाला मरावं कसं हे कळलं नाही, तर तुम्ही आयुष्याचा संपूर्ण अर्थच गमावून बसला आहात. ही एक तयारी आहे, हे प्रशिक्षण आहे, ही एक पद्धती आहे.

आयुष्य म्हणजे शेवट नव्हे, ही तर केवळ मरण्याची कला शिकवणारी एक पद्धत आहे; पण तुम्ही घाबरता, तुम्ही भयभीत होता, मृत्यू हा शब्द नुसता ऐकला तरी थरथर कापू लागता. याचा अर्थ तुम्हाला अजून आयुष्याचा अर्थच मुळी कळलेला नाही. कारण आयुष्य कधीच मरत नाही. आयुष्य मरूच शकत नाही.

तुम्ही कुठे तरी शरीराशी तादात्म्य पावलेले असता, तुमच्या शरीराच्या यंत्रणेशी तादात्म्य पावलेले असता. ही यंत्रणा कधी ना कधी मरणारच आहे. यंत्रणा अमर असू शकत नाही. कारण यंत्रणा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते; हे विविध अटींवर आधारित असं काही तरी आहे. जाणीव मात्र कोणत्याही अटींवर अवलंबून नसते. ती आकाशात मेघासारखी विहरू शकते. तिला मुळं नसतात, तिला कारणं नसतात, ती कधी जन्मच घेत नाही, त्यामुळे ती कधी मरूही शकत नाही.

जेव्हा कोणाचा मृत्यू होतो, तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ ध्यानमग्न असलं पाहिजे. कारण मंदिर तुमच्या समीप आहे आणि ते स्थळ खूप पवित्र आहे. अशा प्रसंगी बालिशपणा करू नका, कुतूहल दाखवू नका, शांत राहा म्हणजे तुम्ही लक्ष ठेवू शकाल आणि बघू शकाल. काही तरी खूप अर्थपूर्ण असं घडतंय. हा क्षण चुकवू नका.

द फ्लॉवर्स शॉवर्ड टॉक#

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल

First Published on May 26, 2018 7:13 am

Web Title: osho philosophy part 18