20 September 2018

News Flash

योग्य निद्रा

मानवी नागरीकरणाच्या विकासात सर्वाधिक नुकसान जर कोणत्या गोष्टीचं झालं असेल तर ते निद्रेचं.

मानवी नागरीकरणाच्या विकासात सर्वाधिक नुकसान जर कोणत्या गोष्टीचं झालं असेल तर ते निद्रेचं. ज्या दिवशी माणसाला कृत्रिम प्रकाशाचा शोध लागला, त्या रात्रीपासून त्याची झोप कायमची चाळवली गेली आणि त्याच्या हातात जसजशी अधिकाधिक उपकरणं पडू लागली, तसतशी त्याला झोप ही गोष्टच अनावश्यक वाटू लागली, किती वेळ वाया जातो झोपेत, असं त्याला वाटू लागलं. खरं तर आयुष्याच्या अधिक सखोल अशा प्रक्रियांमध्ये निद्रा काही योगदान देऊ शकते हे लोकांना कळतच नाही. त्यांना वाटतं की झोपणं म्हणजे वेळ वाया घालवणं, त्यामुळे झोप जेवढी कमी तेवढं चांगलं; जेवढा लवकर ते झोपेचा अवधी कमी करू शकतील, तेवढं अधिक चांगलं. माणसाच्या आयुष्यात शिरलेल्या सर्व आजारांचं, विकारांचं मूळ अपुऱ्या झोपेत आहे हे आपल्या लक्षातही आलेलं नाही. जो मनुष्य योग्य पद्धतीने झोपू शकत नाही, तो योग्य पद्धतीने जगू शकत नाही. झोपणं म्हणजे वेळ वाया घालवणं नव्हे. झोपेतले आठ तास कधीच वाया जात नाहीत; किंबहुना त्याच आठ तासांमुळे तुम्ही उरलेले सोळा तास जागे राहू शकता. ही झोप झाली नाही तर तुम्ही उरलेला वेळ जागे राहूच शकणार नाही.

HOT DEALS
  • Moto Z2 Play 64 GB Fine Gold
    ₹ 15750 MRP ₹ 29499 -47%
  • Apple iPhone 6 32 GB Space Grey
    ₹ 25799 MRP ₹ 30700 -16%
    ₹3750 Cashback

या आठ तासांत आयुष्यासाठी आवश्यक ती ऊर्जा साठवली जाते, तुमच्या आयुष्यात नव्याने चैतन्य निर्माण होतं, तुमच्या मेंदूचं आणि हृदयाचं केंद्र शांत होतं. तुमच्या आयुष्याचं कार्य नाभीतून सुरू राहतं. या आठ तासांच्या निद्रिस्त अवस्थेत तुम्ही पुन्हा निसर्गाशी आणि अस्तित्वाशी एकरूप होता. म्हणूनच तुमच्यात नवीन चैतन्य निर्माण होतं.

माणसाच्या आयुष्यात झोप पूर्वीसारखी परत येण्याची गरज आहे. खरोखर, याला काहीही पर्याय नाही, कोणताही उपाय नाही. मानवतेच्या मानसशास्त्रीय आरोग्यासाठी पुढची शंभर किंवा दोनशे र्वष कायद्याने झोप सक्तीची केली पाहिजे. ध्यान करणाऱ्याने तो व्यवस्थित आणि शांत झोप घेतोय याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे- योग्य झोप ही प्रत्येकासाठी वेगळी असेल. ती सर्वासाठी सारखी नसेल, कारण प्रत्येकाच्या शारीरिक गरजा वेगवेगळ्या असतात. त्या वयानुसार आणि अन्य अनेक घटकांनुसार बदलतात.

कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण एका संशोधनातून असं निष्पन्न झालं आहे की, प्रत्येकासाठी झोपेतून जागं होण्याची एक वेळ असू शकत नाही. सकाळी पाच वाजता उठणं प्रत्येकासाठी चांगलं, असं नेहमी म्हटलं जातं. ते पूर्णपणे चूक आणि अशास्त्रीय आहे. हे सर्वासाठी चांगलं अजिबात नाही; ते काही जणांसाठी चांगलं असू शकतं, पण काही जणांसाठी नुकसानकारकही असू शकतं. दिवसाच्या चोवीस तासांपैकी सुमारे तीन तास कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचं तापमान कमी होतं आणि हेच तीन तास गाढ झोपेचे तास असतात. या तीन तासांत त्या व्यक्तीला जर झोपेतून जागं केलं, तर तिचा संपूर्ण दिवस बिघडून जाईल आणि सगळी ऊर्जा विचलित होईल.

सामान्यपणे हे तीन तास म्हणजे पहाटेची दोन ते पाच ही वेळ असते. बहुतेक जणांसाठी हे तीन तास गाढ झोपेचे असतात, पण हे प्रत्येकाला लागू होत नाही. काही लोकांच्या शरीराचं तापमान सकाळी सहापर्यंत कमी असतं, काही जणांच्या शरीराचं तापमान सकाळी सातपर्यंत कमी असतं. काही जणांमध्ये पहाटे चार वाजताच तापमान सामान्य होऊन जातं. शरीराचं तापमान कमी असताना जे कोण झोपेतून जागं होतं, त्याच्या दिवसाचे सगळे २४ तास बिघडतात. याचे शरीरावर घातक परिणामही होतात. व्यक्तीच्या शरीराचं तापमान जेव्हा सामान्य पातळीला येऊ लागतं, तीच तिची झोपेतून जागं होण्याची योग्य वेळ.

सहसा प्रत्येकाने सूर्योदयासोबत उठणं योग्य आहे, कारण सूर्य उगवल्यानंतर प्रत्येकाच्या शरीराचं तापमानही वाढू लागतं. पण हा काही नियम नव्हे, याला अपवाद असतातच. काही लोकांसाठी सूर्योदयानंतरही झोपणं गरजेचं असू शकतं, कारण प्रत्येकाच्या शरीराचं तापमान वेगवेगळ्या वेळेला वाढतं, वेगवेगळ्या वेगाने वाढतं. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने तिला किती तासांची झोप आवश्यक आहे आणि कोणत्या वेळेला झोपेतून जागं होणं तिच्यासाठी निरोगी आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि तो त्या व्यक्तीपुरता नियम झाला.. मग तुमचे धर्मग्रंथ काहीही सांगोत, गुरू काहीही सांगोत. योग्य निद्रेसाठी तुम्ही जेवढं गाढ आणि दीर्घकाळ झोपू शकाल, तेवढं चांगलं. पण मी तुम्हाला झोपायला सांगतोय, नुसतं बिछान्यावर पडायला नाही! बिछान्यावर पडून राहणं म्हणजे झोप नव्हे!

कोणत्या वेळी झोपेतून उठणं आपल्यासाठी निरोगी आहे हे एकदा शोधून काढलं की, त्या वेळी उठणं हा तुमच्यासाठी नियम झाला पाहिजे. सामान्यपणे सूर्योदयासोबत जागं होणं नैसर्गिक आहे, पण तुमच्याबाबतीत तसं असेलच असं नाही. यामुळे घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. याचा आध्यात्मिक असण्याशी किंवा नसण्याशी काहीही संबंध नाही. मात्र योग्य झोपेचा अध्यात्माशी नक्कीच संबंध आहे.

तेव्हा प्रत्येक व्यक्तीने स्वत:साठी झोपेचं सर्वोत्तम वेळापत्रक तयार करावं. तीन महिने प्रत्येकाने आपल्या कामासोबत, झोपेसोबत, आहारासोबत प्रयोग करावेत आणि आपल्यासाठी सर्वात निरोगी, सर्वात शांत, सर्वात वरदायी नियम कोणते हे निश्चित करावं.

आणि प्रत्येकाने स्वत:चे नियम स्वत: तयार करावेत. दोन व्यक्ती सारख्या नसतात, त्यामुळे एकच नियम दोघांना लागू ठरत नाहीत. एक सामान्य नियम सर्वाना लावण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा कोणी करतं, तेव्हा त्याचे परिणाम वाईटच होतात. प्रत्येक जण स्वतंत्र व्यक्ती आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि अन्य कोणाशी तुलना होऊ शकत नाही अशी आहे. संपूर्ण पृथ्वीवर एकीसारखी दुसरी व्यक्ती नाही. तेव्हा व्यक्ती स्वत:च्या जीवनप्रक्रियांसाठी नियम स्वत: तयार करत नाही, तोपर्यंत तिला कोणताही नियम लागू केला जाऊ शकत नाही.

पहाटेची दोन ते पाच ही वेळ  बहुतेक जणांसाठी गाढ झोपेची असते, पण हे प्रत्येकाला लागू होत नाही. काही लोकांच्या शरीराचं तापमान सकाळी सहापर्यंत कमी असतं, काही जणांच्या शरीराचं तापमान सकाळी सातपर्यंत कमी असतं. काही जणांमध्ये पहाटे चार वाजताच तापमान सामान्य होऊन जातं. शरीराचं तापमान कमी असताना जे कोण झोपेतून जागं होतं, त्याच्या दिवसाचे सगळे २४ तास बिघडतात. याचे शरीरावर घातक परिणामही होतात. व्यक्तीच्या शरीराचं तापमान जेव्हा सामान्य पातळीला येऊ लागतं, तीच तिची झोपेतून जागं होण्याची योग्य वेळ.

ओशो, द इनर जर्नी, टॉक #३

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

First Published on September 1, 2018 12:09 am

Web Title: osho philosophy part 25