आयुष्याच्या संदर्भात ‘अर्थ’ हा शब्दच मुळी गरलागू आहे. आयुष्य ना अर्थपूर्ण असतं, ना अर्थहीन. मात्र, आयुष्याला ‘महान अर्थ आहे’ यावर विश्वास ठेवायला शतकानुशतकं माणसाच्या मनाला भाग पाडण्यात आलं आहे. हा सगळा अर्थ म्हणजे हुकूमशाहीच होती. म्हणूनच मानवाच्या इतिहासात  या शतकात, प्रथमच माणसाला प्रश्न पडला, ‘आयुष्याचा अर्थ काय?’

हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा होऊन गेला. कारण, सगळ्या जुन्या भूलथापा त्यामुळे उघडय़ा पडल्या. आयुष्य अर्थपूर्ण होतं परमेश्वरामुळे. आयुष्य अर्थपूर्ण होतं ते मृत्यू नंतरच्या जीवनामुळे. आयुष्य अर्थपूर्ण होतं, कारण चच्रेस, मंदिरं, मशिदी अशा सारख्या कल्पना सतत माणसाच्या मनावर बिंबवत होते. मग मानवाच्या मनाला एक प्रकारची परिपक्वता आली. सगळ्यांना नव्हे, पण एका समूहाला आली.

मी इथे तुम्हाला पाच महत्त्वाची नावं सांगणार आहे. पहिलं आहे सोरेन कीर्कगार्ड. हा प्रश्न विचारणारा तो पहिला होता. त्याची जगभर निर्भर्त्सना झाली. कारण नुसता हा प्रश्न विचारणंदेखील लोकांच्या मनात शंका निर्माण करण्यासाठी पुरेसं होतं. आयुष्याचा अर्थ काय, असं विचारण्याची हिंमतही त्यापूर्वी कोणी दाखवली नव्हती. देवाचं, मृत्युपश्चात जीवनाचं, आत्म्याचं अस्तित्व नाकारणाऱ्या नास्तिकांनीदेखील आयुष्याचा अर्थ काय, हा प्रश्न कधी विचारला नव्हता. ते म्हणायचे, खा, प्या आणि मजा करा- हाच आहे आयुष्याचा अर्थ.

पण सोरेन कीर्कगार्ड मात्र या प्रश्नाच्या तळाशी गेला. त्याने नकळत एक चळवळ सुरू केली, अस्तित्ववादाची चळवळ. मग आणखी चार नावं आली: मार्टनि हायडेगर, कार्ल जेस्पर्स, गॅब्रिएल मास्रेल आणि अखेरचं पण कदाचित सर्वात महत्त्वाचं- जाँ-पॉल सात्र्. या पाच जणांनी अवघ्या बुद्धिजीवी जगावर घाव घातला- ‘आयुष्याला काहीही अर्थ नाही.’

आता थोडीफार बुद्धी असलेल्या माणसालाही हा प्रश्न पडू लागला आहे आणि उत्तर शोधण्यासाठीही त्याला धडपड करावी लागते.  मी या पाच महान तत्त्ववेत्त्यांशी सहमत नाही पण त्यांच्याबद्दल मला आदर आहे. ते खूप धर्यवान होते. एकदा का तुम्ही आयुष्याला अर्थच नाही असं म्हटलं की, धर्म नाहीसा होतो. आतापर्यंत धर्म तुमच्या आयुष्याला अर्थ देण्याचा प्रयत्न होता. ते भरून टाकण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून तुम्हाला रिकामं वाटू नये; तुमच्याभोवती देव आणि देवदूतांचं कोंडाळं तयार करण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून तुम्हाला एकटं वाटू नये. पण लोक तरी अशा गोष्टींवर विश्वास का ठेवतात? त्यामागेही कारण आहे. ते कारण म्हणजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्याला अर्थ देतात. आकाशात देव आहे म्हणून तुम्हाला सुरक्षित वाटतं. देवच नसेल, तर आकाश रिकामं होऊन जाईल आणि तुम्ही एकटे पडाल. तुम्ही किती सूक्ष्म आहात आणि हा रिकामेपणा किती व्यापक. भीती तर वाटेलच तुम्हाला- नुसता या आकाशाच्या रिकामेपणाचा विचार केलात तरी वाटेल. आकाश अमर्याद आहे, कारण त्याला सीमा नाही. धार्मिक लोकांनी मानवाच्या आयुष्याला दिलेला अर्थ त्यांच्या मनाला वाटेल तोच होता. या तत्त्ववेत्त्यांनी धार्मिक मंडळींनी सांगितलेल्या अर्थातली हुकूमशाही सर्वासमोर आणली. अर्थात तरी याचा अर्थ आयुष्य अर्थहीन आहे असा होत नाही. याचा अर्थ एवढाच की, आयुष्याला देण्यात आलेला अर्थ निरुपयोगी आहे: देव म्हणजे काही आयुष्याचा अर्थ नाही. मृत्यूनंतरचं जीवन हाही अर्थ नाही. पण तरीही आयुष्याला अर्थ नाही, असा याचा अर्थ होत नाही. केवळ तुम्ही ज्या गोष्टीला आयुष्याचा अर्थ समजत होतात, तीच कोसळून पडली म्हणून तुम्ही आयुष्याला अर्थच नाही हे दुसरं टोक उचलण्यासारखं आहे हे.

तुम्ही माझी भूमिका लक्षात घ्या.

मी अस्तित्ववादी आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय की, आयुष्य अर्थपूर्णही नाही आणि अर्थहीनही नाही. हा प्रश्नच गरलागू आहे.

आयुष्य ही केवळ एक संधी आहे, एक उघडलेलं दार आहे. तुम्ही त्याचं काय करता यावर ते अवलंबून आहे. तुम्ही आयुष्याला कोणता अर्थ, कोणता रंग, कोणतं गाणं, कोणतं काव्य, कोणतं नृत्य द्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे.

आयुष्य हे सृजनासमोरचं आव्हान आहे.

आणि आयुष्याला निश्चित असा अर्थ नाही हे चांगलंच आहे. तो तसा असता, तर काहीच आव्हान उरलं नसतं. ते एखाद्या रेडी-मेड गोष्टीसारखं होऊन गेलं असतं. तुम्ही जन्मलात आणि तुमच्या आयुष्याला एक अर्थ देण्यात आला, हा अर्थ आता तुम्हाला जन्मभर वागवायचा आहे. नाही, अस्तित्व हे कोणत्याही अर्थापेक्षा अधिक गहन आहे.

अस्तित्व हे सृजनापुढचं आव्हान आहे.

तुम्हाला आवश्यक असलेला संपूर्ण अवकाश ते तुम्हाला देतं आणि तुम्हाला वाटतं ते रिकामं आहे? फक्त योग्य शब्द वापरण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक शब्दाला एक संदर्भ असतो. ‘रिकामा’ हा शब्द दु:खी आहे; त्यात काहीतरी हरवल्याची भावना आहे, जे असायला हवं होते, ते काहीतरी नाहीये असं वाटायला लावतो हा शब्द. पण रिकामा हा शब्द वापरताच कशाला? आणि त्याही पूर्वी कुणीतरी तुमच्यासाठी वाट बघत असेल अशी अपेक्षा तरी कशाला करता? तुम्ही असे कोण आहात? आपण एक योग्य नाव शोधू.

वस्तूंना त्यांच्या अचूक नावांनी ओळखणं, अचूक शब्द वापरणं, योग्य ते हावभाव करणं ही जगण्याची प्राथमिक कला आहे. कारण शब्द किंचित जरी चुकला, तरी तो चुकीचे संदर्भ आणतो. आता, ‘रिकामा’.. या शब्दाचा ध्वनी तुमच्या मनात निष्फळतेची भावना आणतो. नाही, मी त्याला वेगळा अर्थ देतो- रिकामेपणा म्हणजे प्रशस्तता, कोणताच अडथळा नाही असं काहीतरी.

अस्तित्व इतकं प्रशस्त, ऐसपस आहे की, ते तुम्हाला हवं ते होण्याचं स्वातंत्र्य देतं, तुमची जे काही होण्याची क्षमता असेल ते होण्याची मुभा देतं. ते तुम्हाला कोणताही अडथळा नसलेला अवकाश देतं वाढण्यासाठी आणि फुलण्यासाठी. ते तुमच्यावर काहीच लादत नाही.

भाषांतर – सायली परांजपे

(‘फ्रॉम पर्सनॅलिटी टू इंडिव्हिज्युअ‍ॅलिटी’ या ओशो टाइम्स इंटरनॅशनलमधील लेखाचा अंश/ सौजन्य- ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन/www.osho.com)