लोकरंगमधील (२९ मे) लेखक राजन खान यांचा ‘वास्तव मराठी साहित्याचं!’ हा लेख त्यातील सर्व मुद्दे अचूक असूनही बेंचमाìकगच्या परिमाणात न बसणारा, त्यामुळे त्याची यथाबुद्धी चिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते. दुसरे असे की संपूर्ण लेखात राजन खान वास्तवाची कारणमीमांसा करत नाहीत, हे थोडेसे खटकणारे निश्चितच आहे. तिसरी बाब म्हणजे ती तळटीप लेखक राजन खान यांच्या येऊ घातलेल्या कादंबरीची जाहिरात तर नव्हे ना! तसे असेल तरी उत्तम. राजन खान यांच्या संकल्पित अशा अनेक अपुऱ्या प्रकल्पात ही येऊ घातलेली कादंबरी मात्र त्यांनी इतर व्यवधाने बाजूला ठेवून लवकर पूर्ण करावी ही आशा. वर उल्लेख केलेला शब्द ‘बेंचमाìकग’ ही अभियांत्रिकीतील एक प्रक्रिया. त्याचे मराठी भाषांतर ‘सम्यक तौलनिक अभ्यास’ असे करता येऊ शकेल. जेव्हा एकापेक्षा अनेक वस्तू, परिस्थिती, सेवाप्रक्रिया यांचा तौलनिक अभ्यास केला जातो, तेव्हा तुलना करावयाच्या सर्व वस्तू, परिस्थिती, सेवाप्रक्रिया यांना एकाच पातळी (प्लॅटफॉर्म)वर अधिष्ठित करून वेगवेगळे परिमाण नि परिमाणांच्या चाचणीचे परिणाम यांचे निरीक्षण, अभ्यास यातून गणिती पद्धतीने काढलेले निष्कर्ष म्हणजेच ‘बेंचमाìकग’ तथा ‘सम्यक तौलनिक अभ्यास.’ मराठी साहित्याचं वास्तव जोखताना लेखक राजन खान यांच्याकडून मुळात हीच बाब विसरली गेली की काय, हा प्रश्न पडतो.
येथे प्रसिद्धीचा नि व्यावसायिक यशाचा उच्चांक मोडणाऱ्या चित्रपटाच्या विषयाची तुलना होतेय ती थेट मराठी साहित्यातील वास्तवाशी. परंतु राजन खान यांनी मराठी साहित्यात ज्यांचा अभाव दिसतो असा आक्षेप घेतलेल्या प्रसंगनिष्ठ घटना नि बदलत जाणारी जीवनशैली याचा ऊहापोह मराठी छापील साहित्य सोडून इतर बाकी सर्व माध्यमांतून प्रकट झालेला आहेच की. मुळात ‘सराट’निमित्ताने जी काही वैचारिक देवाणघेवाण (अभिसरण) सोशल पोर्टल माध्यमांमध्ये होत आहे त्याला अनुषंगून राजन खान यांचा मराठी साहित्यातील त्रुटींचा लेख अतिशय अप्रस्तुत तर आहेच, पण त्यात मांडलेले मुद्दे कितीही योग्य असले तरी त्याची मूळ कारणमीमांसा (रूट कॉज अ‍ॅनॅलिसिस) केलेली नाही नि दुखण्यावर इलाजदेखील सुचवलेला नाही.
मुळात पुस्तक छापले जाणे, ते प्रकाशित होणे हे अजूनही दिव्यच ठरावे अशी परिस्थिती असताना आणि ती राजन खान यांना पुरती ठाऊक असूनही त्यांनी त्यावर लिहिणे टाळले तर नाही ना, अशीदेखील शंका येते. याशिवाय एकीकडे वृत्तपत्र, मासिके यांच्याकडे जागेच्या उपलब्धीच्या मर्यादा, तर दुसरीकडे इंटरनेट माध्यमातील अमर्याद उपलब्धी यांचाही छापील साहित्यावर परिणाम होणे साहजिकच आहे. त्यामुळे एकंदर भविष्याकडे पाहता आजची प्रकाशनगृहे आणखी किती दिवस तग धरणार हे सांगणे तसे कठीणच होऊन बसले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्रकाशनगृहे ज्यांच्या जिवावर उभी आहेत त्या लेखक मंडळींच्या आíथक बाबींचा प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचा आहे. लेखक नि त्याच्या लेखनसीमा विस्तारण्यासाठी प्रोत्साहनमूल्यदेखील आवश्यक असते. असे कितीसे प्रस्तापित लेखक नवीन लेखकांना प्रोत्साहन देतात, त्यांचे मूल्यमापन करून त्यांना मार्गदर्शन करतात, उमेद देतात, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारता येईल. आणखी एक मुद्दा मांडणे गरजेचे आहे तो म्हणजे- मराठीत लेखन करताना पेनाची कास सोडून संगणकाचा कळफलक हाती घेणे यापुढे लेखकास आवश्यक असेल. यातला मुद्दा हाच, की लेखकाने या तंत्रावर स्वार होणे आता गरजेचे झाले आहे. अन्यथा प्रकाशन व्यापारातील आडत्यांची मक्तेदारी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही घुसखोरी करू शकते.
राजन खान यांनी त्यांच्या लेखात विशद केलेल्या अनेक समस्यांवर पिचून गेलेल्या वाचकाची आजची गरज आहे ती वैचारिक साक्षरतेची. आणि त्याचा एकमेव स्रोत म्हणजे मराठी साहित्यविश्व. हे मराठी साहित्यविश्व केवळ छापील माध्यमापुरते मर्यादित न ठेवता इंटरनेटच्या माध्यमातून त्याच्या चलनवलनाचा वेग वाढविता आल्यास राजन खान यांना अभिप्रेत बदल एकंदर मराठी साहित्यविश्वाला उंचावर नेवून ठेवतील यात शंका नाही.
– देवेंद्र रमेश राक्षे, पुणे

तुकारामगाथेतही ‘सैराट’
‘लोकरंग’(५ जून) च्या अंकातील ‘रामदास विनवी’ सदरातील समर्थ साधक यांचा ‘मना कल्पना धीट सैराट धावे’ हा लेख आवडला. रा. ग. जाधवांच्या निवर्तनाने जी साहित्यिक पोकळी निर्माण झाली आहे, ती भरणे अवघड आहे. त्यांना श्रद्धांजली वाहताना ‘लोकसत्ता’च्या संपादकांनी ‘सैराट’ हा शब्द जाधव यांनी प्रथम वापरला असे लिहिले होते, परंतु ते बरोबर नसल्याचे समर्थ साधक यांनी उदाहरणाने सिद्ध केले आहे. परंतु समर्थाचे समकालीन संत तुकाराम यांनीदेखील आपल्या अभंगात ‘सैराट’ हा शब्द वापरला आहे. तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त प्रकाशित ‘श्री संत तुकाराम महाराजांची गाथा’ (प्रकाशन – ११ ऑक्टोबर १९९८) या ग्रंथातील अभंग क्र. ३९१९ असा आहे. – ‘पांगुळ झालों देवा नाही हात ना पाय, बैसलों जयावरी सैराट तें जाय, खेटिता कंप काढी सुंट दरडी न पाहे, आधार नाहीं मज कोणी बाप ना माय..दुरोनी आलों मी गा दु:ख झालें दारुण, यावरा येथवरी होतें हेंचि कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झालें दरुषण, विनवितो तुका संतां दोन्ही कर जोडून.’ ‘सैराट’च्या निमित्ताने चालू झालेले विचारमंथन स्वागतार्ह आहे.
– गोविंद अ. टेकाळे, ठाणे

प्रश्न पाटलाचा नाही, प्रवृत्तीचा आहे!
‘बहुजनांचा बॉबी’ ( २९ मे ) हा शफाअत खान यांचा लेख वाचला. त्यात ते म्हणतात की महाराष्ट्राला नाच नाही. मात्र हे पूर्णपणे खरे नाही. कारण आदिवासी व कोळीनृत्य देशभर तसेच परदेशातही गाजत आहेत. ‘सराट’ने आजच्या बिनधास्त, बेधडक, भन्नाट तरुणाईच्या नाडीवर अचूक बोट ठेवले आहे. त्यांच्या दबलेल्या भावनांना वाट करून दिली आहे. मोठय़ांचे जग त्यांना पसंत नाही. १९६० मध्ये युरोपमध्ये विद्रोहाची लाट आली होती. त्याचा आविष्कार निराळ्या प्रकारे झाला होता. ‘सराट’ हाही विद्रोहाचा एक प्रकार आहे. ‘सराट’ म्हणजे जातीच्या विषाने दोन जिवांचे घेतलेले बळी आहेत. एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक सरत आहे तरी जात काही जायला तयार नाही. यावर ‘किती काळ तुम्ही पाटलाला खलनायक म्हणून रंगवणार आहात?’, अशी प्रतिक्रियाही उमटत आहे. मात्र हा प्रश्न पाटलाचा नाही, तर प्रवृत्तीचा आहे. महाराष्ट्रात तीन हजार जाती आहेत. त्याहून जास्त उपजाती आहेत. त्यांच्यातही एकमेकांबद्दल विखार आहे. तत्त्वत: जाती न मानणाऱ्या ख्रिस्ती व मुस्लीम समाजातही लग्नाचा प्रश्न निघाला की कधी कधी जुनी जात विद्रुप डोके वर काढते.
– फादर फ्रान्सिस दिब्रिटो, वसई