16 December 2017

News Flash

या मखलाशीचे कौतुक कुणाला?

सामान्यपणे निदान जयंतीच्या दिवशी तरी त्या त्या व्यक्तीबद्दल बरेचांगले बोलण्याची आपल्याकडे पद्धत आहे.

लोकसत्ता टीम | Updated: October 8, 2017 2:32 AM

सामान्यपणे निदान जयंतीच्या दिवशी तरी त्या त्या व्यक्तीबद्दल बरेचांगले बोलण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तसे मधु देवळेकर गांधीजींबद्दल बरेचांगलेच बोलले आहेत; परंतु लेखाचा उद्देश गांधीजींबद्दल बरेचांगले बोलण्याचा नसून तो लेख म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पावन करून घेण्याचा एक अत्यंत हास्यास्पद व केविलवाणा प्रयत्न आहे, असेच म्हणावे लागते. खरे तर रा. स्व. संघ ही ज्यांची मातृसंस्था, त्या भारतीय जनता पक्षाची ‘एकछत्री’ सत्ता देशावर असतानाही, ज्यांच्या द्वेषावर त्यांचे राजकारण चालले त्याच म. गांधींचा दाखला त्यांना प्रत्येक वेळी का द्यावा लागावा, हे एक कोडेच आहे. हे १९७४ साली गांधीजींना ‘प्रात:स्मरणीय’ मानून संघाच्या प्रार्थनेत त्यांचा समावेश करण्यापासून तर आज मोदींनी देशविदेशात गांधीजींचाच वारसा सांगण्यापर्यंत सर्वत्र घडत आहे. तेव्हा हा लेख हा त्यांच्या राजकीय गरजेचा भाग असू शकतो. मात्र सध्याच्या हिंसेच्या, असहिष्णुतेच्या, एकारलेपणाच्या काळात गांधीजींची समयोचितता अिहसा, सहिष्णुता, समावेशकता या अंगाने अधिक आहे. गांधीजयंतीच्या निमित्ताने तशा स्वरूपाच्या गंभीर, विचारप्रवर्तक लेखाची अपेक्षा होती.

या लेखात गांधीजी संघाच्या कार्यामुळे आणि कार्यपद्धतीमुळे कसे प्रभावित झाले हे अत्यंत खुबीने लिहिले आहे. या सर्वाला पुरावा काहीच नाही. बरे, गांधीजींच्या तोंडी टाकलेली वाक्येही गांधीवादी मंडळीदेखील नाकारू शकणार नाहीतच. अशी ही सगळी खेळी आहे. संघाच्या विचारसरणीवर, इतिहास-वर्तमानावर कोणी काही लिहायला कुणाचा काही आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र हा लेख सत्याचा अपलाप करणारा आहे, म्हणूनच काही तथ्ये समोर आणणे आवश्यक आहे.

१) रा. स्व. संघाच्या २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तिकेत (रा. स्व. संघाची काशी प्रांत शाखा पुस्तिका क्र. २, सप्टेंबर-ऑक्टोबर २००३, पृ. ९) लिहिले आहे की, ‘देशाची फाळणी रोखू न शकल्यामुळे आणि फाळणीच्या परिणामस्वरूप लाखो हिंदूंची पंजाब व बंगालमध्ये हत्या व करोडोंच्या संख्येने आपल्या पूर्वजांच्या भूमीतून निर्वासित होणे, तसेच पाकिस्तानला नुकसानभरपाईपोटी कोटय़वधी रुपये देण्याच्या आग्रहामुळे हिंदू समाजामध्ये त्यांची (गांधी) प्रतिष्ठा खालावली.’ ५५ कोटींचा मुद्दा हा गांधीजींचा ‘वध’ करण्याचे कारण असल्याचा अपप्रचार तर संघपरिवाराने नेहमीच केलेला आहे.

फाळणीला गांधीजींची मान्यता नव्हती व ती टाळण्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले हा इतिहास सर्वश्रुत आहे. देश जेव्हा स्वातंत्र्यदिन साजरा करत होता तेव्हा गांधीजी एकाकीपणे कलकत्ता-नौखालीत दंगली शमवत, हिंदू-मुस्लिमांचे अश्रु पुसत होते, आपला प्राण पणाला लावत होते. हा इतिहास सोयीस्करपणे विसरायला लावून गांधीजींना फाळणीचे गुन्हेगार ठरवण्याचे काम संघपरिवाराने कायमच केलेले आहे. तो संघपरिवार, ज्याचा स्वातंत्र्यलढय़ात तर सहभाग नव्हताच, उलट ब्रिटिशांना साथ देण्यापासून तर द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताच्या आधारे फाळणीसंदर्भात जिनांसारखीच भूमिका घेत होता.

२) देवळेकरांनी लिहिले आहे त्यामध्येही, एका साध्या उत्सुकतावश दिलेल्या भेटीच्या प्रसंगीही गांधीजींना संघशिबिरातले काय भावले (संघशिबिरातील संख्या, शिस्त, स्वयंसेवकांची वृत्ती, स्वच्छता, बँड); त्यांचे प्रश्न काय होते (कार्यपद्धती, जातिभेद मानला जातो किंवा कसे, अस्पृश्यता निवारणासाठी काय करता, केवळ हिंदूंचेच संघटन का, इत्यादी); त्यांची हिंदू संघटनांबद्दल भूमिका काय होती (‘हे काम केवळ हिंदूंपुरतेच आहे. त्यामध्ये सर्वाना मोकळीक असती तर बरे झाले असते.’) आणि ती त्यांनी स्पष्टपणे मांडली, हे आलेलेच आहे. परंतु लेखाचा उद्देश तो नाहीच आहे. लेखाचा उद्देश रा. स्व. संघाचा उदोउदो करण्याचा आहे, आणि तो साध्य झालेला आहे.

३) हा लेख १९३४ सालातील एका भेटीवर आधारित आहे. त्या वेळेपर्यंत संघाचे उपद्रवमूल्य कदाचित दिसू लागले नव्हते. शिवाय गांधीजींची भूमिका नेहमीच सर्व समूह, गटतटांच्या समन्वयाची राहिलेली आहे. मात्र संघाची एकूण वृत्तीप्रवृत्ती जसजशी दिसू लागली तसतशी त्या त्या वेळी गांधीजींनी त्याची दखलही घेतली आहे, तीदेखील विशेषत: या लेखाच्या पाश्र्वभूमीवर नोंदवायला हवी. ९ ऑगस्ट १९४२ च्या ‘हरिजन’मध्ये गांधीजींनी लिहिले आहे :

‘‘रा. स्व. संघाबद्दल मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे तीन हजार सदस्य दररोज लाठीकाठीसह कवायत करतात आणि कवायतीनंतर नारा देतात- ‘हिंदुस्थान हिंदुओं का, नही और किसी का! त्यानंतर तेथे भाषणे होतात, ज्यांमध्ये वक्ते सांगतात की आधी इंग्रजांना हाकलून देऊ आणि त्यानंतर मुसलमानांवर कब्जा करू. त्यांनी आपले न ऐकल्यास त्यांना मारून टाकू.’ मला वाटते, की हा नारा तर चुकीचा आहेच, परंतु त्यातील भाषणाचा आशय अधिकच वाईट आहे. भारत त्या सर्व लोकांचा आहे जे इथे जन्मले आणि वाढले. त्यामुळे तो जेवढा हिंदूंचा आहे तेवढाच पारशी, ज्यू, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान आणि अन्य हिंद्वेतरांचाही आहे. स्वतंत्र भारतामध्ये हिंदूंचे नाही तर हिंदुस्थानींचे राज्य चालेल व ते कुठल्याही धार्मिक पंथ वा संप्रदायाच्या बहुमतावर नाही, तर धार्मिक भेदभावाशिवाय, सर्व जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालेल. धर्म हा वैयक्तिक विषय आहे. त्याला राजकारणात कुठलेही स्थान असता कामा नये. परदेशी सत्तेमुळे आपल्या देशात एक अनैसर्गिक स्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे आपल्याकडे धर्मावर आधारित विभाजन झाले आहे. देशातून ही परकीय सत्ता ज्या दिवशी हटेल, तेव्हा या खोटय़ा नाऱ्यांचे आणि चुकीच्या आदर्शाचे आपल्यालाच हसू येईल.’’

२१ सप्टेंबर १९४७ ला ‘हिंदू राष्ट्रवाद्यां’संदर्भात प्रार्थनेनंतरच्या प्रवचनात त्यांनी टिप्पणी केली होती :

‘‘..मुसलमानांना मारून टाकणे अथवा त्यांना देशाबाहेर हाकलण्याची चिथावणी देणे हे पिसाटपणाचे लक्षण आहे. अशा कृती म्हणजे देशाची आत्महत्या ठरेल व हिंदू धर्मच मुळापासून नष्ट होईल. जे कुठले नियतकालिक अशा प्रकारचा प्रचार करते ते स्वतंत्र भारतात राहण्याच्याच लायकीचे नाही. माध्यमांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ असा नाही, की त्यांनी जनतेच्या मनात विष पेरावे. आज सर्व जग भारताकडे शांतीचे प्रतीक म्हणून पाहते, पण अशा वृत्तीने भारताचे ते स्थान राहणार नाही. जोपर्यंत माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत अशा पिसाटपणाला माझा विरोध असेल.’’

सप्टेंबर १९४७ मध्ये गांधीजी व गोळवलकर यांच्या भेटीसंदर्भात गांधीजींचे तत्कालीन स्वीय सहाय्यक प्यारेलाल यांनी आपल्या ‘पूर्णाहुती’मध्ये लिहिले आहे :

‘‘या मुलाखतीदरम्यान कोणी म्हटले की संघाच्या लोकांनी निर्वासितांच्या शिबिरांमध्ये उत्कृष्ट मदतकार्य केले आहे. त्यावर गांधीजींनी म्हटले- ‘परंतु हे विसरू नका, की नाझी हिटलर आणि फॅसिस्ट मुसोलिनी यांनीही हेच केले होते!’ गांधीजींनी रा. स्व. संघाला ‘हुकुमशाही प्रवृत्तीची सांप्रदायिक संस्था’ म्हटले. गोळवलकर यांनी गांधीजींना ‘हिंदू धर्मातील महान पुरुष’ असे संबोधले होते, त्यावर गांधीजी म्हणतात, ‘‘मी हिंदू आहे जरूर, परंतु माझा हिंदू धर्म असहिष्णु नाही आणि बहिष्कारवादीही नाही. माझ्या मते हिंदू धर्म हा समावेशक आहे व सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी हिंदू धर्माने आत्मसात केल्या आहेत.’’

३० नोव्हेंबर १९४७ च्या प्रार्थनासभेत गांधीजी म्हणाले : ‘‘हिंदू महासभा व रा. स्व. संघ असे मानतो, की हिंदुत्वाचे रक्षण करण्याचा केवळ त्यांचाच एकमेव मार्ग आहे. हिंदू महासभा व संघ या दोन्ही हिंदूंच्या संघटना आहेत, त्यांमध्ये शिकले-सवरलेले लोक आहेत. मी त्यांना नम्रपणे एवढेच म्हणेन, की कुणालाही छळून धर्माचे रक्षण होऊ शकत नाही. आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे. ते आपण तेव्हाच करू शकू जेव्हा आपण दयाळू आणि शूर व सदैव जागरूक असू.’’

गांधीजींची अभिव्यक्ती नेहमीच संयमित असे. त्यामुळे त्यांच्या या सर्व विधानांची तीव्रता आपण समजू शकतो. ‘पूर्णाहुती’मध्ये प्यारेलाल यांनी या मुलाखतीसह, फाळणीनंतरच्या दंगली व गांधीहत्येचे सविस्तर वर्णन केले आहे. मात्र संघाने या वर्णनाचे कधीही कुठल्याही प्रकारे खंडन केलेले नाही. आता संघाला गांधीजींचा पुळका आला आहे. परंतु गांधीजींबद्दलच काय, भारताच्या स्वातंत्र्याबद्दल, संविधानाबद्दल, अगदी राष्ट्रीय झेंडय़ाबद्दलही ज्यांना आत्मीयता नाही, आस्था नाही अशांच्या या सर्व मखलाशीचे कौतुक कुणाला?

सुनीती सु. र.

 

घडवूनआणल्यासारखी चर्चा

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून गांधीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे विचार कसे सारखेच होते. गांधीजींनी संघाच्या कार्याचे कसे कौतुक केले आणि गांधीजीचे कार्यच संघ कसे पुढे नेत आहे, हे दाखविण्याचा आटापिटा अत्यंत योजनाबद्धपणे करण्यात येत आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’चा प्रारंभ गांधी जयंती दिनी करणे, नथुराम गोडसेने केलेल्या गांधीजींच्या खुनाशी संघाचा कसा संबंध नाही हे वारंवार उच्चरवाने सांगणे आणि गोहत्या बंदी, रामराज्य इ. कार्यक्रम पुढे रेटण्यात गांधीजींच्या वक्तव्यांचा अर्धवटपणे वापर करून ते खुबीने मांडणे हा या योजनेचाच भाग आहे. मधु देवळेकर यांचा लेख त्याच योजनेचा भाग असावा.

गांधी जयंतीच्या निमित्ताने देवळेकर यांनी सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे परममित्र आणि सहकारी अप्पाजी जोशी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, गांधींनी वर्धा येथील संघाच्या शिबिरास दिलेल्या भेटीचे आणि त्यानंतर सरसंघचालकांशी झालेल्या भेटीच्या वेळी संघकार्याच्या केलेल्या कौतुकाचे वर्णन करणारा लेख लिहिला आहे. ही माहिती अप्पाजी जोशींनी दिली. याव्यतिरिक्त लेखक त्या माहितीचा स्रोत सांगत नाही. असे महत्त्वाचे लेख लिहिताना मूळ संदर्भ दिले गेले तर लेखाची विश्वासार्हता वाढते. तरीही तात्पुरते आपण गांधींनी संघ शाखेला भेट दिली तेव्हा आणि डॉ. हेडगेवारांशी झालेल्या कथित भेटीत संघकार्याचे तोंडभरून कौतुक केले, हे मान्य करू या. मात्र गांधीजींचे सचिव महादेव देसाई यांच्या दैनंदिनीत अशी नोंद दिसत नाही, हेदेखील लक्षात घ्यायला हवे.

गांधीजींनी संघ शाखेला भेट दिल्यावर तेथील व्यवस्थेची, स्वयंपाकगृहाची आणि शिस्तीची प्रशंसा केली, हे स्वाभाविक आहे. कारण कोणताही पाहुणा यजमानांची निंदा करत नाही, हा संकेत सभ्यता म्हणून पाळणे गांधींना भाग होते आणि सज्जन गांधींनी तो पाळला इतकाच त्याचा अर्थ आहे. तरीही ती स्तुती लेखकाला आजही अभिमानाने सांगावीशी वाटत असेल तर तसे करण्याचा लेखकाला हक्क आहे.

डॉ. हेडगेवारांचे छायाचित्र गांधींना ओळखता आले नाही, हेदेखील समजण्यासारखे आहे. पण एकदा छायाचित्र कोणाचे हे सांगितल्यानंतर, ‘‘अस्पृश्यता नष्ट करण्याच्या संदर्भात आपण ज्यांचा उल्लेख केलात ते डॉक्टर हेडगेवार हेच काय? यांचा संघाशी काय संबंध?’’ असे प्रश्न गांधींनी विचारणे वा गांधींच्या तोंडी घालणे हे न समजण्यासारखे आहे. कारण तोवर संघाची स्थापना होऊन नऊ वर्षे झाली होती. संघ कोणत्या उद्देशाने स्थापन करण्यात आला, तो स्थापन करण्यामागे कोण माणसे होती, त्या माणसांचा काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत काय सहभाग होता आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याबाबत या मंडळींचे काय मत होते, या गोष्टी गांधी जाणत नव्हते असे समजणे, म्हणजे गांधी स्वातंत्र्य आंदोलनाकडे गंभीरपणे पाहात नव्हते असे समजण्यासारखे होईल. संघाची गांधींना माहिती होती हे याच लेखातील पुढे गांधीजींच्या तोंडून विचारण्यात आलेला प्रश्न दाखवून देतो. महात्माजी म्हणतात, ‘‘छान, आपल्या कामाच्या यशात खरोखरच देशाचे हित सामावलेले आहे. पण खरेच डॉक्टरजी, आपल्या संघटनेचा वर्धा जिल्ह्यात चांगला जम बसला आहे असे ऐकतो. मला वाटते, प्रामुख्याने शेठ जमनालाल बजाज यांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक साहाय्यावर हे घडले असेल.’’ स्वत: गांधींचे वास्तव्य वारंवार वध्र्यात असताना गांधींना संघ संस्थापकाचे नाव माहीत नसावे यावर विश्वास बसणे कठीण आहे. दुसरे, जमनालाल बजाजांना गांधी आपला सहावा मुलगा मानत होते. तेव्हा तुम्ही सर्व प्रकारची आर्थिक मदत संघाला करता का? असा प्रश्न ते जमनालालना विचारू शकत होते. अशा परिस्थितीत हा प्रश्न गांधीजींनी डॉ. हेडगेवारांना विचारण्याचे कारणच नव्हते आणि तसे करणे अशिष्टपणाचे आहे, हे न समजण्याइतके गांधी असभ्यही नव्हते. म्हणूनच गांधींच्या तोंडी टाकण्यात आलेला वरील प्रश्न केवळ संघ गुरुदक्षिणेवरच चालतो, हे म्हणणे मांडण्यासाठी गांधींच्या तोंडी घालण्यात आला असावा, असे वाटते. अर्थातच पुढील संवादाचा उद्देशही याहून वेगळा असू शकत नाही.

खरे तर, १९३४ च्या डिसेंबरमध्ये गांधींना डॉ. हेडगेवारांना संघाबाबत माहिती करून घेण्यासाठी भेटण्याची आवश्यकताच नव्हती. १९३० च्या गांधींनी सुरू केलेल्या सत्याग्रहामध्ये संघ कोणत्याही स्वरूपात भाग घेणार नाही, हे सर्व संघ शाखांसाठी डॉक्टरांनी स्पष्ट करून त्यात कोणी जबाबदार स्वयंसेवक भाग घेणार नाही, याची काळजी घेतली होती. त्याचवेळी स्वत सत्याग्रहात भाग घेऊन ते तुरुंगात गेले होते. असे करण्यामागचा उद्देश संघाने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या चरित्राप्रमाणे, तुरुंगात सोबत असलेल्या स्वातंत्र्यप्रेमी, स्वार्थाचा त्याग केलेल्या, प्रतिष्ठित गटांबरोबर चर्चा करून त्यांना संघाचे कार्य करण्यास प्रवृत्त करणे हा होता. काँग्रेस कार्यकर्त्यांना अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या उद्दिष्टापासून परावृत्त करून स्वातंत्र्यविरोधी कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या हिंदू आणि मुस्लीम जातीयवादी संघटनांच्या कारवायांनी सावध होऊन काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना संघ, हिंदू महासभा आणि मुस्लीम लीगचे सदस्यत्व स्वीकारण्यास प्रतिबंध केला होता. हा प्रतिबंध जून, १९३४ मध्ये केला गेला होता. खरे तर डॉ. हेडगेवारांना यावर चर्चा करण्यासाठी गांधींच्या भेटीची गरज होती. तेव्हा ‘आपण निष्कारण निराळी संघटना का काढली’ असा प्रश्न गांधींनी विचारण्याऐवजी डॉक्टरांनी ‘‘काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना संघाचे सदस्य होण्यास का प्रतिबंध केला’’ असा प्रश्न विचारून चर्चा व्हायला हवी होती. तसे न झाल्याने सारी चर्चाच मुद्दाम घडवून आणल्यासारखी वाटते. विश्वासार्ह वाटत नाही.

लेखकाने पुरावे दिले असते, तर त्या पुराव्यांची छाननी करता आली असती. तथापि गांधींनी केलेले कौतुक कुणा स्वयंसेवकाला आजही अभिमानाचा विषय वाटत असेल तर तो गांधींचाच गौरव आहे.

लेखाच्या प्रारंभी गांधींचा गौरव करताना, ‘‘जे आपल्याला पुरोगामी, प्रगतशील व धर्मनिरपेक्ष मानतात, तेसुद्धा गांधीजींच्या विचारांचा आदर करतात. एका सनातनी, गोभक्त हिंदूला हे पुरोगामी, प्रगतशील पूज्य का मानतात, हे मोठे गूढच आहे,’’ असे म्हटले आहे.

लेखकाने गांधींचे गोरक्षणाबाबतचे आणि धर्माबाबतचे विचार वाचले, तर हे गूढ लेखकाला उकलेल. परंतु गांधींचा खून केल्यानंतर मिठाई वाटणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे गांधीप्रेम सारखे उचंबळून का येते, हे गूढ लेखकानेच उकलून सांगायला हवे.

अर्थात, गांधी संघाला काय समजत होते, हे गांधींचे सचिव प्यारेलाल यांनी लिहिले आहे. प्यारेलाल यांच्या ‘महात्मा गांधी- द लास्ट फेज’ या पुस्तकाच्या पृ. ४४० वर त्याविषयी लिहिले आहे. गांधींजवळ राहणाऱ्या कुणीतरी १९४३ च्या दंगलींच्या वेळी वाघा बॉर्डर येथील निर्वासित शिबिरात मदतीचे कार्य करणारे संघ स्वयंसेवक कार्यक्षम, शिस्तबद्ध, धर्यशील आणि कष्टाची कामे करण्यात तत्पर आहेत, अशी स्तुती केली. त्यावर ‘‘पण हे विसरू नका की मुसोलिनीचे फॅसिस्ट आणि हिटलरचे नाझीही असेच होते,’’ गांधी लगेचच म्हणाले. गांधी संघाकडे जातीयवादी फॅसिस्ट म्हणून पाहात होते.

डॉ. राम पुनियानी/ डॉ. विवेक कोरडे

 

First Published on October 8, 2017 2:32 am

Web Title: loksatta reader response on lokrang articles