‘लोकरंग’मधील (२१ जानेवारी) गिरीश कुबेर यांचा ‘इतिहासाचा कच्चा खर्डा’ हा लेख वाचला. समकाळात घडणाऱ्या साऱ्याच घटना आपण एका संकटाचे प्रत्यक्षदर्शी आहोत अशी जाणीव करून देणाऱ्या आहेत. यातून पुढे काय जन्मास येईल हे खात्रीलायकरीत्या कोणी सांगू शकत नाही. तरी यातूनही चांगलेच उपजेल असा आशावाद राखण्यास हरकत नसावी. निराशेचे ढग त्यातूनच तर दूर होतील. या कामी कष्ट पडतील; आपल्यासारखा विचार करणारे समाजात आहेत ना नक्की, असे प्रश्नही पडतील. परंतु आशा ठेवू या. विवेकाने लढू या. निसर्ग सोबत देईल. आपण धीराने मार्गक्रमण करू या.

– पांडुरंग पवार

 

स्वतंत्र बुद्धीची प्रेरणा मिळो!

‘इतिहासाचा कच्चा खर्डा’ हा लेख वाचला. ‘ट्रेलर हा सिनेमापेक्षाही अधिक रोमांचक’ असेच हा लेख वाचून वाटले. परिस्थितीसाधम्र्याचा एवढा चपखल उपयोग करून संदेश देण्याची हातोटी हेच लेखाचे बलस्थान आहे. पारतंत्र्यात असताना कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी ‘कीचकवध’ लिहून हेच तर केले होते. लेखात नमूद केलेल्या ‘कणाहीन’ आणि ‘कंबरलचक्यां’ना असे लेख स्वतंत्र बुद्धी वापरण्यास प्रेरक ठरतील.

– प्रमोद भार्गवे, नाशिक

 

बॉलीवूडवर अन्याय नको

‘इतिहासाचा कच्चा खर्डा’ हा लेख वाचला, आवडला. लेखात ‘द पोस्ट’ या चित्रपटाचे रसग्रहण आणि त्याच्या अनुषंगाने राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आपल्या चित्रपटसृष्टीची बोळवण ‘मनोरंजनखान आणि टाइमपासकुमार’ अशी केली आहे, तेथे मात्र अडखळल्यासारखे झाले. राजकीय विषयांवर वा इतिहासावर करकरीत भाष्य करणारे चित्रपट आपल्याकडेही कमी नाहीत. भारतासमोरील भ्रष्टाचार, बेरोजगारी, बदलती कुटुंबव्यवस्था अशा प्रश्नांना बॉलीवूडने वेळोवेळी न्याय दिला आहे. ‘गर्म हवा’, ‘रंग दे बसंती’, ‘आंधी’.. अशी अनेक नावे घेता येतील. राज कपूरपासून मधुर भांडारकपर्यंत अनेकांनी असे प्रयत्न केलेले दिसतात. जावेद अख्तर यांच्या मार्मिक आणि धारदार संवादांतून तोच प्रयत्न अगदी ‘अँग्री यंग मॅन’च्या तथाकथित ‘सुपरहिट, गल्लाभरू’ चित्रपटांतही दिसतो. तरीही त्यांना ‘द पोस्ट’सारखा दर्जा रसिक आणि समीक्षकांकडून मिळत नाही. बॉलीवूडवर असा अन्याय होऊ  नये असे वाटते.

– प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>