उपवासाच्या या श्रावण महिन्यात उपास धरल्यानंतर भुकेने व्याकूळ झाल्यावर समोर पंचपक्वान्नाचे ताट यावे व आपण त्यावर तुटून पडावे- काहीशी अशीच स्थिती ७ ऑगस्टची ‘लोकरंग’ पुरवणी हाती पडल्यानंतर झाली. यातील आसाराम लोमटे यांचा ‘जगण्याचा जामीनदार’ हा लेख अतिशय आवडला.
शेतकरी शेत नांगरत असलेले निसर्गरम्य भातशेती शिवाराचे चित्र पाहून कागदावरच राहिलेले ‘भारत कृषिप्रधान देश आहे’ हे वाक्य पुन्हा एकदा नव्याने डोळ्यासमोर आले. सध्या आपल्याकडे बिल्डर लॉबीने धुमाकूळ घालून काँक्रीटची शेती करावयास सुरुवात केली आहे. राजकारणी मंडळींची त्याला फूस असावी असेही वाटते. अंतिमत: हीच काँक्रीटची शेती मानवाचा संहार घडविणार आहे हे निश्चित. मात्र, याकडे कोणी गांभीर्याने पाहते आहे का? ठोस उपाययोजना राबवतो आहोत का?
एकेकाळची हिरवा शालू पांघरलेली, असंख्य जीव-जिवाणूंनी भरलेली, पाना-फुला-फळांनी बहरलेली, डवरलेली ही चराचर सृष्टी आज भकास होत चालली आहे. निसर्गसंपदेची अमानुष तोड करून सगळीकडे पसरलेल्या काँक्रीटच्या शेतीच्या परिणामातून उद्भवलेल्या मागील दोन-तीन वर्षांतल्या दुष्काळी स्थितीने आपणास याविषयी सूचित केले आहेच. मात्र यंदाच्या चांगल्या विक्रमी पर्जन्यमानाचा फायदा आपण घ्यावयास हवा. बिल्डर लॉबीपासून जास्तीत जास्त शेती बागायती, गुरं चरणे, फलोद्याने कशी वाचवता येतील याकडे शेतकऱ्यांसह साऱ्यांनीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राबणाऱ्या हातांना यंदाच्या पावसाने चांगलाच दिलासा दिलेला आहे. मात्र असाच दिलासा शासनप्रणालीने राबणाऱ्या हातांना देण्यासाठी धावून येणे गरजेचे आहे. जेणेकरून निसर्गाच्या आधाराने जगणे साऱ्यांनाच शक्य होईल.
– कीर्तिकुमार वर्तक, वसई, पालघर

भारतीय स्वातंत्र्याचा प्रवास
‘लोकरंग’ (१४ ऑगस्ट) मधील जयराज साळगावकर यांच्या ‘अटलांटिक सनद- भारतीय स्वातंत्र्याची दुसरी बाजू’ या लेखात नमूद केलेल्या अटलांटिक चार्टरच्या घटनेप्रमाणेच इतरही अनेक आंतरराष्ट्रीय घटनांचे परिणाम झाल्याने भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला. त्याची थोडक्यात माहिती-
ईस्ट इंडिया कंपनीमार्फत ब्रिटिशांची सत्ता इथे १७५७ ते १८४८ या काळात स्थापित झाली. त्या काळातील औद्योगिक क्रांती, अमेरिकेचे स्वातंत्र्य आणि फ्रेंच राज्यक्रांती या घटनांचा परिणाम ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश सरकारने घातलेल्या नियंत्रणातून दिसून येतो. त्याचीच अखेर १८५८ च्या राणीच्या जाहीरनाम्यात व १८६१ च्या इंडियन कौन्सिल्स कायद्यात झाली. भारतातील राज्यव्यवस्था राजेशाहीकडून लोकशाहीत बदलण्याची ही सुरुवात होती. स्वातंत्र्याकडील यापुढचा टप्पा हा १८९२ च्या इंडियन कौन्सिल्स कायद्याचा आहे. या काळातील आंतरराष्ट्रीय घटना म्हणजे १८६६ मध्ये इंग्लंडमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ची स्थापना आणि १८९२ मध्ये दादाभाई नौरोजी यांची ब्रिटिश संसदेत निवड.
त्यानंतरचा टप्पा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट, १९१९ या कायद्याचा आहे. या काळातील आंतरराष्ट्रीय घटना म्हणजे १९१४-१८ मधील पहिले जागतिक महायुद्ध आणि १९१७ मधील रशियन क्रांती. यापुढचा स्वातंत्र्याकडील टप्पा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट, १९३५ या कायद्याचा. या काळात कोणतीही परिणामकारक आंतरराष्ट्रीय घटना घडलेली दिसत नाही. तर स्वातंत्र्याकडील शेवटचा टप्पा ब्रिटिश सरकारने केलेल्या इंडियन इंडिपेंडन्स अ‍ॅक्ट, १९४७ या कायद्याचा आहे. या काळातील आंतरराष्ट्रीय घटना म्हणजे १९३९ ते १९४५ दरम्यानचे दुसरे जागतिक महायुद्ध, १९४१ मध्ये अटलांटिक चार्टर, १९४२ मध्ये रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये स्थापलेला पक्ष व सैनिकी दल, १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस त्या सैनिकी दलाचे नेते झाले व तिचे नाव आझाद हिंद सेना झाले. अखेर १९४७ मध्ये भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला. फ्रेंचांच्या ताब्यातील प्रदेश वाटाघाटी करून मिळाला. तर १९५५ ते ६१ दरम्यान गोवा मुक्तीसंग्राम झाला. अशाप्रकारे भारतीय स्वातंत्र्याचा प्रवास टप्प्याटप्प्याने पूर्णत्वाकडे येत होता.
– वैजनाथ वझे, मुंबई

mumbai coconut prices marathi news, mumbai coconut rates marathi news
आवक घटल्याने शहाळी महाग
A young man helped crying dog
माणुसकी अजूनही जिवंत! अंधाऱ्या जागेत अडकलेल्या श्वानाला तरुणाने अशी केली मदत; युजर्स म्हणाले…
cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ

हा भाबडेपणा!
‘लोकरंग’ (१४ ऑगस्ट) मधील जयराज साळगावकर यांच्या ‘अटलांटिक सनद- भारतीय स्वातंत्र्याची दुसरी बाजू’ या लेखामुळे नवीन माहिती उजेडात आली. परंतु त्यांनी उद्धृत केलेल्या सीमित माहितीवरून अटलांटिक सनदेला ‘भारतीय स्वातंत्र्याची दुसरी बाजू’ मानणे हा भाबडेपणा ठरेल. कारण सन १८८९ पासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घुसू पाहणाऱ्या अमेरिकेला युरोपीय वसाहतकार देश चंचूप्रवेशही करू देत नव्हते. ही जागतिक कोंडी फोडण्याची नामी संधी भारतानेच अटलांटिक सनदेच्या रूपात अमेरिकेला मिळवून दिली. बेसुमार कच्चा माल आणि हवे तेवढे निधडे सनिक स्वस्तात पुरवणारा भारत हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडलेला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बहुतांश ब्रिटननिर्मित तयार माल सोने आणि चांदी देऊन खरेदी करणारा अतिश्रीमंत, पण गुलाम भारत हे ब्रिटिश साम्राज्याचे मर्मस्थान असल्याचे अमेरिकेने हेरले होते. अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी ब्रिटनच्या या मर्मावर अटलांटिक सनदेच्या रूपात घातलेल्या नेमक्या घावामुळे अध्र्या जगावर राज्य गाजवणाऱ्या त्या साम्राज्याला हार मानावी लागली. त्यातून अमेरिकेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपसूक प्रवेश मिळाला.
पण त्यानंतर पुढील सुमारे सात महिने अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही राष्ट्रांना भारताचा सोयीस्करपणे विसर पडलेला होता. १२ फेब्रुवारी १९४२ ला ब्रिटिशांचे पूर्वेकडील अजेय असलेले सिंगापूर हे
ठाणे जपान्यांनी जिंकून घेतले. पाठोपाठ ७ मार्चला त्यांनी ब्रह्मदेशातील रंगूनही जिंकले. त्यानंतर बर्लिनच्या आझाद िहद नभोवाणीवरचा सुभाषचंद्र बोसांचा तुफानी प्रचार भारतात स्वातंत्र्यचेतना प्रज्ज्वलित करीत होता. त्यांचा प्रभाव प्रामुख्याने रंगूनहून जवळ असलेल्या भारतातील बंगाल प्रांतात होता. जपानी सेना भारताच्या सीमेवर पोहोचल्यानंतर पहिली झोप उडाली ती रुझवेल्ट साहेबांची. एका फटक्यात पर्ल बंदर फत्ते करणारा जपान आशियातही वरचढ ठरत होता. गुलाम भारताची आठवण पुन्हा एकदा जागवत त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांना तंबी भरली. आणि फक्त तीन-चार दिवसांत क्रिप्स कमिशनचे बुजगावणे भारतात येऊन रिकामे हात दाखवून लगोलग परतही गेले. यात भारताच्या हाती भरीव असे काहीच पडले नाही. जपान्यांना बंगालमधून काहीच रसद मिळू नये म्हणून ब्रिटिशांमार्फत बंगालमध्ये कृत्रिम दुष्काळ घडवण्यात आला. तेथील अन्नाचा साठा जबरदस्तीने जप्त करून युरोपमधे पाठवला गेला. काही ठिकाणी उभी पिके जाळण्याचेही प्रकार घडलेले होते. नाही म्हणायला अमेरिका व कॅनडा यांनी बंगालसाठी फुकटात गहू पाठवला होता, पण तो साठा ब्रिटनने परस्पर युरोपमध्ये वळवला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लाखो ज्यूंच्या छळ आणि कत्तलींबाबत नाझींवर खटले चालवून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या. परंतु त्याच धर्तीवर बंगालमधील दुष्काळामुळे झालेल्या नाहक मृत्यूंबाबत किती ब्रिटिश गुन्हेगारांवर खटले चालविण्यात अमेरिकेने पुढाकार घेतला?
हे सर्व पाहता भारतीय स्वातंत्र्याला मदत करण्याचे श्रेय अमेरिकेला काही अंशीही देणे हा शुद्ध भाबडेपणाच ठरेल. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असे मानले जाते. परंतु भारताचा स्वातंत्र्यलढा असा सरळसोट नाही. त्याला अनेक पलू आहेत. भारत आता स्वतंत्र समजला जातो. परंतु जर पाकिस्तानी सनिकांनी भारतीय सनिकांची कातडी सोलून काढली, तर त्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्य भारताला नाही.
– रवींद्र वडके, अंबरनाथ

सुनीताबाईंची प्रतिमा पटली नाही!
‘लोकरंग’ (१७ जुलै) मधील आशुतोष जावडेकरांच्या ‘हीरो- प्रतिमेच्या शोधात’ या लेखात सुनीताबाई देशपांडे यांची रंगवलेली प्रतिमा पटत नाही. कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व! सुनीताबाई देखण्या, बुद्धिमान, मनस्वी तर होत्याच, पण त्यांची टोकाची शिस्तप्रियता, काटेकोरपणा, अढळ तत्त्वनिष्ठा, प्रामाणिकपणा पाहता स्वत:लाच शोधायचा किंवा व्यक्त व्हायचा त्यांचा प्रयत्न असावा असं वाटतं.
लग्नाआधी त्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होत्या. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर किंवा लग्नानंतर त्या एकूण समाजकारण व राजकारण यापासून दूरच राहिल्या. याला कारण त्यांची तत्त्वनिष्ठा असावी. एखाद्या स्त्री-चळवळीशी त्या जोडल्या गेल्या होत्या असाही उल्लेख कुठे नाही. साहित्य-कला हे पु. ल. व सुनीताबाईंचे सामायिक रूचीचे विषय. त्यांचे लग्न झाले त्यावेळी पु. ल. मराठी माणसाच्या गळ्यातले ताईत नव्हते. ते नंतर झाले. सुनीताबाईंनी काव्यवाचनाव्यतिरिक्त नाटकात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याबाबतीत त्या मागेच पडल्या. पु. लं.नीही त्यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी खंत सुनीताबाईंनी ‘आहे मनोहर तरी’मध्ये व्यक्त केली आहे. त्यांच्यासारखी बुद्धिमान, एकेकाळची लढाऊ कार्यकर्ती आणि अभिरुचीसंपन्न वाचक केवळ गृहिणी बनून राहणे शक्य नव्हते. परंतु त्यांच्या गुणांची दखल घेणाऱ्या व्यक्ती आजूबाजूला किती होत्या? उलट, त्यांच्या कडक शिस्तीमुळे नाराज झालेलेच अधिक असतील. (त्यात थोडा पुरुषी इगोचाही भाग वाटतो. अर्थात तो विषय वेगळा.)
या पाश्र्वभूमीवर त्यांनी अंगीकारलेल्या लेखनामुळे व प्रामुख्याने जी. एं.सोबतच्या पत्रव्यवहाराने त्यांना एक स्वतंत्र ओळख प्राप्त झाली. एक कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होतेच.
पु. लं.सोबतचे सहजीवन, काव्यवाचनाचे कार्यक्रम, संगीत मैफिली, वाचन आदी सर्व असले तरी ‘आहे मनोहर तरी’मध्ये एक प्रकारची अस्वस्थता व्यक्त होतेच.
त्यांच्या आत असलेल्या ज्या ‘रचनात्मक संभावना’ त्यांना अस्वस्थ ठेवत होत्या त्या लेखनातून व जी. एं.सारख्या प्रतिभाशाली लेखकासोबतचा संवाद व पत्रव्यवहार यातून प्रवाहीपणे प्रकट झाल्या. त्यात निश्चितच त्यांना एक प्रकारे आत्मिक समाधान मिळाले असणार. तेच त्यांच्या प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ प्रकृतीशी सुसंगत आहे असे वाटते.
– जयश्री आवदे, कोथरुड, पुणे</strong>

वाचनीय लेखांची मेजवानी
‘लोकरंग’चा (३१ जुलै) अंक खरंच सर्वागसुंदर असा आहे. ‘फुलाची पाकळी’ हा लेख अगदी दाद देण्यासारखा आहे. ‘माझे पुरुषाचे तन -मन’ हा लेख प्रत्येकाने विचार करावा असा आहे. मुलांना बालपणापासूनच आपण कोणी विशेष नाही हे शिकवणे गरजेचे आहे. तसेच ‘लंपनची अवघड गोष्ट’ हा लेख फार आवडला. सर्वच मोठय़ा लेखकांच्या पत्नींच्या आत्मचरित्रांमध्ये पतीकडून झालेल्या लहान – मोठय़ा अन्यायांबद्दल खंत आहेच. यात ‘आहे मनोहर तरी’, ‘कुणास्तव कोणीतरी’, ‘वसा’, ‘नाच गं घुमा’, ‘मास्तरांची सावली’ ही सगळी आत्मचरित्रं आली. कदाचित त्यामुळेच ती जास्त वाचनीय झाली असावीत. याशिवाय टिळकांच्या मंडालेचा शोध वाचून माझ्या जीवनातील घटना आठवली. काही वर्षांपूर्वी माझे पती म्यानमारला गेले होते तेव्हा मी त्यांना बहादूरशाह जफरची कबर पाहून येण्यास सुचवले होते. आल्यावर त्यांनी सांगितले की, तिथे कोणालाही याविषयी माहिती नाही. टिळकांचं मंडालेच माहीत नाही म्हटल्यावर बहादूरशाह जफर तर फारच
जुना झाला.
– नंदिनी बसोले

‘सर्न’च्या सोनाराने कान टोचले
‘सर्नद्वारी नटराज’ हा लोकरंग (१४ ऑगस्ट) मधील लेख वाचला. िहदू धर्मातील देवदेवतांच्या अनुषंगाने असंख्य गोष्टी, आख्यायिका प्रसिद्ध आहेत. आधुनिक काळातील अनेक संकल्पनांशी त्यांचे आश्चर्यकारक साधम्र्यही दिसते. परंतु त्यांचा संबंध कोणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जोडू लागले तर तो टवाळीचा विषय ठरतो. रामायण-महाभारतातील अनेक गोष्टींचा संबंध आधुनिक संकल्पनांशी जोडता येतो. (उदा. हवाई प्रवास, सृष्टीचा विनाश करणारी किरणे, कृत्रिम पाऊस पाडणारी अस्त्रे, पेटीत सापडलेले बालक, अनेक देवतांचे ‘अंश’ घेऊन विशिष्ट उद्दिष्टाने जन्माला घातलेली व्यक्ती, इत्यादी). त्यातून सध्याचे आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे आधीच होते हे सिद्ध होत नसले, तरी किमान त्यातील कल्पनाविलास ज्यूल्स व्हर्नच्या सायन्स फिक्शनला लाजवेल असा (त्या काळाकरता ‘आऊट ऑफ द बॉक्स’) होता याचा अभिमान बाळगायला हरकत नसावी. लेखात म्हटल्याप्रमाणे निर्मिती, स्थिती आणि लय यांचा स्रोत एकच आहे असे ‘सर्न’मधील संशोधन सांगते. ब्रह्मा, विष्णू, महेश (सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता, आणि हर्ता) यांची तीन भिन्न तोंडे, परंतु एकच शरीर असणारी त्रिमूर्ती हासुद्धा असाच विस्मयजनक कल्पनाविलास किंवा योगायोग म्हणावा लागेल. भारतात असे काही म्हणणाऱ्यांची टिंगल होते. परंतु शंकराचे वैश्विक नृत्य हे काप्रा यांच्या ‘द टाओ ऑफ फिजिक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना होऊन बसते, हे विशेष. या पाश्र्वभूमीवर सर्नमध्ये विराजमान झालेली नटराजाची मूर्ती हे सोनारानेच टोचलेले कान वाटतात.
– प्रसाद दीक्षित, ठाणे