News Flash

ही तर फक्त सुरुवात..

आजचा हा लेख या सदरातील शेवटचा लेख.

आजचा हा लेख या सदरातील शेवटचा लेख. खरं तर खूप काही लिहायचं आहे या लेखात, वाचकांसोबतचा एक वर्षांचा हा लेखनसहवास भरभरून उपभोगला, त्यामुळे हा लेख लिहिताना मन भरून येतंय. या सदरात आतापर्यंत जवळपास तीस जणांच्या कथा अनुभवल्या. प्रत्येक लेख लिहायच्या आधी मी त्या व्यक्तीसोबत जवळपास तीन ते चार वेळा चर्चा करायची, नंतर लिखाण सुरू झाल्यावर थोडय़ाफार चर्चा व्हायच्या, कधीकधी त्यांना त्यांचे अनुभव लिहून द्यायला सांगायची. या सदरानंतर हे सगळं थांबेल का?

या सदरातील लेखांचा एकच उद्देश होता, ‘समाजाने दत्तक प्रक्रियेकडं फक्त एक प्रक्रिया म्हणून बघावं आणि दत्तक प्रक्रियेतून आलेलं सगळ्या मुलांना सहजपणे स्वीकारावं.’ हे लेख लिहितानाचे काही अनुभव खरंच खास आहेत.. सदर वाचून बऱ्याच पालकांचे ईमेल्स आणि फोन यायचे. ‘दत्तक’ विषयावर त्यांच्या मनात असणारी भीती हे लेख वाचून कमी झाल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. तसंच ‘आम्ही अजून आमच्या मुलाला किंवा मुलीला दत्तकविषयी सांगितलेलं नाही, परंतु तुमचे लेख वाचून आता आम्ही नक्की हे त्यांच्यासोबत बोलू.’ ‘दत्तक या विषयावर घरात मनमोकळेपणानं बोलायला सुरुवात झाली,’ असंही काही पालकांनी सांगितलं. आमचा तेजस जो नृत्यात निपुण आहे आणि नृत्य हेच त्यानं व्यवसाय म्हणून निवडलं आहे, तो तर ‘पूर्णाक’मध्ये आल्यापासून खुलला आहे. घरात त्याचं आईबाबांसोबतचं, बहिणीसोबतचं नातं अजून दृढ झालेलं मला जाणवतं. आधी घरात सगळे ‘दत्तक हा विषय न बोललेला बरा’, असं वागायचे; परंतु आज तेजसच्या घरात सगळे जण या विषयावर मनमोकळेपणानं बोलतात, इतकंच नव्हे तर बाकी पालकांना आणि मुलांना समुपदेशनदेखील करतात. दर वेळेस मी तेजसला भेटते तेव्हा मला त्याच्यातील आत्मविश्वास वाढलेला जाणवतो. पूर्वी तेजसच्या आयुष्यातील प्रत्येक नातं टिकेल की नाही? मला ही व्यक्ती सोडून जाईल का? अशी भीती त्याच्याही नकळत तो अनुभवायचा; परंतु आता तो स्वत:ला जाणून घेतोय. तेजसमधील हा बदल त्याच्या घरच्यांना आणि मला फार मोलाचा वाटतो.

श्रेयाला आपण सगळेच एका लेखाद्वारे भेटलोत. मी जेव्हा तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा तिला तिचा प्रवास सांगायची मनापासून इच्छा होती. दत्तक प्रक्रियेतील मुलांसोबत किंवा पालकांसोबत आपण काम करू असं मात्र तिला कधी वाटलं नव्हतं. तिच्यावरच्या लेखानंतर ती कायम माझ्या संपर्कात राहिली. ज्या वेळेस माझ्याकडं आलेल्या काही पालकांना वाटतं त्यांच्या मुलांशी दत्तकविषयी बोलून त्यांच्या मनातील शंका, भीती घालवायला मदत करावी त्या वेळेस मी श्रेयाला या मुलांशी संवाद साधायला सांगते आणि ती तिच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून हे आनंदानं करते. तिला स्वत:ला अशा संवादामधून जे मानसिक समाधान मिळतं, ते तिच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं करताना कुठेही उपकाराची भावना, तिच्या समुपदेशनाचा आर्थिक मोबदला हा विचारही तिच्या मनात नसतो. मागच्याच महिन्यात श्रेयाचं लग्न ठरलं. महत्त्वाचं म्हणजे तिच्या सासरच्या सगळ्या मंडळींना श्रेया दत्तक प्रक्रियेतून आली आहे म्हणून ती वेगळी आहे असं वाटत नाही. मला विश्वास आहे श्रेयाचं हे नातं लग्नानंतर अजून दृढ होईल.

सुरुवातीच्या लेखांमध्ये आपण आधी अश्विनीला आणि लगेचच पुढील लेखात प्रणीतला भेटलो. ज्या वेळेस मी या दोघांना लेखासाठी भेटत होते, त्या वेळेस दोघांनी एकमेकांसोबत लग्न करायचं ठरवलेलं होतं. प्रणीतच्या घरी सगळ्यांना आणि अश्विनीच्या आईला हे मान्य होतंच, परंतु अश्विनीच्या बाबांना कसं आणि केव्हा सांगावं या विचारात हे दोघंही होते. दोघांनी ठरवलं, ‘प्रणीतचा लेख झाला की आपण बाबांशी बोलू या.’ प्रणीतच्या लेखानंतर दोघंही बाबांना भेटले आणि त्यांच्या मनातील विचार सांगितला. त्यांना विश्वास होता त्याप्रमाणे अश्विनीच्या बाबांनी लगेच लग्नाला संमती दिली. चार महिन्यांपूर्वी दोघांचं लग्न झालं आणि त्यांच्या संसारात ते छान रमले आहेत. प्रणीत आणि अश्विनी हे दोघंही इतर मुलांचे नक्कीच चांगले मित्र बनून त्यांचाही प्रवास सुकर करण्यासाठी मदत करतील असा माझा विश्वास आहे.

हे एक वर्ष म्हणजे माझ्यासाठी खूप काही देऊन गेलं. ‘मी वाचनीय असं लिखाण करू शकते’ ही जाणीव मला करून दिली ती म्हणजे माझे काका ह.मो. मराठे यांनी. आज ते आपल्यात नाहीत; परंतु माझ्यासाठी आणि माझी लेक निमिषासाठी ते नेहमीच प्रेरणास्रोत होते आणि आहेत. या सदर लेखनातून मला माझ्यातील लेखिकेची खरी ओळख झाली. मराठेकाकू तर माझ्या अगदी हक्काच्या. प्रत्येक लेख प्रसिद्धीच्या आधी त्यांनी वाचला की मला हायसं वाटतं. काका जायच्या आदल्या दिवशीसुद्धा रात्री माझ्यासोबत काकू फोनवर लेखाचं वाचन करत होत्या आणि काका प्रत्येक वाक्याला ‘हं, हं.’ म्हणत जणू संमती देत होते. त्याच रात्री त्यांची तब्येत बिघडली आणि ते अनंतात विलीन झाले. माझं लेखन चालू ठेवणं हीच त्यांच्यासाठी माझी आदरांजली ठरेल.

‘दत्तक’ या विषयावर लिहिणं हे माझ्या लेकीमुळं शक्य झालं, ती माझ्या आयुष्यात आली आणि तिच्यामुळं मी ‘आई’ झाले. ती थोडे दिवस झाले की मला आठवण करते, ‘आई, तुला लेख नाही लिहायचा का? कुणावर लिहिणार आहेस?’ लेखानंतर आलेल्या प्रतिक्रिया विचारते, कुणी भेटून गेले की विचारते, ‘दादा/ताई पण दत्तक प्रक्रियेतून आहे का गं? त्यांच्यासोबत काय बोलणं झालं सांग ना मला?’ एक ना अनेक प्रश्न चालू असतात तिचे. माझा पालक होण्यातला प्रवास माझ्या आई-बाबांशिवाय अशक्यच होता. त्यांच्याशिवाय निमिषाचं बालपण अधुरं आहे.

या सदरातून एक सामाजिक संदेश मिळावा ही इच्छा होती ती पूर्ण झाली असावी असं नक्की वाटतं त्याबद्दल ‘चतुरंग’चे आभार. ‘चतुरंग’चीच सदर लेखिका माधवी गोखलेनेच मला या सदर लेखनाला प्रोत्साहन दिलं. ‘लोकसत्ता’ चित्रकार नीलेश जाधव यांचं कौतुक नक्की करावंसं वाटतं. त्यांनी लेखासाठी काढलेली चित्रं अगदी बोलकी असायची. खूप सारे धन्यवाद माझ्या सगळ्या वाचकांना! तुमच्यामुळं हे सदर लिहायला प्रोत्साहन मिळत गेलं. क्वचित एखादा वाचक समीक्षक बनून भेटला, तेही अनुभव अजून प्रगल्भ लिखाण करायला मदतच करत गेले. वाचकांच्या आलेल्या ईमेल्स आणि फोनवरच्या प्रतिक्रिया कधी चेहऱ्यावर हास्य, तर कधी डोळ्यांत पाणी, तर कधी अंगावर काटा आणायचे. हे अनुभव म्हणजे आयुष्यभराची पुंजी आहे! हे सदर सुरू झालं तेव्हा मनात एक ढाचा तयार होता, परंतु कुणाचे अनुभव आपण लिहिणार आहोत, ते मात्र नक्की नव्हतं. लेख सुरू झाले आणि प्रत्येक लेखामध्ये वाचकांना नवीन काही तरी अनुभवायला मिळेल अशी कुटुंबं भेटत गेली. माझ्या शैक्षणिक कामाच्या व्यापातून या सगळ्यांना भेटून, त्यांना जाणून घेऊन त्यांचा प्रवास शब्दबद्ध करत गेले. जे तुमच्यापर्यंत पोचलं त्यात या सगळ्या व्यक्ती, त्यांचे कुटुंब यांचा खूप मोठा सहभाग आहे. आरती आमटेंची कथा लिहिताना प्रकाश आमटे आणि त्यांच्या घरच्या सगळ्यांनी लेख वाचून बारीकसारीक सुधारणा सांगितल्या. यातून आरती ही आमटे कुटुंबातील एक अविभाज्य घटक आहे हे नक्कीच जाणवलं.

हे लेख वाचून काही वाचकांना ‘हा अनुभव तर माझाच आहे!’ असं वाटायचं. असे सगळे वाचक-पालक माझ्या संपर्कात आले आणि त्या सगळ्या पालकांनी एकत्र राहावं म्हणून आम्ही ‘पूर्णाक’ नावाची संस्था सुरू केली. आज या समूहात जवळपास दोनशेहून अधिक पालक आणि दत्तक प्रक्रियेतून आलेली मोठी मुलं आहेत. आमच्या या समूहात बऱ्याच पालकांना मराठी कळत नसल्यामुळं हे लेख वाचण्याची एक मोठी अडचण होती. गटातील दोन पालक, व्यंकटेश उस्मानाबादचा तो दिल्लीच्या दिपूला सगळा लेख इंग्रजीमध्ये समजावून सांगायचा आणि दिपू तिच्या दोन मुलांच्या गडबडीत प्रत्येक लेखाचं भाषांतर इंग्रजीमध्ये करून समूहातील सगळ्या पालकांपर्यंत पोचवायचं काम चोखपणं करत आली.

हे सदर जरी संपलं तरी मला जाणीव आहे, ‘ही एक फक्त सुरुवात आहे’. ‘पूर्णाक’च्या माध्यमातून काम करत दत्तकविषयी समाज प्रगल्भ होताना दिसेल. समाजातील एक घटक म्हणून तुम्ही सगळे वाचक आमच्या या कामात नक्की सोबत कराल अशी माझी खात्री आहे!

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org

(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2017 4:47 am

Web Title: sangeeta banginwar 2017 last marathi articles in chaturang
Next Stories
1 दत्तक प्रक्रियेचं वर्तुळ
2 प्रेमाची पाखर
3 नात्यांच्या पलीकडे
Just Now!
X