नितीन बोंबाडे

डहाणू : डहाणू शहराला पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपुलाचा संरक्षक  भिंतीमधला भाग रुंद होऊन तो कोसळण्याच्या स्थितीत असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. डहाणू पश्चिमेकडील २५ हून अधिक गावांना जोडणारा हा एकमेव उड्डाणपूल असून  त्याचे बांधकाम १९७४ मध्ये झाले असून जीर्ण पूल कोसळल्यास डहाणूसह अजूबाजूच्या २५ हून अधिक गावांचा संपर्क तुटू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती हाती घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

डहाणू शहराला जोडणाऱ्या रेल्वे पुलाला ४५ वर्षे झाली असून संरक्षक भिंतीचा भाग जीर्ण झाला आहे. त्याच्या संरक्षक भिंती कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडण्याचा  धोका निर्माण झाला आहे.  मुसळधार पावसामुळे  आता त्या पुढच्या संरक्षक  भिंतीमधला भाग रुंद होऊन तो कोसळण्याच्या तयारीत असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये दुर्घटना घडण्याची भीती पसरली आहे. याबाबत  स्थानिक आमदार विनोद निकोले यांनी भर पावसात  सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणूचे  उपअभियंता धनंजय जाधव यांना प्रत्यक्ष घटनास्थळी  नेऊन प्रकार  निदर्शनात आणून देत  तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. दुरुस्तीच्या कामात जोड रस्त्याची समस्या असल्याचे  उपअभियंता धनंजय जाधव यांनी सांगितले.

डहाणू शहरातील मुख्य रेल्वे उड्डाणपूल कालबा झालेला आहे. प्रशासनाने त्याची दखल घेऊन तात्काळ नवीन उड्डाणपूल बनवण्याची मागणी केली आहे. जीवितहानी झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी राहील.

-विनोद निकोले, आमदार, डहाणू