वसई: बहुचर्चित पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांनी सुरू केले असताना अखेर मंगळवारी पक्षाने पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. पक्षाध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही घोषणा केली. मात्र उमेदवाराची घोषणा येत्या ४ ते ५ दिवसात केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पालघर मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघाकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीतर्फे फक्त ठाकरे गटाच्या भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या गदारोळात बहुजन विकास आघाडी काय भूमिका घेते याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. सर्वच पक्षांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या पार्श्वभूमीमुळे बहुजन विकास आघाडीच्या निवडणूक लढविण्यावर सांशकता निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. आमच्याकडे सात ते आठ इच्छुक उमेदवार असून सर्वांना विश्वासात घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील निवडणूकीत आम्हला जवळपास ५ लाख मते मिळाली होती. आमच्या पाठिंब्यावर डहाणू आणि विक्रमगडचे आमदार निवडून आले होते. त्यामुळे पालघर वर नैर्गिकरित्या आमचा हक्क असल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले.
मलाच पाठिंबा द्या
सर्व पक्षांशी माझे चांगले संबंध आहेत. सर्व पक्षांचे नेते मला भेटून पाठिंबा मागत आहे. मात्र तुम्ही सर्वांनी मलाच पाठिंबा द्या, असेही ठाकूर यांनी सुनावले. निवडणूक ही लढाई आपल्या जागी आहे आणि मैत्री एकीकडे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. विकास कामे हा आमचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असून आमचे कार्यकर्तेच स्टार प्रचारक असल्याचेही त्यांनी सांगितले. एका पक्षाने बविआच्या शिट्टी चिन्हावर दावा सांगितला आहे. आम्ही शिट्टीसाठी प्रयत्न करू. ते नाही जरी मिळाले तरी नवीन चिन्ह एका दिवसात घरोघरी पोहोचवू असेही ते म्हणाले.