१ ऑगस्ट रोजीचा कार्यक्रम प्रस्तावित; मुख्यमंत्री कार्यालयाकडून निश्चिती नाही
पालघर: पालघर नवनगर येथे सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या जिल्हा मुख्यालय संकुलाचे पालघर जिल्ह्य़ाच्या सातव्या वर्धापन दिनी म्हणजे १ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून अनुमती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
जिल्हा स्थापनेनंतर १०३ हेक्टर परिसरात जिल्हा मुख्यालय संकुलाची उभारणी करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली होती. या संकुलातील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कामे एप्रिल महिन्यात पूर्ण झाली असून जिल्हा परिषद कार्यालयाचे भोगवटा प्रमाणपत्र १५ जुलैच्या सुमारास देण्यात आले आहे.
या कार्यालय संकुलामधील दोन प्रशासकीय इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आहे. या परिसरातील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून वाहन पार्किंग व्यवस्था, साफसफाई व अंतर्गत सुशोभीकरण कामेदेखील पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. विविध कार्यालयातील दालने, आसन व्यवस्था तसेच कागदपत्र साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सिडकोतर्फे १५ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्याची हमी देण्यात आली होती. या कार्यालयात संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री यांना पाचारण करण्यात आले असून हा सोहळा जिल्ह्य़ाचा वर्धापन दिन व महसूल दिन असणाऱ्या १ ऑगस्ट रोजी करण्याबाबत संकेत जिल्ह्य़ातील विविध कार्यालयांना देण्यात आले आहे. या संकुलातील विविध कार्यालयांची पाहणी कोकण आयुक्त विलास पाटील यांनी सोमवारी केली तसेच उद्घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने अधिकारी वर्गाशी चर्चा केली.
या कार्यालय संकुलाचा उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्षात जिल्ह्य़ातील कार्यालये नवीन वास्तूमधून कार्यरत करण्याची योजना आखण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांच्या उपलब्धतेची निश्चिती झाल्यानंतर कार्यक्रम घोषित होईल, असे जिल्ह्य़ातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कोकण आयुक्तांकडून मुख्यालयाची पाहणी
पालघर: पालघर जिल्ह्याचे नवीन मुख्यालय पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व प्रशासकीय कार्यालये स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने नवनियुक्त कोकण विभागीय आयुक्त विकास पाटील यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला.
आयुक्त पाटील यांनी कोळगाव येथील जिल्हा मुख्यालयाच्या सर्व इमारतींची पाहणी केली व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. जिल्हा मुख्यालयाबाबतचा आढावा आयुक्त यांच्याकडून मंत्रालयीन पातळीवर पोचविल्यानंतर मुख्यालय उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांकडून लवकरच पालघर जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित होणार आहे. आयुक्त यांनी जिल्हा मुख्यालयासह पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात करोना उपचार केंद्राला भेट देऊन तेथील आढावा व समस्या आरोग्य अधिकारी यांच्याकडून जाणून घेतल्या. याच परिसरात उभारलेल्या प्राणवायू प्रकल्पाची त्यांनी पाहणी करून त्याचा सविस्तर आढावा घेतला. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विविध यंत्रणांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विक्रमगड येथील रिव्हेरा करोना उपचार केंद्रांसह विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या.